‘कौशिक भाऊ, खरंच सांगतो, ही कल्पना काही चांगली नाही,’ दिवोदास म्हणाला.
कौशिक आणि दिवोदास कावेरी नदीकिनारी असलेल्या आपल्या गुरुकुलासमोरील एका मोठ्या खडकावर बसले होते. तिशी उलटलेले हे दोघे तरुण मित्र महर्षी कश्यपांच्या गुरुकुलातील आचार्य होते. महर्षी कश्यप हे उत्तराधिकारी सप्तर्षी म्हणजे प्रसिद्ध सप्तर्षींचे वारस होते. कौशिक आणि दिवोदास लहानपणी याच गुरुकुलात विद्यार्थी होते. पदवी मिळाल्यानंतर ते दोघे आपापल्या मार्गाने गेले. दिवोदास प्रसिद्ध गुरु बनला आणि कौशिक श्रेष्ठ क्षत्रीय राजा. दोन दशकांनंतर त्या दोघांनी पुन्हा प्रतिष्ठित गुरुकुलात प्रवेश केला होता. यावेळी ते शिक्षक म्हणून गुरुकुलात परतले होते. भेट झाली आणि त्या दोघांची बालपणीची मैत्री पुन्हा उमलली. खरं तर, आता त्या दोघांत मित्रांहून अधिक, म्हणजे, भावांसारखे बंध निर्माण झाले होते. एकांतात ते अजूनही एकमेकांना विद्यार्थीदशेतील नावानेच संबोधत असत.
‘ही चांगली कल्पना नाही असं तुला का वाटतं, दिवोदास?’ कौशिकनं विचारलं. विचारताना उत्तेजित झाल्यामुळे त्याचं भक्कम शरीर नेहमीसारखं पुढे झुकलं होतं. कौशिक म्हणाला ‘त्यांचे वानरांबद्दल पूर्वग्रह आहेत. भारताच्या भल्याकरिता म्हणून आपण या पूर्वाग्रहांना आव्हान द्यायला हवं.’
दिवोदासनं डोकं हालवलं. त्याचवेळी त्याच्या लक्षात आलं की, या विषयावर पुढे कोणताही संवाद घडणं शक्य नाही. कौशिकच्या हट्टी आणि आग्रही स्वभावाचा विरोध करणं त्यानं कधीचंच सोडून दिलं होतं. त्याच्याशी वाद घालणं म्हणजे मुंग्यांच्या वारुळावर डोकं आपटण्यासारखं होतं, आणि अर्थातच ते बरं नव्हतं.
शेजारीच ठेवलेला एक मातीचा गडू त्यानं उचलला. त्यात बुडबुडे येत असलेला पांढऱ्या रंगाचा द्राव होता. एका हातानं नाक दाबून धरून एका घोटात त्याने तो द्राव घशाखाली लोटला. मग म्हणाला, ‘याक्!’
कौशिकला प्रचंड हसू आलं. आपल्या मित्राच्या पाठीवर थोपटत त्यानं स्वतःला हास्याच्या त्या पुरात वाहू दिलं. ‘इतक्या वर्षांनंतरसुद्धा याची चव काही बदलली नाही. अजूनही यातून घोड्याच्या मूत्रासारखा वास येतोय!’
दिवोदासने हाताच्या मागच्या बाजूने तोंड पुसत, हसत म्हटलं, ‘तू नवीन काही तरी म्हण रे. शिवाय, हे घोड्याच्या मुतासारखं आहे असं तू कसं म्हणू शकतोस? तू कधी घोड्याचं मूत प्यायलायस का?’
