संपूर्ण भारताला रावणाकडून झालेल्या दशरथाच्या पराभवाचे जेवढे परिणाम भोगावे लागत होते त्यामानाने मिथिलेला कमी परिणाम भोगावे लागले असावेत असं वाटत होतं. खरं तर मिथिलेत व्यापारच फारसा उरला नव्हता. त्यामुळे त्यावर फारसा विपरीत परिणाम होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. सुनयनांतर्फे ज्या सुधारणा लागू केल्या गेल्या होत्या त्या अगदी व्यवस्थित रुळल्या होत्या. उदाहरणार्थ, स्थानीय कर गोळा करणे आणि प्रशासन पुन्हा गाव स्तरावर आणणे इ. कामाचा ताण कमी झाल्यामुळे मिथिलेतील अधिकाऱ्यांवरचा कामाचा वेग वाढला होता.
शेतीतून मिळणारं वाढीव उत्पन्न वापरून त्यांनी नोकरशाहीतील अधिकाऱ्यांना टिकवून ठेवलं होतं. शिवाय त्यांनी मिथिलेच्या नागरी संरक्षण दलात वाढ केली होती. यामुळे राज्यांतर्गत संरक्षण व्यवस्थेला मजबूती आली होती. मिथिला नगरीचं स्वतःचं सैन्य नव्हतं कारण तशी कधी गरजच पडली नव्हती. कधी गरज पडलीच तर त्यानुसार कुशध्वजांची सांकश्य सेना मिथिलेच्या बाह्य शत्रुंशी लढा देणार होती. सुनयनांनी लागू केलेले बदल फार मोठे नव्हते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडकाठी किंवा अडथळे न येता आणि मिथिलावासियांच्या दैनंदिन जीवनात कोणताही बदल न येता ती लागू करता आली. इतर राज्यांत मात्र रावणाशी झालेल्या तहातील त्रासदायक अटी लागू करताना मोठे संघर्ष घडले होते.
राजकीय फरमान काढून सीतेचा जन्मदिवस हा आनंददिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू केली गेली. त्यांना तिचा खरा जन्मदिवस ठाऊक नव्हता. म्हणून, ज्या दिवशी ती धरणीमातेच्या कुशीत सापडली होती तोच तिचा जन्मदिवस मानण्यात आला. आज तिचा सहावा वाढदिवस होता.
इतर सणासुदीच्या दिवसांसारखंच आजही सीतेच्या वाढदिवसानिमित्त नगरातील गोरगरीबांना भेटवस्तू वाटल्या गेल्या आणि दानही दिलं गेलं. अर्थात वाढदिवसाचा कार्यक्रम इतर कार्यक्रमांपासून वेगळा असे. सुनयनांनीसुद्धा त्यात थोडे बदल केले होते. दरवेळी दानाचा मोठा भाग कामगार घेऊन जात असत. ते श्रीमंत नव्हते पण गरीबही नव्हते. सुनयनांनी लागू केलेल्या प्रशासनिक बदलांमुळे खऱ्या गरजू आणि गरीब व्यक्तींनाच दान मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हे लोक नगराच्या दक्षिण प्रवेशद्वाराच्या आतील दुसऱ्या तटबंदीच्या भिंतीला लागून असलेल्या झोपड्यांमध्ये रहात असत.
सार्वजनिक कार्यक्रमांनंतर शाही जोडपं रुद्र देवाच्या भव्य मंदिराजवळ आलं.
