मान खाली घालून आणि हात मागे बांधून सीता उभी होती. चिखल आणि झोपडपट्टीतील घाणीनं तिचे कपडे माखले होते. तिच्या चेहऱ्यावरही चिखल बरबटलेला होता आणि तिच्या बोटातली अमूल्य अंगठी हरवली होती. भीतीनं ती थरथर कापत होती. आपल्या आईला एवढं रागावलेलं तिनं याआधी कधीही पाहिलेलं नव्हतं.
सुनयना आपल्या मुलीकडे पाहात होत्या. त्या काहीही बोलत नव्हत्या. त्यांच्या डोळ्यांतून फक्त नाराजी व्यक्त होत होती. आणि त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे, त्यांच्या डोळ्यांत अपेक्षाभंगही दिसत होता. सीतेला वाटलं, आईच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षांचा आपण पार चुराडा करून टाकला.
‘मला माफ कर, आई,’ रडवेल्या स्वरात सीता म्हणाली. तिच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले.
आईने निदान काहीतरी बोलावं असं तिला वाटत होतं. तिने मला थप्पड मारली तरी चालेल, किंवा ती रागावून बोलली तरीही चालेल असं सीतेला वाटत होतं. आई काहीही न करता केवळ पाहात रहिल्यानं ती काकुळतीला आली होती.
‘आई...’
मुलीकडे टक लावून पाहाता पाहाता सुनयना जणू दगड झाल्या होत्या.
‘महाराणी!’
हाकेसरशी आपल्या दालनाच्या प्रवेशद्वाराकडे सुनयनांची नजर गेली. मिथिलेच्या नगर रक्षक दलाचा एक कर्मचारी तिथे मान लववून उभा होता.
‘काय बातमी आहे?’ सुनयनांनी सावरत विचारलं.
‘ती पाच मुलं सध्या बेपत्ता आहेत, महाराणी,’ तो म्हणाला, ‘बहुतेक त्यांनी पळ काढला असावा.’
‘पाचही जण? पळाले?’
‘जखमी मुलाबद्दल कोणतीही बातमी मिळाली नाहीय, महाराणी,’ तो म्हणाला. सीतेनं ज्या मुलाला डोक्यावर मारलं होतं त्याच्याबद्दल तो बोलत होता. तो पुढे म्हणाला, ‘काही साक्षीदार पुढे येताहेत. त्यांनी सांगितलं की जखमी मुलाला इतर चौघांनी उचलून नेलं होतं. त्याच्या जखमेतून बरंच रक्त वाहात होतं.’
‘बरंच?’
‘म्हणजे... एका साक्षीदारानं सांगितलं की कदाचित तो.....’
त्यानं चतुरपणे वाक्य अर्धवटच सोडलं. ‘वाचेल असं वाटत नाही...’ हे शब्द त्याने स्पष्ट सूचीत केले, पण उच्चारले नाहीत.
‘ठीक आहे, जा आता,’ सुनयनांनी आज्ञा दिली.
त्यानं लगेच राणींना वंदन केलं आणि शिस्तीत पावलं टाकत तो निघून गेला. सुनयनांनी पुन्हा आपलं लक्ष सीतेकडे वळविलं. आईची कठोर नजर पाहून सीता घाबरली. मग राणीसाहेबांची नजर सीतेच्या पलीकडे, भिंतीजवळ उभ्या असलेल्या घाणेरड्या किशोरीवर गेली.
‘तुझं नाव काय आहे, पोरी?’ सुनयनांनी विचारलं.
‘समीची, महाराणी.’
‘आता तू पुन्हा झोपडपट्टीत परतणार नाहीस, समीची. आजपासून तू राजमहालातच राहाशील.’
समीची हसली. तिने दोन्ही हात जोडून राणीला नमस्कार केला. म्हणाली, ‘जरूर, महाराणी! हा माझा सन्मानच...’