कौशिक गडगडाटी हसला. मग त्यानं आपल्या मित्राच्या खांद्यावर हात टाकला. थोडा वेळ ते खडकावर काहीही न बोलता बसून राहिले. समोरून शांत वाहात असलेली कावेरी नदी पाहात राहिले. त्यांचं गुरुकुल असलेलं मयुरम् खेडं समुद्रापासून जवळ होतं. एका विस्तृत गुरुकुलासाठी ही जागा आदर्श होती. या गुरुकुलात शेकडो छोटे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत. याहून महत्वाचं म्हणजे, या ठिकाणी ज्ञानाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उच्च शिक्षणाची सोयही होती. समुद्रकिनारी असल्यामुळे उत्तरेच्या सप्त सिंधू प्रदेशातील बऱ्याच विद्यार्थ्यांना पूर्वेकडील समुद्रमार्गे येथे पोहोचणं सोयिस्कर पडत असे. अशा रीतीने उत्तरेकडून दक्षिणेकडे येण्यासाठी त्यांना नर्मदा नदी ओलांडावी लागत नसे. कारण नर्मदा नदी ओलांडणं निषिद्ध मानलं जाई. लोकांच्या मनात अशी भावना- अंधश्रद्धाच होती की नर्मदा नदी ओलांडायची वेळ आपल्यावर कधीच येऊ नये. शिवाय हे स्थान पाण्याच्या उदरात गडप झालेल्या पूर्व इतिहासकालीन संगमतमिल क्षेत्राच्या जवळच होतं. संगमतमिल क्षेत्र आणि पश्चिम भारतातील द्वारका क्षेत्र ही दोन क्षेत्रे वैदिक संस्कृतीतील दोन प्रमुख क्षेत्रे होती. त्यामुळेही या गुरुकुलाचे क्षेत्र विद्यार्थ्यांना विशेष पवित्र वाटत असे.
काहीतरी उपाय शोधत असल्यासारखे दिवोदासने आपल्या खांद्यावरून हात फिरवले.
आपल्या मित्राच्या विक्षेपांचे अर्थही कौशिकला कळत असत. त्यामुळे त्याने दिवोदासला विचारले, ‘काय?’
बोलण्याआधी दिवोदासने एक खोल श्वास घेतला. यानंतरचा संवाद थोडा कठिण जाणार आहे या चा त्याला अंदाज होता. पण त्यानं प्रयत्न करून पाहाण्याचं ठरवलं. तो म्हणाला, ‘कौशिक, ऐक माझं. त्रिशंकूला तू मदत करू इच्छितोस हे मला ठाऊक आहे. आणि मी तुझ्याशी सहमतही आहे. त्याला मदतीची गरज आहे हे सुद्धा खरंय. चांगला माणूस आहे तो. फारसा प्रगल्भ नसेल, आणि भाबडाही असेल पण, तो चांगला माणूस आहे हे निश्चित. पण तो वायूपुत्र बनू शकत नाही. तो त्यांच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला. त्याला हे स्वीकारावंच लागेल. तो कसा दिसतो किंवा त्याचा जन्म कुठे झाला याच्याशी याचा काहीही संबंध नाही. त्याच्या क्षमतेबद्दल बोलतोय मी.’
वायुपुत्र ही महादेवांची वंशज जमात होती. भारताच्या पश्चिम सीमेपलीकडे बऱ्याच दूर त्यांची वस्ती होती. त्या वस्तीचं नाव होतं, परीहा. विष्णूच्या पुढील अवतारात, ते जेव्हा अवतरित होतील तेव्हा, त्यांना मदत करण्याची जबाबदारी वायूपुत्रांवर होती. आणि अर्थातच, जगातील पापाचं पारडं जड झाल्यानंतर त्यांच्यापैकीच एक पुढील महादेव बनणार होता.
कौशिकच अंग ताठरलं. तो म्हणाला, ‘तुला ठाऊकच आहे की वायूपुत्र वानरांचे विरोधी आहेत.’