रुद्रदेवांचं मंदिर लाल विटांनी बांधलेलं होतं. मिथिला नगरीतील उंच इमारतींपैकी हे एक देऊळ होतं. नगरातील बहुतेक भागांतून या मंदिराचं दर्शन घडत असे. मंदिराच्या चारही बाजूंनी मोठी बाग होती. नगरातील या गजबजलेल्या भागातील ते एक शांत ठिकाण होतं. या बागेपलीकडे, पार तटबंदीच्या भिंतीपर्यंत, झोपड्या होत्या. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात रुद्रदेव आणि मोहिनीदेवींच्या मोठ्या मूर्तींची स्थापना केलेली होती. ज्ञान, शांती आणि तत्वज्ञानाबद्दलच्या आवडीनिवडी आणि त्यांप्रती समर्पणभावाचं प्रतीक मानल्या गेलेल्या या नगरीतील मंदिरात असणारी रुद्रदेवांची प्रतिमा नगरीच्या एकूण प्रतिमेशी साम्य सांगणारी होती. रुद्रदेवांचं या मंदिरातील रूप इतरत्र दिसून येणाऱ्या भीषण रूपासारखं नव्हतं. त्यांच्या या मूर्तीच्या चेहऱ्यावर कोमल आणि दयाळू भाव होते. शेजारी बसलेल्या, साक्षात सौंदर्याची मूर्ती असलेल्या देवी मोहिनींचा हात त्यांनी हातात घेतलेला होता.
पूजा आणि प्रार्थना झाल्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्याने शाही जोडप्याला
प्रसाद
दिला. सुनयनांनी पुजाऱ्याला खाली वाकून नमस्कार केला. मग सीतेचा हात धरून तिने तिला गर्भगृहाशेजारच्या भिंतीपाशी नेलं. त्या भिंतीवर लांडग्यांपासून सीतेचं शूरपणे रक्षण करणाऱ्या गिधाडाच्या स्मृतीप्रीत्यर्थ धातूची एक अलंकृत पाटी लावण्यात आली होती. त्या घटनेनंतर गिधाडाचा मृत्यू झाला होता. सन्मानानं त्याचा अंत्यविधी करण्याआधी त्याच्या चेहऱ्याचा एक मुखवटा बनवून घेण्यात आला होता. मर्त्य जगाचा निरोप घेणाऱ्या त्या पक्षाच्या चेहऱ्यावर शेवटच्या क्षणी उमटलेला भाव त्या धातूच्या मुखवट्यात कैद झाला होता. झपाटून टाकणारं दृश्य होतं ते. त्याच्या चेहऱ्यावर करारी आणि उदात्त भाव विलसत होते. कित्येक वेळा सीतेनं आपल्या आईला तो संपूर्ण प्रसंग वर्णन करून सांगण्यास भाग पाडलं होतं. सुनयनानांही तो प्रसंग पुन्हा पुन्हा आठवण्यात, सांगण्यात आनंदच वाटत असे. आपल्या मुलीने हे सगळं लक्षात ठेवावं असं तिला वाटत असे. मनाचं थोरपण कोणतीही आकृती आणि कोणतंही रूप धारण करून कुठेही भेटू शकतं हे सीतेनं जाणावं अशी तिची इच्छा होती. जणू काही ते सगळं पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करत असल्यासारखा सीतेनं हळुवारपणे त्या मुखवट्यावरून हात फिरवला. आपल्याला नवं जीवन देणाऱ्याची आठवण काढताना दरवेळेप्रमाणे यावेळीही सीतेच्या डोळ्यांतून अश्रू वाहिले.
‘धन्यवाद,’ सीता कुजबुजली. तिने पशुपती देवांसाठी एक छोटीशी प्रार्थना म्हटली. आपल्याला जीवन देणाऱ्या गिधाडाच्या आत्म्याला पुन्हा भूतलावर अवतरण्याचं कारण मिळालं असावं अशी आशा तिला वाटली.
राजा जनकांनी आपल्या पत्नीला संकेत केला आणि ते कुटुंब सावकाश रुद्रदेवांच्या मंदिरातून बाहेर पडलं. मंदिराच्या पुजाऱ्यानं त्यांना पायऱ्या उतरेपर्यंत साथ दिली.
चौथऱ्यावरून पलीकडच्या झोपड्या स्पष्ट दिसत होत्या.
‘आई, तू मला तिकडे का जाऊ देत नाहीस?’ सीतेनं झोपड्यांच्या दिशेनं बोट दाखवत म्हटलं.