सुनयनांनी आपला उजवा हात उंचावला तसं समीचीचं वाक्य अर्धवटच राहिलं. सुनयना मग सीतेकडे वळल्या न् म्हणाल्या, ‘आपल्या दालनात जा आणि आंघोळ करा. नंतर राजवैद्यांकडून आपल्याला झालेल्या जखमा तपासून घ्या. आणि समीचीला झालेल्या जखमासुद्धा. आपण याबद्दल उद्या बोलू.’
‘आई....’
‘उद्या.’
सीता सुनयनांशेजारी उभी होती. सुनयना जमिनीवर बसल्या होत्या. राणीच्या दालनातील खाजगी देवघरासमोर त्या होत्या. जमिनीवर रांगोळी रेखाटण्यात सुनयना मग्न होत्या. रंगीत पिठाने बनविल्या जात असलेल्य त्या सुंदर आकृत्यांमध्ये अंकगणित, तत्वज्ञान आणि आध्यात्मावरील चित्रं रंगवलेली होती.
या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी रोज सकाळी सुनयना नवी रांगोळी रेखाटत असत. या मंदिरात सुनयना ज्या देवांची पूजा करत असत त्या परशुरामदेव म्हणजे विष्णूंचा याआधीचा अवतार, रुद्र देव म्हणजे श्रेष्ठ महादेव, ब्रह्मदेव म्हणजे सृष्टीचा निर्माता-वैज्ञानिक या सर्व प्रमुख देवांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना केलेली होती. पण मंदिरातील केंद्रस्थानी विराजमान होण्याचा मान देवी माता शक्तींसाठी राखून ठेवला होता. सुनयनांच्या माहेरी- म्हणजे आसाममध्ये शक्तीमातेच्य पूजेला फार महत्व होतं. भारतीय उपमहाद्वीपातील सर्वात मोठ्या-ब्रह्मपुत्रा नदीच्या वरच्या अंगाला लागून असणारा प्रचंड विस्तृत, सुपीक आणि निसर्गाच्या वैभवानं समृद्ध प्रदेश म्हणजे आसाम.
सीता धीरानं वाट पाहात राहिली. काहीही बोलायची तिला भीती वाटत होती. ‘तुला काहीही करायची परवानगी देण्यामागे किंवा परवानगी न देण्यामागे काही ना काही कारण असतं, सीता,’ सुनयना म्हणाली. बोलताना तिची नजर ती रेखाटत असलेल्या रांगोळीवरच लागलेली होती.
सीता समोर बसलेली होती. तिची नजर आईच्या रांगोळी रेखाटणाऱ्या हातावर होती.
‘जीवनात गोष्टी जाणून घेण्याचं वय ठरलेलं असतं. गोष्टी जाणून घेण्याआधी त्या पेलण्यासाठी तयार व्हावं लागतं!’
रांगोळी पूर्ण झाली तेव्हा नजर उचलून सुनयनांनी आपल्या मुलीकडे पाहिलं. आईची नजर पाहिली आणि सीताला जरा हायसं वाटलं. आईच्या नजरेत फक्त प्रेम होतं. नेहमीसारखंच. ती रागावलेली नव्हती.
‘जगात वाईट लोकही असतात, सीता. गुन्हे करणारे लोक असतात. नगरातल्या अतिश्रीमंत वस्तीतही असे लोक भेटतात आणि झोपडपट्टीत रहाणाऱ्या गरीबांतही असे लोक असतात.’
‘हो आई, मी....’