वानरांची मोठी जमात होती. कावेरी नदीच्या उत्तरेला असलेल्या मोठ्या कृष्णा नदीला येऊन मिळणाऱ्या तुंगभद्रा या उपनदीच्या किनारी त्यांची वस्ती होती. या मोठ्या जमातीतील लोक शक्तीशाली असले तरी एकांतप्रिय होते. या जमातीच्या लोकांच्या शरीराची ठेवण वेगळीच असल्यामुळे ते इतर लोकांत उठून दिसत असत. कमी उंची, भक्कम बांधा आणि पिळदार शरीरयष्टी यामुळे त्यांच्यातील काही लोक राक्षसासारखे वाटत. त्यांच्या चेहऱ्यावर असलेली लव हनुवटीवर झुपकेदार दाढीचं रूप घेत असे. त्यांच्या ओठांवरचा आणि ओठांखालचा भाग थोडा पुढे आलेला होता. त्या भागावरील त्वचा अत्यंत नरम आणि केशविरहित असे. त्यांच्या शरीरावर सर्वत्र दाट केस असत. पूर्वाग्रह बाळगणाऱ्या काही लोकांना या जमातीतील लोक वानरांसारखे वाटत आणि म्हणून त्यांना वाटे की ते मानवांहून कमी दर्जाचे आहेत. पुढे परिहांच्या पश्चिमेलासुद्धा अशाच एका जमातीची वस्ती असल्याचे बोलले जात असे. या लोकांची सर्वात मोठी आणि प्राचीन वस्ती नियानदरथल किंवा नियानदरच्या दरीत होती.
‘तू कोणत्या असहिष्णुतेबद्दल सांगतोयस?’ दिवोदासनं हात उचलून विचारलं. ‘त्या लोकांनी बाल मारुतीला आपल्य जमातीत सामील करून घेतलं, होय ना? मारूतीसुद्धा वानर जमातीचाच आहे, होय ना? पण, त्याच्यात खूप गुण आहेत. त्रिशंकुमध्ये कोणताही गुण नाही!’
पण कौशिक पराजय पत्करणाऱ्यांपैकी नव्हता. तो म्हणाला, ‘पण त्रिशंकु माझ्याशी ईमानदार होता. त्याने माझ्याकडून मदत मागितली आणि मी त्याला मदत करणार आहे.’
‘पण कौशिक, तू आणखी एका परिहाची निर्मिती कशी करणार आहेस? हा काही फार शहाणपणाचा मार्ग .....’
‘मी त्याला शब्द दिलाय, दिवोदास. तू मला मदत करणार आहेस की नाहीस?’
‘कौशिक, मी तुला नक्की मदत करणार आहे. पण बाबारे, ऐक माझं....’
अचानक त्यांना दूरवरून एका स्त्रीचा आवाज ऐकू आला, ‘एऽऽ दिवोदास!’
कौशिक आणि दिवोदास आवाजाच्या दिशेनं वळले. तो आवाज नंदिनीचा होता. नंदिनीसुद्धा गुरुकुलात अध्यापिका होती. ती या दोघांची मैत्रीण होती. कौशिकने काळवंडलेल्या, जखमी नजरेनं दिवोदासकडे पाहिलं, त्यावेळी तो अतिशय हळू आवाजात दात खात होता.
‘गुरुवर्य...’
विश्वामित्रांचे डोळे खाड्कन उघडले. जवळ जवळ शतकभर आधीच्या, प्राचीन आठवणींत गुरफटलेलं त्यांचं मन पटकन् भानावर येऊन वर्तमानात शिरलं.
‘आपणास तसदी देतोय त्याबद्दल माफ करा गुरुवर्य,’ हात जोडून समोर उभे असलेले अरिष्टानेमी बोलत होते, ‘विद्यार्थी गोळा झाले की मी येऊन आपणांस सांगावं असं आपण मला सांगितलं होतंत.’
विश्वामित्र उठून बसले. उत्तरीय खांद्यावर टाकता टाकता त्यांनी विचारलं, ‘सीता आहे का?’
‘होय, गुरुवर्य!’
एका कोनाड्यात मांडलेल्या खुर्चीवजा आसनावर श्वेतकेतु बसले होते. आपल्य गुरुकुलातील सगळे – पंचवीस विद्यार्थी समोरच्या चौकात उपस्थित झालेले पाहून त्यांना आनंद वाटत होता. मुख्य पिपंळाच्या झाडाच्या बुंध्याभोवती बांधलेल्या पारावर विश्वामित्र बसले होते. ते अध्यापकांच्या बसण्याचं स्थान होतं. आज महान मलयपुत्र प्रमुख विश्वामित्र श्वेतकेतुंच्या गुरुकुलातील मुलांचा एकच का होईना, वर्ग घेणार होते. श्वेतकेतु आणि त्यांच्या शिष्यवर्गासाठी ही एक दुर्मिळ संधी होती.