सुनयना हसल्या न् मुलीचं डोकं थोपटत म्हणाल्या, ‘जाऊ देईन हं, लवकरच.’
‘तू नेहमीच असं म्हणतेस,’ सीतेनं तक्रारीच्या सुरात म्हटलं. तिचा चेहरा रुसल्यामुळे आणखी गोड दिसू लागला.
‘हो. आणि मी खरंच सांगते,’ हसत सुनयना म्हणाली. ‘लवकरच, पण किती लवकर हे काही मी सांगितलं नव्हतं, हो ना?’
‘ठीक आहे,’ सीतेच्या केसांतून हात फिरवून ते विस्कटत जनक म्हणाले, ‘पळ आता, मला गुरुजींशी बोलायचंय.’
राजा जनकांचे गुरु अष्टावक्र जेव्हा तेथे आले तेव्हा सात वर्षांची सीता आपल्या वडिलांच्या खाजगी कार्यालयात त्यांच्याबरोबर खेळत होती. परंपरेनुसार जनकांनी वाकून गुरुंना वंदन केलं आणि त्यांना आपल्या आसनावर विराजमान होण्याची विनंती केली.
सप्त सिंधू प्रदेशाच्या राजकीय रिंगणात सध्या मिथिलेला महत्वाचं स्थान नव्हतं. त्यामुळे त्यांचे कायमस्वरूपी
राजगुरू
नव्हते. पण एरवी राजा जनक यांच्या दरबारात श्रेष्ठ गुरु, विद्वान, वैज्ञानिक आणि तत्वज्ञान्यांचं नेहमीच स्वागत केलं जात असे. बुद्धिवाद्यांना ज्ञान आणि चातुरीच्या सुगंधाने भारलेली मिथिलेची हवा मानवत असे. सर्व श्रेष्ठ विचारकांपैकी एक असलेले ऋषी अष्टावक्र जनकांचे गुरु होते. मलयपुत्र कबील्याचे प्रमुख महान महर्षी विश्वामित्रसुद्धा अधून मधून मिथिला नगरीला भेट देत असत.
‘आपण म्हणाल तर नंतर बोलू, महाराज,’ अष्टावक्र म्हणाले.
‘नाही, नाही, तसं काही नाही,’ जनक म्हणाले, ‘बराच काळ मला सतावत असलेल्या एका प्रश्नावर मला आपला सल्ला हवाय, गुरुवर्य.’
अष्टावक्रांचं शरीर आठ ठिकाणी वाकडं होतं. गर्भारपणाच्या शेवटच्या काळात त्यांच्या मातेला एका अपघाताला तोंड द्यावं लागलं होतं. पण त्यांच्या भाग्यामुळे आणि कर्मामुळे शारीरिक व्यंगांवर मात करणारी बुद्धी आणि मन त्यांना मिळालं होतं. लहानपणापासूनच अष्टावक्रांमध्ये अलौकिक बुद्धिमत्तेची लक्षणं दिसून येऊ लागली होती. तरुणपणी ते एकदा राजा जनकांच्या दरबारात आले होते. त्यांनी राजा जनकांचे तत्कालीन गुरु बांदी यांच्याशी झालेल्या एका वाद- विवादात त्यांना हारवलं होतं. गुरु बांदींनी अष्टावक्रांचे पिता ऋषी कहोला यांना वादविवादात हारवलं होतं. अष्टावक्रांनी त्या पराजयातून आपल्या पित्याला मुक्त केलं होतं. उदार मनानं आपली हार पत्करून ऋषी बांदींनी राजगुरुचं पद सोडलं होतं आणि ते पूर्व सागराच्या किनारी एका आश्रमात ज्ञानप्राप्तीच्या साधनेसाठी निघून गेले होते. अशा रीतीने तरुण अष्टावक्र राजा जनकांचे प्रमुख गुरु बनले होते.
