बहुरेखीय कथाकथन शैलीबद्दल टिपण
हे पुस्तक निवडल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ देऊ केल्याबद्दल मनापासून आभार.
हे पुस्तक प्रकाशित होण्यासाठी जरा जास्त काळ लागला याची मला कल्पना आहे आणि त्याबद्दल मी दिलगीर आहे. पण मला खात्री आहे की, राम चंद्र श्रृंखलेच्या हायपरलिकं - बहुरेखीय कथाकथन शैलीबद्दल मी आपणास सांगेन तेव्हा कदाचित हा भाग प्रकाशित होण्यासाठी इतका काळ लागण्यामगील कारण आपणास समजेल.
हायपरलिकं या कथाकथनाच्या एका नव्या पद्धतीने मी प्रभावित झालो. या पद्धतीला काही लोक बहुरेखीय कथाकथन असंही म्हणतात. अशा बहुरेखीय पद्धतीत कथेतील कैक चरित्रांना एक सूत्र एकत्र आणत असतं. राम चंद्र श्रृंखलेत राम, सीता आणि रावण ही तीन महत्वाची चरित्रे आहेत. आपापल्या जीवनात आलेल्या अनुभवातून ही तीनही चरित्रं कथेत जशी आहेत तशी घडली आहेत. या तीनही प्रमुख पात्रांच्या चरित्रांतील मीलनबिंदू आहे सीतेच्या अपहरणाची घटना. या तिघांच्याही जीवनात प्रचंड साहसी घटना घडतात आणि प्रत्येकाची वेगळी, खिळवून ठेवणारी जीवनकथाही आहे.
तर, पहिल्या पुस्तकात आपण रामाची कथा जाणून घेतली. दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रृंखलेत क्रमशः सीतेच्या आणि रावणाच्या जीवनातील रोमहर्षक प्रसगं आपल्यासमोर उलगडणार आहेत. चौथ्या श्रृंखलेपासून पुढे या तीनही कथा एकमेकांत गुंफल्या जाऊन एका कथेच्या रूपात समोर येणार आहेत. पुढील तक्त्यावरून हे आपल्या नीटसं लक्षात येईल-
हे थोडं जटिल आणि वेळखाऊ काम असणार याचा मला अंदाज होता, पण खरं सांगतो, अतिशय रोमांचकारी काम होतं हे. आपल्यासाठीसुद्धा हे माझ्याइतकंच रोमांचक आणि समाधान देणारं ठरेल अशी मी आशा करतो. सीता आणि रावणाचं चरित्र जाणून घेताना या महाकाव्यातील जग माझ्या आसपास जिवंत झालं, मी त्यांच्या जगात जगलो, कथानकाची वेगवेगळी दालनं उघडत गेलो. भारून टाकणाऱ्या या अनुभवाबद्दल मी स्वतःला विशेष अनुग्रहित मानतो.
कथानकाचा एकूण घाट असा असल्याचे काही संकेत मी या शृंखलेतील माझ्या पहिल्या पुस्तकात – इक्ष्वाकुचे वंशज – मध्ये दिलेले आहेत. श्रृंखलेच्या पहिल्या भागातील कथानकाची सूत्रं दुसऱ्या आणि तिसऱ्या भागातील कथेशी जोडलेली असणार आहेत. अर्थातच काही आश्चर्यकारक आणि अनपेक्षित वळणंही दुसऱ्या आणि तिसऱ्या भागातील कथेत आपल्यासमोर उलगडणार आहेत हे वेगळं सांगायला नको, नाही का? ☺
इक्ष्वाकुचे वंशज मधील शेवटच्या परिच्छेदात पुढील कथानकाबद्दल एक मोठा संकेत दिलेला आहे. काही वाचकांच्या तो लक्षात आला असेलच. ज्यांच्या तो लक्षात आला नाही त्यांच्यासाठी सीता – मिथिलेची योद्धा या दुसऱ्या भागातील पहिल्या प्रकरणात एक मोठं आश्चर्य दडलेलं आहे.
सीता – मिथिलेची योद्धा हे पुस्तक आपणास आवडले अशी मी आशा करतो. पुढे माझ्या फेसबुक आणि ट्विटर वरील खात्याचा दुवा देत आहे. आपल्याला हे पुस्तक कितपत आवडलं हे मला नक्की कळवा.
प्रेमपूर्वक,
अमीश
www.facebook.com/authoramish
www.twitter.com/authoramish