‘शूSSSS.... बोलू नकोस, फक्त ऐक.’ सुनयनांनी स्थिर स्वरात सीतेला सांगितलं. सीता गप्प बसली. सुनयना पुढे बोलू लागल्या. ‘श्रीमंतांमधील गुन्हेगार बहुधा लोभाच्य आहारी जाऊन गुन्हे करतात. आणि लोभ जिथे असतो तिथे वाटाघाटींची शक्यता असते. पण गरीबीमुळे गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त झालेले लोक राग आणि अगतिकतेमुळे गुन्हे करतात. कधी कधी अगतिकतेमुळे माणसांतील उत्तम गुणांना प्रकट होण्याची मुभा मिळते आणि म्हणूनच बहुधा गरीब लोक उदार हृदयी असतात. पण अगतिकतेमुळे कधी कधी माणसातले दुर्गुणही व्यक्त होतात, कारण ते व्यक्त करणाऱ्यांचं काहीही नुकसान संभवत नसतं. आपल्याकडे काहीही नसताना इतरांकडे भरभरून असल्याचं पाहून राग येतो हे आपण समजू शकतो. राज्यकर्ते म्हणून आपण प्रयत्न करून सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. अर्थातच हे एका रात्रीत होणं शक्य नसतं. श्रीमंतांकडून बरंच घेऊन आपण ते गरीबांमध्ये वाटलं तर श्रीमंत उठाव करतील आणि त्यामुळे एकूणच गोंधळ माजेल. सगळ्यांनाच त्याचा त्रास होईल. म्हणून आपण अतिशय सावकाशीनं काम करायला हवं. जे खरोखर अत्यंत गरीब आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे. हाच धर्म आहे. पण आपण आंधळेपणानं सगळे गरीब लोक उदार असतात असं समजून चालत नाही. पोट रिकामं असतानाही चारित्र्य तेजस्वी राखणं हे सगळ्यांनाच जमतं असं नाही.’
सुनयनांनी मग सीतेला जवळ घेऊन मांडीवर बसवलं. सीता आईच्या मांडीवर आरामात बसली. झोपडपट्टीत जाण्यच्या घटनेनंतर पहिल्यांदच सीतेला थोडं हायसं वाटलं.
सुनयना सीतेला म्हणाल्या, ‘तू पुढे मिथिलेच्या राज्यकारभारात मला मदत करणार आहेस. म्हणून तुला प्रगल्भ आणि व्यावहारिक असायला हवं. आपल्या मनाचा वापर करून तू तुझं ध्येय ठरवायला हवं. पण तेथपर्यंतच्या प्रवासाची दिशा ठरवताना बुद्धीची मदत घेऊन मार्ग आखायला हवा. जे लोक केवळ हृदयाची हाक ऐकतात त्यांना बहुतेक अपयश मिळतं आणि जे लोक केवळ डोक्याचा वापर करतात ते बहुधा स्वार्थी बनतात. केवळ हृदयानं विचार करतानाच आपण आपल्याआधी इतरांचा विचार करतो. धर्मासाठी समाजात समतोल आणि समानता आणण्याचे ध्येय ठेवायला हवं. पूर्ण समानता अस्तित्वात येणं कधीही शक्य नाही. पण आपल्याला शक्य होईल तेवढी सामाजिक विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. पण उगीच साचेबद्धपणात अडकू नये. ज्यांच्याजवळ शक्ती असते ते सगळेच वाईट असतात किंवा शक्तिहीन नेहमी चांगलेच असतात असं मानून चालू नये. प्रत्येकातच काही चांगलं अन् काही वाईट असतंच.’
सीतेनं काही न बोलता मान हालवली.
‘अर्थातच तुझे विचार नेहमी उदार वृत्तीचे असायला हवेत. भारतीय उपासना आणि जीवनपद्धतीत हेच सांगितलेलं आहे.’
‘पण आंधळेपणानं किंवा मूर्खपणे मत बनवून घेऊ नकोस.’
‘हो, आई.’
‘आणि पुन्हा कधीही स्वतः होऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकू नकोस.’
सीता आईला बिलगली. तिच्या डोळ्यांतून अश्रु वाहात होते.
सुनयनांनी तिला जवळ घेऊन तिचे अश्रु पुसले. त्या म्हणाल्या, ‘तुझ्यामुळे माझा जीव टांगणीला लागला होता. तुझ्या बाबतीत काही वाईट घडलं असतं तर मी काय करू शकले असते, सांग बरं!’
‘मला माफ कर, आई.’
सुनयना पुन्हा सीतेला जवळ घेत हसल्या. ‘माझी भावविवश पोर...’
सीतेनं दीर्घ श्वास घेतला. अपराधीपणाच्या भावनेनं तिला ग्रासलं होतं. पुढे काय झालं हे तिला माहीत असायला हवं. ती म्हणाली, ‘आई, मी ज्या मुलाला डोक्यावर मारलं... तो...’