गुरुकुलातील अध्यापक आणि मलयपुत्र श्वेतकेतुंच्या मागे शांतपणे उभे होते.
विश्वामित्रांनी विचारलं, ‘भारताच्या महान राज्यांबद्दल तुम्ही काही शिकलात का? त्यांच्या उदय आणि ऱ्हासाची कारणं जाणून घेतली का?’
सर्व शिष्यांनी होकारार्थी माना डोलावल्या.
‘ठीक आहे. मग कुणी मला सांगेल का, की, सम्राट भरतांच्या उत्तराधिऱ्यांच्या राज्यांचा ऱ्हास कशामुळे झाला? कित्येक शतके राज्य करणाऱ्या या वंशाचा केवळ दोन पिढ्यांच्या काळात ऱ्हास का झाला?’
काम्ल राजने हात वर केला. स्वेतकेतुंच्या तोंडून नाराजीचा हलका स्वर उमटला.
‘सांग,’ विश्वामित्र म्हणाले.
‘गुरुवर्य,’ काम्ल म्हणाला, ‘त्यांच्यावर विदेशी लोकांनी हल्ला केला. त्याच वेळी त्यांच्या राज्यात अंतर्गत उठावही झाला.
आम्ही खेळतो त्या गोट्यांसारखे होते ते. सर्व दिशांनी सर्वजण त्यांना एकापाठोपाठ एक मारत होते. सात राज्य किती काळ तग धरून रहाणार?’
एवढं बोलता बोलता, मानवी इतिहासात श्रेष्ठ दर्जाचा विनोद आपणच केला अशा थाटात काम्ल अचानक खो खो हसू लागला. इतर सर्व जण सांत झाले. मागे बसलेल्या काही विद्यार्थ्यांनी शरमून आपापल्या माना खाली घातल्या. थिजल्या नजरेनं विश्वामित्र काम्लकडे पाहात राहिले. श्वेतकेतुंच्या चेहऱ्यावरही तोच भाव आला होता.
पुन्हा एकदा काम्लला त्याच्या पालकांकडे परत पाठविण्याचा विचार श्वेतकेतुंच्या चेहऱ्यावर आला. काम्ल खरोखर विक्षिप्त होता. कोणत्याही प्रकारे त्याला प्रशिक्षित करणं अशक्य होतं.
विश्वामित्रांनी काम्लच्या मस्करीची दखल घेण्याची गरज मानली नाही. त्यांनी पुन्हा एकदा आपला प्रश्न उच्चारला. यावेळी प्रश्न विचारताना ते सीताकडे पाहात होते. पण मिथिलेच्या राजकन्येनं उत्तर दिलं नाही.
सीतेचं गुरुकुलातील “भूमी” नाव उच्चारत विश्वामित्रांनी तिला विचारलं, ‘तू का उत्तर देत नाहीस?’
‘कारण मला याचं नेमकं उत्तर ठाऊक नाहीय, गुरुवर्य,’ सीता म्हणाली.
‘इकडे ये पोरी,’ पहिल्यओळीत बसलेल्या सीतेकडे बोट करून विश्वामित्र म्हणाले.
यावेळी मिथिलेला जाऊन आल्यापासून सीता नेहमी एकटी एकटीच रहायची. बहुतेक वेळा ती वर्गात मागल्या बाकावर बसायची. राधिकेनं तिच्य पाठीवर ताप मारली आणि तिला पुढए जाण्याची खूण केली. ती पुढे आली तशी विश्वामित्रांनी तिला समोर बसण्याची खूण केली. मग त्यांनी तिच्या डोळ्यात टक लावून पाहिलं. विश्वामित्रांसह फार कमी ऋषींना डोळ्यांत पाहून लोकांचं मन वाचण्याची कला अवगत होती.
‘मला सांग,’ ते म्हणाले, त्यांचे डोळे सीताच्या मनाचा थांग घेत होते, ‘सम्राट भरतांच्या उत्तरवर्ती राजांचा अचानक ऱ्हास कशामुळे झाला?’