महान राजा जनकांच्या राज्याची राजधानी असलेल्या मिथिला नगरीच्या मुक्त वातावरणात अष्टावक्रांच्या व्यंगाकडे कुणाचेही लक्ष जात नसे. कारण योगी अष्टावक्रांच्या सुदीप्त मनामुळे सगळ्यांना योगी अष्टावक्रांबद्दल प्रचंड आदर वाटत असे.
‘आपण पुन्हा संध्याकाळी भेटू, बाबा,’ पित्याच्या पायांना स्पर्श करून त्यांना वंदन करत सीता म्हणाली.
जनकांनी तिला आशिर्वाद दिला. मग तिने ऋषी अष्टावक्रांनाही त्यांच्या पावलांना स्पर्श करून नमस्कार केला. मग ती तेथून निघून गेली. मात्र उंबरा ओलांडल्यानंतर ती थांबली आणि पटकन् दरवाज्याआड लपली. जनकांना ती दिसत नव्हती पण त्यांचं बोलणं मात्र तिला ऐकू येत होतं. आपल्या पित्याला कोणता प्रश्न सतावत आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं.
‘सत्य काय आहे हे कसं जाणून घ्यायचं, गुरुवर्य?’ राजा जनकांनी विचारलं.
लहानग्या सीतेला काहीच उमगलं नाही. ती गोंधळली. राजवाड्याच्या काना-कोपऱ्यातून कित्येकदा तिचे वडील दिवसें दिवस तऱ्हेवाईक होत चालले आहेत, राज्यकारभाराची जाण असलेली राज्यकारभार व्यवस्थित सांभाळणारी राणी मिळाली हे आपलं भाग्यच, अशी कुजबूज तिच्या कानांवर येत असे.
सत्य काय असतं?
ती वळली आणि आपल्या आईच्या दालनाच्या दिशेने तिला हाका मारत धावत सुटली, ‘आईऽऽऽऽ!’
सीतेने बराच काळ वाट पाहिली. आता ती आठ वर्षांची झाली होती. आणि अजून आई तटबंदीनजीकच्या झोपडपट्टीत तिला घेऊन गेली नव्हती. गेल्यावेळी तिने जेव्हा याबद्दल विचारलं तेव्हा निदान तिला कारण तरी सांगितलं गेलं होतं. तिला सांगितलं गेलं होतं की तिथे जाणं धोकादायक ठरू शकतं. तिथे काही लोक इतरांना ठोक देतात. हे ऐकून सीतेची खात्री पटली होती की तिची आई तिला काही न काही कारणं सांगून तिचं तिथे जाणं टाळतेय.
शेवटी उत्सुकतेनं तिच्या मनाचा ताबा घेतला. नोकरांच्या मुलांचे कपडे घालून ती हळूच घराबाहेर पडली. भलं मोठं अंगवस्त्र तिने खांद्याभोवती आणि कानांभोवती गुंडाळून घेतलं होतं. त्यात ती पूर्णपणे लपून गेली होती. उत्तेजना आणि भीतीमुळे तिचं हृदय धडधडत होतं. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहून ती खात्री करून घेत होती की कुणी तिचा पाठलाग तर करत नाहीय ना? तिच्या या छोट्याश्या धाडसाबद्दल कुणाला काही कळलं तरी नाही ना? अर्थातच, कुणालाही काहीही कळलेलं नव्हतं.
दुपारनंतर सीतानं रुद्रदेवांच्या मंदिराची बाग ओलांडली आणि ती झोपड्यांच्या भागात गेली. ती एकटीच चालली होती. आईचे शब्द ध्यानात ठेवून संरक्षणासाठी तिने बरोबर एक मोठी लाठी घेतली होती. गेलं वर्षभर ती लाठी चालविण्याचं प्रशिक्षण घेत होती.