तिला मध्येच अडवत सुनयनांनी म्हटलं, ‘त्याबद्दल तू विचार करू नकोस.’
‘पण...’
‘त्याबद्दल तू चिंता करू नकोस असं मी म्हटलं.’
‘धन्यवाद, काका!’, उडी मारून काकांच्या कुशीत शिरताना सीता आनंदानं चीत्कारली. राजा जनकांचा छोटा भाऊ आणि सांकश्यचा राजा कुशध्वज मिथिलेत आले होते. आपल्या भाचीसाठी त्यांनी एक भेट आणली होती – एक अरबी घोडा. अरबी घोडे भारतीय घोड्यांहून वेगळे असतात. भारतीय घोड्यांना बहुधा चौतीस मणके आणि अरबी घोड्यांना बहुधा 36 मणके असतात. महत्वाचं म्हणजे अरबी घोडे छोट्या चणीचे, चपळ असतात. त्यांना प्रशिक्षण देणं सोपं असतं म्हणून त्यांना मागणीसुद्धा जास्त असते. त्यांच्यात अपार सहनशक्ती असते. अरबी घोडा बाळगणं अभिमानाची बाब असे. अर्थातच, त्याची किंमतसुद्धा जास्त असे.
त्यामुळे सीतेला खूप आनंद झाला होता. कुशध्वजांनी तिला खास तिच्यासाठी बनविलेलं खोगीर दिलं. खोगिराच्या पुढील उंचवट्यावर सोन्याचं पाणी चढवलेला कर्णा लावलेला होता. लहान असलं तरी सीतेच्या ताकदीच्या मानानं खोगीर खूप वजनदार होतं. तरीही ते उचलून नेण्यासाठी तिने सेवकांची मदत घेतली नाही.
शाही दालनाजवळच्या खाजगी पटांगणात नवा, उमदा घोडा सीतेची वाट पाहात होता. तेथपर्यंत सीतेनं खोगीर खेचत नेलं. कुशध्वजांच्या एका सेवकानं घोड्याचा लगाम धरून ठेवलेला होता.
सुनयना हसल्या. म्हणाल्या, ‘खूप खूप धन्यवाद. पुढचे काही आठवडे सीता या कामात गढून जाईल. नीट घोडेस्वारी येईपर्यंत तिला धड भूक लागणार नाही आणि झोपही येणार नाही!’
‘गुणाची मुलगी आहे,’ कुशध्वज म्हणाले.
‘पण ही फार किंमती भेट आहे, कुशध्वज,’ सुनयना म्हणाल्या.
‘ती माझी एकुलती भाची आहे, वहिनी,’ कुशध्वज म्हणाले, ‘मी नाही, तर कोण लाड करेल तिचे?’
सुनयना हसल्या. आणि त्यांनी पटांगणासमोर असलेल्या ओसरीत, राजा जनक बसले होते तिथे चलायची कुशध्वजांना खूण केली. पत्नी आणि भाऊ आले तेव्हा जनकांनी वाचत असलेल्या
बृहदारण्यक उपनिषदा
ची पांडुलिपी बाजूला ठेवली. महालातील दूरदर्शी सेवकांनी ताकानं भरलेले प्याले त्यांच्या समोरील तिवईवर ठेवले. चौरंगावर ठेवलेला चांदीचा दिवाही त्यांनी पाजळला. आवाज न करता मग ते तेथून निघून गेले.
कुशध्वजांनी दिव्यावर चौकस नजर टाकली आणि त्यांच्या कपाळावर नापसंतीच्या आठ्या पडल्या. दिवस अजून मावळला नव्हता, तोच... पण ते काही बोलले नाहीत.
सेवक दूरवर निघून जाईपर्यंत राणी सुनयना गप्प होत्या. मग त्यांनी राजा जनकांकडे पाहिलं. पण त्यांच्या पतीने तोवर पुन्हा पांडुलिपी उचलून हातात घेतली आणि ती वाचण्यात ते गर्क झाले होते. ते पुन्हा नजर वर उचलतील म्हणून थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर सुनयना खाकरल्या. तरीही राजा जनकांची नजर हातातील पांडुलिपीतच गुंतून राहिली.