सीताला खीप अस्वस्थ वाटू लागलं. उठून पळून जावं असं तिला अत्यंत तीव्रतेनं वाटू लागलं. पण आपण महर्षींचा असा अपमान करू शकणार नाही हे तिला ठाऊक होतं. तिने शेवटी त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं ठरवलं. ती म्हणाली, ‘भरताच्या उत्तराधिकारी राजांजवळ मोठी सेना होती. मोठमोठ्या लढाया लढून त्यांना विजय मिळविता आला असता. पण त्यांचे सैनिक.....’
‘ते निरुपयोगी होते,’ सीतेच्या मनातील विचार ओळखून विश्वामित्र म्हणाले, ‘आणि ते का निरुपयोगी ठरले? त्यांना पैशांची, प्रशिक्षणाची, साधनांची, शस्त्रास्त्रांची, इतर साधनांची अजिबात कमतरता नव्हती.’
समीची एकदा जे म्हणाली तीत्याच सीताने पुनरुच्चार केला. ती म्हणाली, ‘शस्त्र नव्हे, ते शस्त्र उगारणाऱ्या स्त्रीचं महत्व असतं.’
विश्वामित्र होकारार्थी हसले. म्हणाले, ‘आणि त्यांचे योद्धे शस्त्र उगारण्यास असमर्थ का होते? त्यांच्या शत्रूकडे असणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या तुलनेने त्यांच्या जवळील शस्त्रास्त्रे अत्यंत उच्च तंत्रज्ञानावर आधारित होती हे लक्षात असू दे.’
सीताने याबद्दल विचार केलेला नव्हता. ती शांत राहिली.
विश्वामित्रांनी तिला दुसरा प्रश्न विचारला, ‘भरतांच्या उत्तराधिकारी राजांच्या ऱ्हाससमयीच्या सामाजिक स्थितीचं वर्णन कर.’
सीतेला या प्रश्नाचं उत्तर ठाऊक होतं. ती म्हणाली, ‘अतिशय शांत होतं. समाज उदार आणि सुसंस्कृत होता. कला, संगीत, संवाद, वाद-विवाद सगळ्यांच्या भरभराटीचा काळ होता तो.... अहिंसेच्या तत्वानुसार ते नुसत वागत नसत तर ते त्याचा अभिमानानं उत्सवही साजरा करत असत. अहिंसा शारीरिकच नव्हे तर वाणीचीसुद्धा पाळत. त्याकाळचा समाज अत्यंत आदर्श समाज होता. स्वर्गच जणू.’
‘हो. पण काही लोकांसाठी हा स्वर्गच जणू नरक होता.’
यावर सीता काही बोलली नाही. पण तिला आश्चर्य वाटत राहिलं-
कुणासाठी?
मोठ्यानं बोलल्यानंतर जसं तिचं मन इतरांना समजलं असतं तसंच विश्वामित्रांना तिचं मन स्वच्छ कळलं. ते म्हणाले, ‘योद्धे?’
‘योद्ध्यांचे मुख्य गुण काय असतात? त्यांच्या गुणांना कशामुळे हाक मिळते? कशामुळे ते प्रेरित होतात? कित्येकजण सन्मानासाठी लढतात, देशासाठी लढतात, न्यायासाठी लढतात. पण याचबरोबर असेही काही जण असतात ज्यांना कुणाला ठार मारण्यासाठी सामाजिक मान्यतेचा मार्ग हवा असतो. अशा लोकांना जर एक मार्ग मोकळा करून दिला गेला नाही तर ते सहज गुन्हेगारीकडे वळतात. मानवतेनं ज्यांना गौरविलं आहे असे कित्येक महान योद्धे असामाजिक तत्व म्हणून नंतर ओळखले जाण्यापासून थोडक्यात बचावलेले आहेत. त्यांना गुन्हेगार बनण्यापासून कुणी वाचवलं?कुणी त्यांना सैनिक बनवलं? याचं उत्तर आहे – योद्ध्यांच्या कायद्याची संहिता: मारण्यासाठी
योग्य
कारण.’
ठळक गोष्टी सोडून सूक्ष्म गोष्टी समजून घेणं मुलांसाठी फार अवघड असतं. हे ऐकून केवळ 13 वर्षांची सीता गुदमरली नसती तरच नवल.