झोपडपट्टीत ती शिरली आणि तिच्या नाकानं जोरदार निषेध नोंदवला. दुर्गंधीनं तिच्यावर जोरदार हल्ला केला होता. मागे वळून तिने मंदिराच्या बागेकडे पाहिलं. लगेच वळून परत जाण्याचा विचार तिच्या मनात आला. पण त्याहून, निषिद्ध काही करत असल्याची उत्तेजना तिच्या नसानसांत पेटत गेली. बराच काळ हे करण्यासाठी तिने वाट पाहिली होती. ती पुढे पुढे चालत राहिली. तेथील घरे बांबूंनी बांधलेली होती आणि त्या बांबूंवर निष्काळजीपणानं कपडे पसरलेले होते. अशा गबाळ घरांच्या दाटीवाटीत मधूनच थोडी रिकामी फट असायची तीच तिथला रस्ता असायची. याच रस्त्यांवर चालत लोक झोपडपट्टीच्या आत जात किंवा बाहेर पडत असत. या रस्त्यांवरच्या उघड्या गटारांतून गलीच्छ पाणी वाहात होतं. मध्ये कुठे संडास उभारले होते. आणि जनावरांना बांधून ठेवण्यासाठी गोठेसुद्धा याच बोळकंडीवजा रस्त्यांवर होते. या रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग पडलेले होते. सगळीकडे चिखल आणि घाण पसरलेली होती. जनावरं आणि माणसांच्या मूत्राचा रस्त्यावर पसरलेला थर चालणं अवघड करत होता. सीतेनं आपलं वस्त्र नाकावर आणि तोंडावर ओढून घेतलं. या सगळ्याचं तिला प्रचंड आश्चर्य आणि आकर्षण वाटत होतं.
लोक खरंच अशा प्रकारे रहातात? रुद्र देवा, दया करा!
राजवाड्यातील कर्मचाऱ्यांनी तिला सांगितलं होतं की राणी सुनयनांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यापासून झोपडपट्टीची स्थिती बरीच सुधारली होती.
ही जर सुधारणा असेल तर याहून वाईट परिस्थिती कशी होती?
चिखल चुकवत, काळजीपूर्वक पावलं टाकत प्रचंड साहसानं ती पुढे पुढे चालली होती. मग तिला असं काही तरी दिसलं की तिला थांबावंच लागलं.
एका झोपडीसमोर बसलेली एक बाई आपल्या बाळाला एका तुटक्या प्लेटीतून काहीतरी खायला घालत होती. तिचं बाळ बहुधा दोन-तीन वर्षांचं असावं. तो मजेत आपल्या आईच्या मांडीवर बसला होता. ती घास भरवू जायची तेव्हा तोंड फिरवून तो घास चुकवायचा आणि आनंदानं घुमायचा. अधून मधून अत्यंत नाटकीपणानं, आईला सूट दिल्यासारखा तो तोंड उघडायचा आणि त्याची आई त्याल छोटा घास भरवायची. घास भरवला की तो आनंदानं हुंकारायचा. हे सगळं आनंददायक होतंच, पण सीतेचं लक्ष दुसऱ्याच एका गोष्टीन वेधून घेतलं होतं. त्या बाईशेजारी एक कावळा बसला होता. आणि दर दुसरा घास ती त्या कावळ्याला भरवत होती. कावळासुद्धा आपली पाळी येण्याची वाट पाहात होता. अगदी शांतपणे. त्याच्यासाठी हा खेळ नव्हता. आणि ती स्त्री त्या दोघांना आळीपाळीने भरवत होती.
हे पाहून मात्र सीताला हसू आलं. काही दिवसांपूर्वी आईनं तिला जे सांगितलं होतं ते तिला आठवलं.
कित्येकदा गरीब लोकांमध्ये कुलीनांहून जास्त कुलीनता असते.
त्यावेळी सीतेला त्याचा अर्थ कळला नव्हता, पण आता तो तिला कळला होता.
सीता परत फिरली. पहिल्या फेरीत पहायची तेवढी झोपडपट्टी तिने पाहून घेतली होती. स्वतःला तिने परतण्याची गळ घातली आणि शपथेवर ठरवलं की पुन्हा इथे यायचंच. आता मात्र राजवाड्यात परतण्याची वेळ झालीय.