‘काय झालं, वहिनी?’ कुशध्वजांनी विचारलं.
आता आपण बोलल्यावाचून गत्यंतर नाही हे सुनयनांनी ताडलं. कंबरेला लावलेल्या एका मोठ्या पिशवीतून त्यांनी एक कागद काढला आणि समोरच्या चौरंगावर ठेवला. कुशध्वजांनी जाणून-बुजून त्याकडे पाहाणं टाळलं.
‘कुशध्वज, सांकश्यला जोडणाऱ्या मार्गाबद्दल आपण बऱ्याच वर्षांपासून चर्चा करत आहोत,’ सुनयना म्हणाल्या, ‘मागे आलेल्या महापुरात तो मार्ग वाहून गेला होता. पण त्याला आता दोन दशकं उलटली. तो मार्ग बंद झाल्यामुळे मिथिलेच्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना खूप कष्ट पडतात.’
‘कोणते व्यापारी, वहिनी?’ कुशध्वज हळुच हसत म्हणाला, ‘मिथिलेत व्यापारी आहेत का?’
त्याने मारलेला टोमणा सुनयनांनी कानांआड केला. ‘मिथिलेनं मार्ग उभारण्याचा एक तृतियांश खर्च उचलला तर दोन तृतियांश खर्च सांकश्यतर्फे देण्याची गोष्ट तुम्ही तत्वतः मान्य केली होतीत,’ सुनयनांनी आठवण करून दिली.
कुशध्वज काहीही बोलले नाहीत.
‘मिथिलेनं आपल्या खर्चाची रक्कम उभी केली आहे,’ सुनयना म्हणाल्या. टेबलावरील कागदपत्रांकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, ‘या करारावर मान्यतेचा शिक्का लावू आणि मार्ग बनविण्याच्या कामाला सुरवात करू.’
कुशध्वज हसले. म्हणाले, ‘पण वहिनी, समस्या कोणती ते मला समजलं नाही. तो मार्ग अजूनही चांगला आहे. लोक रोज त्या मार्गाचा वापर करतात. काल त्याच रस्त्याने मी सुद्धा मिथिलेला आलो.’
‘पण तुम्ही राजे आहात, कुशध्वज,’ आवाजात आश्चर्य घोळवत सुनयना म्हणाल्या. त्यांचा स्वर सभ्य आणि उत्सुक होता. सामान्य लोकांना शक्य नसलेल्या बऱ्याच गोष्टी करणं तुम्हाला शक्य आहे. सामान्य लोकांसाठी एक चांगला मार्ग हवा.’
कुशध्वजाचा चेहरा हास्यानं उजळून निघाला. तो म्हणाला, ‘मिथिलेचे सामान्य लोक खरंच भाग्यवान आहेत. त्यांच्या कल्याणाचा एवढा विचार करणाऱ्या तुमच्यासारख्या राणी त्यांना मिळाल्यात.’
सुनयना काहीही बोलल्या नाहीत.
‘माझ्याजवळ एक कल्पना आहे वहिनी,’ कुशध्वज पुढे म्हणाले, ‘मिथिलेतर्फे या मार्गाचं बांधकाम सुरू होऊ दे, पहिला एक तृतियांश भाग बांधून पूर्ण झाला की उरलेल्या दोन तृतियांश भैगाचं बांधकाम सांकश्यतर्फे केलं जाईल.’
‘ठीक आहे.’
सुनयनांनी कागदपत्रे उचलली आणि शेजारीच असलेल्या एका छोट्या चौरंगावरील दौतीतील टाक उचलून कागदपत्राच्या शेवटी एक ओळ जोडली. मग आपल्या पिशवीतून शाही शिक्का काढून कागदपत्रावर उमटवला. मग त्यांनी तो कागद कुशध्वजांकडे दिला. त्यावेळी कुशध्वजांना दिवा लावण्यामागील हेतू लक्षात आला.