‘प्रशंसा आणि प्रतिमा पूजनानं योद्ध प्रेरित होतात. यांचा अभाव असेल तर लढवय्येपण आणि योद्ध्यांची कायद्याची संहिता किंवा त्यांचा न्याय निष्प्रभ ठरतात, मृत होतात. सम्राट भरतांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या समाजात लोक सैनिकांचा तिरस्कार करू लागले होते. त्यांच्याबद्दल निषेध व्यक्त करू लागले होते. हे दुःखद होतं. सेनेच्या प्रत्येक कृतीवर टीका केली जाऊ लागली. कोणत्याही तऱ्हेच्या हिंसेचा, धार्मिक हिंसेचासुद्धा विरोध होऊ लागला. योद्ध्याच्या वीरश्रीला कमी लेखलं जाऊ लागलं. राक्षसी आवेश म्हणून हेटाळणी केली जाऊ लागली. त्यांवर नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे अशी अपेक्षा केली जाऊ लागली. शाब्दिक हिंसा टाळण्यासाठी बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जाऊ लागली. असहमती हतोत्साहित केली गेली. अशा रीतीने, शक्तीला शक्तीहीन बनवून आणि क्षीणतेला शक्तीशाली बनवून स्वर्ग या धरेवर आणता येईल असं सम्राट भरतांच्या उत्तराधिकाऱ्यांना वाटू लागलं होतं.’
पुढे बोलताना ते केवळ सीताशीच बोलत आहेत अशा रीतीने त्यांचा स्वर नरम झाला. पण तिथे जमलेले सगळेच त्यांचा शब्द न् शब्द लक्ष देऊन ऐकत होते.
सम्राट भरतांच्या उत्तराधिकाऱ्यांनी आपल्याकडील क्षत्रियांचं मतपरिवर्तन घडवून आणलं होतं. पौरुषत्वाला त्यांनी अपौरुषेय बनविलं. इतिहासातील संपूर्ण अहिंसेचा उपदेश देणाऱ्या ऋषींच्या महानतेचे गोडवे गायले गेले. त्यांच्या उपदेशाचा प्रचार-प्रसार केला गेला. पण पुढए जेव्हा विदेशी क्रूर शासकांनी हल्ले केले तेव्हा हे शांततावादी, अहिंसावादी सम्राट भरतांचे उत्तराधिकारी लढण्यासाठी, हल्लेखोर, क्रूर शासकांना पिटाळून लावण्यासाठी नालायक, निरुपयोगी ठरले. असमर्थ ठरले. बाहेरून येऊन आक्रमण करणाऱ्या योद्ध्यांपुढे हे सुसंस्कृत लोक शक्तीहीन, नेभळट ठरले.’ उपरोधाचे हसू हसत विश्वामित्र म्हणाले, अपेक्षेविरुद्ध भरतांच्या शांतीप्रिय समाजाच्या प्रेमाच्या संदेशाला
हिरण्यलोमन म्लेच्छ
योद्ध्यांनी भीक घातली नाही. प्रेमाला उत्तर म्हणून त्यांनी सामूहिक कत्तली केल्या. ते पाशवी लोक होते. स्वतःचं साम्राज्य उभं करण्याचं कर्तृत्व त्यांच्यात नव्हतं. पण त्यांनी सम्राट भरतांनी निर्माण केलेलं साम्राज्य, प्रतिष्ठा आणि त्यांची शक्ती धुळीला मिळवली. अंतर्गत बंडाळ्यांनी विनाशाचं हे काम पूर्णत्वास नेलं.
‘गुरुवर्य, विदेशी राक्षसांशी दोन हात करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या राक्षसांची गरज लागते – असं तुम्हाला म्हणायचंय का?’