ती परत फिरली तेव्हा तिला समोर चार बोळ दिसले.
यापैकी कुठल्या रस्त्यानं आपण जायचं?
नक्की ठरवता येईना तेव्हा ती डाव्या बाजूच्या बोळातून पुढे निघाली. ती चालत राहिली. बराच वेळ. पण झोपडपट्टीचा किनारा काही तिच्या दृष्टीपथात येत नव्हता. तिच्या हृदयाची धडधड वाढली. तिने आपल्या चालण्याचा वेग वाढविला.
उजेड हळूहळू मावळत चालला होता. गोंधळात टाकणारा प्रत्येक रस्ता पुढे एखाद्या चौकात पोहोचायचा आणि तिथून त्या रस्त्याला आणखी फाटे फुटलेले असायचे. एकही रस्ता धड नव्हता. त्या रस्त्यांमध्ये कोणताही व्यवस्थितपणा नव्हता. गोंधळून ती एका त्यामानानं थोड्या शांत रस्त्यावर वळली. आता तिला भीती वाटू लागली होती. अर्थात त्या रस्त्यानेही तिला चुकीच्या ठिकाणीच पोहोचवलं होतं. थोडं वेगात पोहोचवलं इतकाच काय तो फरक!
‘माफ करा!’ सीता म्हणाली. तिचा कुणाला तरी धक्का लागला होता.
ती एक सावळी मुलगी होती. वयाने किशोरी असेल किंवा थोडी मोठी. पण ती घाणेरडी आणि अस्ताव्यस्त वाटत होती. तिच्या कपड्यांमधून येणाऱ्या घाणेरड्या वासावरून वाटत होतं की तिने बराच काळ कपडे बदलले नसावेत. गुंताडा झालेल्या, धुळीनं माखलेल्या तिच्या केसांवरून उवा फिरत होत्या. तिची शरीरयष्टी उंच, सडपातळ आणि आश्चर्य वाटेल एवढी पिळदार होती. तिचे मांजरासारखे डोळे आणि इथे-तिथे जखमांचे व्रण असलेलं शरीर पाहून एकूणच ती थोडी धोकादायक आणि कडक वाटत होती.
तिने सीतेच्या चेहऱ्याकडे आणि नंतर तिच्या हातांकडे पाहिलं. अचानक तिच्या डोळ्यांत ओळख चमकली, एखादी संधी हेरल्यासारखी. पण तोवर सीता धावतच एका बोळात निघून गेली होती. मिथिलेच्या राजकन्येनं मग आपल्या चालण्याचा वेग आणखी वाढविला. ती जवळ जवळ धावतच निघाली. मनातल्या मनात ती प्रार्थना करत होती की देव करो अन् झोपडपट्टीतून बाहेर नेणारा हाच मार्ग असो.
तिच्या कपाळावर घामाचे बिंदू उमटू लागले होते. तिने आपला श्वास स्थिर करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही तिला जमलं नाही.
ती धावत राहिली, पण तिला थांबावं लागलं.
‘रुद्र देवा, दया करा!’
अचानक धावता धावता तिला थांबावं लागलं होतं. कारण तिच्या समोर भिंत होती. आपण पुरत्या हरवलो याबद्दल आता मात्र तिची खात्री पटली होती. कारण ती त्या क्षणी झोपडपट्टीच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलेली होती. झोपडपट्टीची दुसरी बाजू तटबंदीच्या भिंतीला लागून आतल्या बाजूला होती. मिथिला नगरीचा आतला भाग खूपच विस्तृत होता. सीता जेथे उभी होती तेथे भीती वाटावी अशी शांतता पसरलेली होती. आसपास कुणीही नव्हतं. सूर्य जवळ जवळ अस्ताला गेला होता. आणि त्याचे शेवटी उरलेले अंधुक किरण अंधाराला अधिकच गडद करत होते. काय करावं आता, तिला समजेना.