अग्नी देव. या कागदपत्रासाठी साक्षीदार होते अग्निदेव!
प्रत्येक भारतीय अग्नीला पवित्रता प्रदान करणारी देवता मानत असे. भारताच्या पहिल्या पवित्रतम धर्मग्रंथ – ऋग्वेदातील पहिल्या अध्यायातील पहिली प्रार्थना अग्निदेवांनाच तर समर्पित आहे हा निव्वळ योगायोग नव्हे. अग्निदेवतेला साक्षी मानून केलेला कोणताही करार दोन्ही पक्षांकडून सहसा मोडला जात नाही, मग ती लग्नाची वचनं असोत, यज्ञ असो, शांतीचा करार असो किंवा मार्ग बांधण्याची शपथ असो.
कुशध्वजांनी आपल्या वहिनींच्या हातातील करारपत्र घेतलं नाही. त्याऐवजी त्यांनी आपल्याजवळील थैलीतून सांकश्यचा शिक्का काढत ते म्हणाले, ‘वहिनी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हीच या कागदपत्रावर माझी संमती उमटवा.’
सुनयनांनी कुशध्वजांकडून शिक्का घेतला आणि तो त्या कागदपत्रावर उमटवणार तेवढ्यात कुशध्वज हळुवार उद्गारला, ‘हा नवा शिक्का आहे, वहिनी. यावर सांकश्यचं प्रतिबिंब नीट दिसून येतंय.’
सुनयनांच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या. त्यांनी शिक्यावरील चिह्नं पाहिली. त्यावरील प्रतिमा जरी उलटी दिसत असली तरी कागदपत्रावर उमटणारी प्रतिमा कोणती असणार हे राणी सुनयनांनी पटकन् ओळखलं. तो एक डॉल्फिन मासा होता. मिथिलेच्या शिक्यावरील डॉल्फिनसारखाच. पूर्वी सांकश्य मिथिलेचं अधीनस्थ राज्य होतं आणि त्यावर मिथिलेच्या राजवंशातील तरुण, नवे सदस्य राज्य करीत असत. त्यांच्या शिक्यावर एका हिलसा माशाचं चित्र होतं.
रागानं सुनयनांचं अंग ताठरलं. पण आपण आपल्या रागावर ताबा ठेवला पाहिजे हे सुनयनांनी जाणलं. त्यांनी सावकाश कागदपत्र चौरंगावर टेकवले. सांकश्यचा शिक्का वापरला नाही.
‘तुमच्या राज्याचा खरा शिक्का का देत नाही, कुशध्वज?’ सुनयनांनी विचारलं.
‘वहिनी, आता माझ्या राज्याचा हाच शिक्का आहे,’ कुशध्वज म्हणाला.
‘मिथिलेकडून मान्यता मिळाल्याशिवाय हे शक्य नाही. मिथिला जोवर सार्वजनिकरीत्या जाहीर करत नाही तोवर कोणत्याही राज्याकडून या शिक्क्याला मान्यता मिळणं अशक्य आहे. सगळ्यांना ठाऊक आहे की एका डॉल्फिनचं चिह्न मिथिलेच्या राजघराण्याचं चिह्न आहे.’
‘बरोबर आहे, वहिनी. पण आपण ते बदलू शकता. या कागदपत्रावर वापरून आपण या शिक्क्याला सगळीकडे मान्यता मिळवून देऊ शकता,’ कुशध्वज म्हणाले.
सुनयनांनी आपल्या पतीकडे एकदा पाहिलं. मिथिलेच्या महाराजांनी एकदा डोकं वर काढून आपल्या पत्नीकडे क्षणभर पाहिलं आणि ते पुन्हा
बृहदारण्यक उपनिषद
वाचण्यात गढून गेले.
‘हे स्वीकार्य नाही, कुशध्वज,’ शांत स्वरात सुनयना म्हणाल्या. पण त्यांच्या मनात अंगार फुलून आले होते. त्या पुढे म्हणाल्या, ‘आणि मी जोवर जिवंत आहे तोवर हे होणं शक्य नाही.’
‘तुम्ही एवढा त्रागा का करत आहात ते मला कळत नाहीय, वहिनी. आपला विवाह मिथिलेच्या राजघराण्यात झाला असला तरी माझा जन्मच या कुटुंबात झालाय. मिथिलेच्या राजघराण्याचं रक्त माझ्या नसांनसांत वाहातंय. तुमच्या बाबतीत असं नाही, हो ना, जनक दादा?’
राजा जनकांनी वर पाहिलं.
ही वेळ गप्प बसण्याची नव्हे.
ते बोलू लागले पण त्यांचा स्वर पूर्णपणे अलिप्त होता आणि त्यात रागाचा लवलेशही नव्हता. ते म्हणाले, ‘कुशध्वज, सुनयना जे बोलेल तोच माझा निर्णय असेल.’
कुशध्वज उठून उभे राहात म्हणाले, ‘आजचा दिवस अतिशय अपशकुनी आहे. एकाच घराण्यातील एका रक्तानं दुसऱ्या रक्ताचा अपमान केलाय. आणि तो अशासाठी की...’
सुनयनासुद्धा उठून उभ्या राहिल्या. कुशध्वजांचं बोलणं त्यामुळे अर्धवटच राहिलं. सुनयना जेव्हा बोलू लागल्या तेव्हा त्यांचा स्वर अतिशय शांत आणि संयत होता. त्या म्हणाल्या, ‘पुढे काय बोलणार आहात त्याचा आधी विचार करा.’
कुशध्वज हसला. एक पाऊल पुढे येऊन त्याने सुनयनांच्या हातातील शिक्का परत घेतला आणि म्हणाला, ‘हा माझा आहे.’
सुनयना शांत राहिल्या.
‘मिथिलेच्या राजकीय परंपरांचे रक्षक असल्यासारखे वागू-बोलू नकात,’ कुशध्वज घुश्शात म्हणाला, ‘तुम्ही काही रक्ताचे नातेवाईक नाही, तुम्हाला या कुटुंबानं बाहेरून आणलंय.’
यावर सुनयना काही बोलणार तेवढ्यात आपल्या हाताभोवती कुणाची तरी भक्कम पकड त्यांना जाणवली. त्यांनी खाली पाहिलं. लहानगी सीता रागानं थरथरत तेथे उभी होती. तिच्या दुसऱ्या हातात नुकतंच कुशध्वजांनी तिला भेटीदाखल दिलेलं खोगीर होतं. तिने ते खोगीर काकांच्या दिशेनं फेकलं. ते कुशध्वजांच्या पायावर पडलं.
कुशध्वज वेदनेनं कळवळले आणि त्यांच्या हातातील शिक्का खाली पडला.
झेप घेऊन सीतेनं तो उचलला आणि पूर्ण ताकदीनिशी, रागानं जमिनीवर आपटला. शिक्क्याचे दोन तुकडे झाले. शाही शिक्का तुटणं हा घोर अपशकुन मानला जाई. आणि सीतेनं तो जाणूनबुजून तोडला होता. सगळ्यात घोर अपमान होता हा.
‘सीता!’ जनक ओरडले.
रागाने कुशध्वजांचा चेहरा बीभत्स झाला. ते म्हणाले, ‘हे भयंकर होतंय, दादा!’
सीता आता आईच्या समोर जाऊन उभी होती. ती रागाने कुशध्वजांकडे त्यांच्या डोळ्याला डोळा देऊन पाहात होती. आपले दोन्ही हात फैलावून तिने आईला संरक्षण दिल्यासारखे तिच्या भोवती गुंडाळले होते.
सांकश्यच्या राजाने खाली वाकून शिक्क्याचे दोन्ही तुकडे उचलले आणि वादळासारखा घोंगावत ते निघून गेले. जाता जाता धमकी देत असल्यासारखे म्हणाले, ‘दादा! हे काही शेवटचं बोलणं नव्हे!’