तेवढ्यात मागून आलेला आवाज तिच्या कानांवर आदळला, - ‘आता हे आणि कोण आहे बुवा?’
गर्रकन् सीता मागे वळली. हल्ला करायची तिने पूर्ण तयारी ठेवली. उजव्या बाजूने दोन किशोरवयीन मुलं तिच्या दिशेनं येताना तिला दिसली. ती डावीकडे वळली. आणि धावत सुटली. पण ती फार पुढे जाऊ शकली नाही. अचानक पुढे आलेल्या एका पावलाला अडखळून ती चिखलात तोंडावर पडली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की ती केवळ दोनच मुलं नव्हती. तिथे आणखीनही मुलं होती. पटकन उठत तिने लाठी पेलली. तिच्या भोवती पाच मुलं गोळा झाली होती. समोरच्याला भेडसावेल असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता.
झोपडपट्टीत होणाऱ्या गुन्ह्यांबद्दल तिच्या आईने तिला माहिती दिली होती. लोक कसे एकमेकांना ठोकून काढतात वगैरे. पण सीताचा त्यावर विश्वास बसला नव्हता. कारण तिच्य आईकडून दान मागायला येणारे लोक कधी कुणाला इजा पोहोचवू शकतील यावर तिचा विश्वास बसला नव्हता.
मी आईचं ऐकायला हवं होतं!
अस्वस्थ होऊन सीतानं चौफेर पाहिलं. पाच मुलं होती. तिच्यासमोर उभी होती. तिच्या मागे किल्याच्या तटबंदीची भिंत उभी होती. पळून जायला तिथे कोणताही मार्ग नव्हता.
तिने त्यांच्या दिशेनं, त्यांना भीती वाटावी अशा रीतीनं लाठी परजली. ती मुलं मात्र त्याची गंमत वाटून फिदीफिदी हसली. एखाद्या लहान मुलीकडे पाहून वाटावी तशी कदाचित त्यांना गंमत वाटत होती.
मधल्या मुलानं घाबरल्याचा आव आणत आपल्या मधल्या बोटाचं नख कुरतडलं आणि चिडविण्याच्या सुरात तो म्हणाला, ‘ओSSSS! आम्ही खूप घाबरलो हां!ऽऽ.’
मग सगळेच खदाखदा हसू लागले.
‘तुझ्या बोटातली अंगठी फार किंमती वाटते, कुलीन मुली,’ तो मुलगा म्हणाला. त्याच्या आवाजात नाटकी सुसंस्कृतपणा होता. ‘मला खात्री आहे, आम्ही पाच जण मिळून उभ्या आयुष्यात जेवढं कमावू शकणार नाही, त्याहूनही कितीतरी महाग असावी ही. तुला काय वाटतं...?’
‘तुम्हाला अंगठी हवीय का?’ सीतेनं विचारलं. बोटातून अंगठी उतरवताना तिला सुटल्यासारखं वाटलं. ‘घ्या, पण मला जाऊ द्या....’
मुलं फुत्कारत म्हणाली, ‘हो हो, नक्की जाऊ देऊ आम्ही तुला. पण त्याआधी ती अंगठी इकडे फेक.’
सीतेनं आवंढा गिळला. लाठी तिने शरीराला टेकवून उभी केली आणि पटकन् बोटातून अंगठी उतरवली. मुठीत अंगठी धरून तिने डाव्या हाताने त्यांच्या दिशेने लाठी उगारली. म्हणाली, ‘लाठी कशी वापरायची ते सुद्धा मला ठाऊक आहे!’
मुलानं आपल्या मित्रांकडे पाहिलं. भुवया उंचावल्या. मग पुन्हा सीतेकडे वळून तो हसत म्हणाला, ‘आमचा तुझ्यावर विश्वास आहे. फक्त ती अंगठी इकडे फेक.’
सीतेनं अंगठी त्यांच्या दिशेनं फेकली. तो मुलगा उभा होता तेथून थोड्या अंतरावर ती पडली.
‘ज्या हातानं अंगठी फेकलीस त्या तुझ्या हाताला आणखी थोडी बळकटी यायला हवी, शालीन पोरी’ अंगठी उचलायला खाली वाकता वाकता तो मुलगा पुन्हा हसला. अंगठीचं बारकाईनं निरीक्षण करून झाल्यावर त्यानं हलकेच शीळ घातली. मग त्यानं अंगठी कमरपट्ट्यात खोचली न् विचारलं, ‘आणखी काय काय आहे तुझ्या जवळ!?’
अचानक तो मुलगा पुढे हेलपाटला आणि जमिनीवर पडला. त्याच्या मागे जिला थोड्या वेळापूर्वी सीतेचा धक्का लागला होता, तीच उंच, काळी मुलगी उभी होती. तिने दोन्ही हातांनी एक मोठा बांबू पेलून धरला होता. झपाटल्यासारखी ती मुलं मागे वळली. आणि त्यांची नजर त्या मुलीवर गेली. क्षणात त्यांची वीरश्री कुठल्या कुठे नाहीशी झाली. कारण, ती त्या सगळ्यांहून उंच आणि बळकट होती.
आणि, कदाचित ती मुलं तिला ओळखत असावीत. तिला आणि तिच्या कर्तृत्वालाही.
‘तुला याच्याशी काहीही देणं-घेणं नाही, समीची....’ त्यांच्यापैकी एक मुलगा म्हणाला. मग संकोचत बोलला, ‘तू इथून निघून जा.’
समीचीनं बांबू चालवून त्याला उत्तर दिलं. त्याच्या हातावर अत्यंत क्रूरपणे तिनं बांबूचा फटका मारला. मुलगा भेलकांडत मागच्या बाजूला गेला. एका हातानं त्यानं आपला दुखावलेला दंड दाबून धरून ठेवला होता.
मग ती फिस्कारत त्यांना म्हणाली, ‘दुसरा हातही फोडून काढेन... जर तुम्ही लगेच इथून निघून गेला नाहीत तर!’
तो मुलगा मागल्या मागे पळून गेला!
पण इतर चौघे किशोरवयीन गुन्हेगार जागीच उभे होते. काही क्षणांपूर्वी समीचीने ज्याला खाली पाडलं होतं तो आता पुन्हा उठून उभा राहिला होता. त्यांची तोंडं समीचीच्या दिशेनं होती. सीतेकडे त्यांची पाठ होती. कारण सीता त्यांना पूर्णपणे निर्धोक वाटली होती. सीतेनं लाठीवरची मूठ आवळली, ती डोक्यावर उगारून धरली आणि ज्या मुलाच्या हातात तिची अंगठी होती त्याच्या दिशेनं ती सावधपणे पुढे सरकू लागली. हे त्या मुलांना दिसत नव्हतं. अंतराचा अंदाज घेत, त्या मुलाच्या डोक्याचा नेम साधून सीतेनं सारं बळ एकवटून अत्यंत क्रूरपणे लाठी फेकली.
ठ्ठॉSक्क!
मुलगा उभ्या उभ्या कोसळला. त्याच्या डोक्याला मागच्या बाजूला खोक पडली आणि तीतून रक्त उसळलं. इतर तिघे मागे वळले. त्यांनी मागे जे पाहिलं त्यामुळे अर्धांगवायूचा झटका यावा एवढा तीव्र झटका त्यांना बसला.
‘चल! पटकन् चल!’ समीची ओरडली. पुढे येत तिने सीतेचा हात हातात धरला. दोघीही धावत सुटल्या. वळणावर वळताना समीचीनं मागे वळून पाहिलं. मुलगा जमिनीवर निपचीत पडलेला होता. त्याचे मित्र त्याच्या भोवती गोळा झालेले होते. ते त्याला शुद्धीवर आणण्याचा, आपल्या पावलांवर उभं करण्याचा प्रयत्न करत होते.
‘धाव पटापट!’ समीची ओरडली. धावता धावता ती सोबत सीतेला खेचू लागली.