कुशध्वज गेले तशी सुनयना गुडघ्यांवर बसल्या आणि त्यांनी सीतेचं तोंड आपल्याकडे वळवलं. त्या म्हणाल्या, ‘सीता, तू असं करायला नको होतंस.’
सीता आईपासून दूर व्हायला तयार नव्हती. ती निःशब्द रडत राहिली. तोंडावर हसू खेळवत जनक तिच्यापाशी आले आणि त्यांनी तिचं डोकं थोपटलं. शाही कुटुंब राजाच्या खाजगी कार्यालयात एकत्र आलं होतं. कुशध्वजाबरोबर घडलेल्या घटनेला काही दिवस उलटले होते. सीतेच्या पालकांनी ठरवलं होतं की सीतेला आता गुरुकुलात पाठवायला हवं.
गुरुकुल आजच्या काळातील निवासी शाळेसारखं असे.
जनक आणि सुनयनांनी आपल्या मुलीसाठी ऋषी श्वेतकेतुंचं गुरुकुल निवडलं होतं. जनकांचे मुख्य गुरु अष्टावक्र यांचे ते काका होते. त्यांच्या गुरुकुलात मुख्यतः तत्वज्ञान, गणित, विज्ञान आणि संस्कृत विषय शिकवले जात असत. या विषयांव्यतिरिक्त सीतेला भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र आणि प्रशासनाचं शिक्षणही दिलं जाणार होतं.
शिवाय, सीतेला शस्त्रास्त्रविद्या आणि युद्धविद्यादेखील शिकविण्यात येणार होती. राजा जनक यांचा याला आक्षेप होता पण सुनयनांचा विशेष आग्रह होता की सीतेला युद्धविद्येचं आणि शस्त्रास्त्र विद्येचं शिक्षण दिलं जावं. राजा जनकांचा अहिंसेवर विश्वास होता. सुनयनांना मात्र व्यावहारिक असणं जास्त योग्य वाटत होतं.
आपल्याला जावं लागेल हे सीता जाणून होती. पण ती छोटी होती. तिला घर सोडून जायची भीती वाटत होती.
‘तू नियमीतपणे घरी येत राहाशील, सीता,’ तिच्या मनातील भीती ओळखून राजा जनक म्हणाले. आणि आम्हीसुद्धा तुला भेटायला येत राहू. गंगा नदीच्या किनारी हा आश्रंम आहे, पण काही फार लांब नाही.’
सीतेची आईभोवतालची मिठी आणखी घट्ट झाली.
सुनयनांनी सीताचे होत सोडवले. तिची हनुवटी उचलली. तिला आपल्या डोळ्यांत पाहायला लावलं न् म्हणाल्या, ‘तिथे तुझं व्यवस्थित चालेल सगळं. तुला जीवन समर्थपणे जगण्यासाठी तयार केलं जाईल तिथे. खात्री आहे मला याची.’
सीतेनं हुंदके देत विचारलं, ‘मी काकांबरोबर तशी वागले म्हणून तुम्ही मला दूर पाठवताय का?’
सीतेचा हा प्रश्न ऐकून जनकसुद्धा गुडघ्यांवर बसले. सुनयना आणि जनक दोघांनीही तिला एकदमच जवळ घेतलं.
‘अर्थातच नाही, पोरी,’ सुनयना म्हणाल्या. ‘याचा तुझ्या काकांशी काहीएक संबंध नाही. तुला अभ्यास करायला हवा. तुला सुशिक्षित व्हायला हवं. म्हणजे पुढे तुला या राज्याचा कारभार चालविण्यात मला मदत करता येईल.’
‘होय सीता,’ जनक म्हणाले, ‘तुझ्या आईचं म्हणणं बरोबर आहे. कुशध्वज काकांशी जे घडलं त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाही. ते त्यांच्या, सुनयनांच्या आणि माझ्यामध्ये घडलं. ते आमच्यापुरतंच आहे.’
सीतेचे डोळे पुन्हा वाहू लागले. ती पुन्हा आपल्या पालकांना बिलगली. जणू तिला त्यांना सोडून कधीही, कुठेही जायचे नव्हते.