‘नाही, मला फक्त एवढंच म्हणायचंय की कोणत्याही गोष्टीची अती वाईटच. समाजानं नेहमी एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या विचारांत समतोल साधण्यासाठी प्रयत्नशील असावं. गुन्हेगारांना समाजातून घालवून द्यायला हवं. विनाकारण होत असलेल्या हिंसेला प्रतिबंध केला पाहिजे. ती थांबवली पाहिजे. आणि योद्धाभाव पाशवी होऊ नये याचं भान ठेवायला हवं. पौरुषाचा अपमान करणारा समाज जन्माला घालू नका. कोणत्याही गोष्टीच अती जीवनात असमतोल निर्माण करते. अहिंसेच्या गुणाबाबतही हे सत्य आहे. बदलाचे वारे कधी वाहू लागतील याचा काही नेम नसतो. अहिंसा उत्तमच आहे. पण रक्षण करण्यासाठी किंवा कधी स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठीसुद्धा हिंसेचीही गरज पडू शकते.’
वातावरण चिडीचिप्प शांत होतं.
संवाद ज्या दिशेनं नेला त्यासंदर्भात प्रश्न विचारण्याची वेळ आली होती.
विश्वामित्रांनी प्रश्न विचारला, ‘सप्त सिंधू प्रदेशही अशा एखाद्या
अती
च्या आहारी गेला आहे का की ज्यामुळे रावण त्यांना युद्धात हारवू शकला?’
सीतेनं या प्रश्नावर काळजीपूर्वक विचार केला. ती म्हणाली, ‘हो, व्यापार करणाऱ्यांविषयी राग आणि तिरस्कार बाळगला!’
‘बरोबर! त्यांच्या योद्ध्यांतील काही राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे भरताच्या कुळातील व्यक्तींनी क्षत्रियांच्या जीवनशैलीवर, त्यांच्या जीवनावर घाला घातला. त्यांनी अहिंसा रक्तात भिनवली. काही समाज असेही आहेत ज्यांनी ब्राह्मणी जीवनपद्धतीवर हल्ले केले. अभिमानानं बुद्धिवादाचा विरोध केला. काही ब्राह्मण संकीर्ण मनाचे, उच्चभ्रुतावादी आणि श्रेष्ठत्ववादी बनले होते. याचप्रमाणे आपल्या आजच्या युगातील सप्त सिंधू प्रदेशातील लोक त्यांच्यापैकी काही वैश्य जेव्हा स्वार्थी, भपकेबाज आणि लोभी बनले तेव्हा व्यापाराकडेच तुच्छतेच्या भावनेने पाहू लागले. हळूहळू आपण आपल्या समाजातील वाईट रीतीने पैसा मिळविलेल्या भांडवलदारांकडून काढून व्यापार इतरांच्या ताब्यात दिला. कुबेर आणि पुढे रावण यांनी हळूहळू आपली संपत्ती जमवली आणि हळूहळू आर्थिक ताकदीचा ओघ आपोआप त्यांच्या दिशेनं वाहू लागला. करछपची लढाई हा केवळ एक बाह्याचार होता ज्यामुळए ऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या कलांवर शिक्का मारला गेला. समाजाने नेहमी संतुलन साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजाला बुद्धिवाद्यांची योद्ध्यांची, व्यापाऱ्यांची, कलाकारांची – सगळ्यांचीच गरज असते. जर समाजात यापैकी एखाद्य समूहाला जास्त महत्व दिलं गेलं किंवा एखाद्या समाजाला अत्यंत गौण मानलं गेलं तर तो समाज नक्कीच गोंधळाच्य दिशएनं पावलं टाकत असतो.’
आपल्या वडिलांच्या एका धर्मसभेत जे ऐकलं होतं ते सीताला यावेळी आठवलं, ‘माझा केवळ उपयुक्ततावादावर विश्वास आहे.’
हे एका चार्वाक तत्वज्ञान्यानं म्हटलं होतं.
विश्वामित्रांनी विचारलं, ‘तुम्ही चार्वाकांचं तत्वज्ञान मानता का?’
या तत्वज्ञानाच्या पद्धतीचं नाव त्यांच्या प्राचीन गुरूच्या नावावरून दिलं गेलं होतं. चार्वाक अनीश्वरवादी होते आणि त्यांचा ईहवादावर विश्वास होता. गंगेच्या मुखाजवळ, गंगोत्रीनजीक त्यांचं वास्तव्य होतं. शरीराच्या माध्यमातून जे काही अनुभवलं जातं केवळ त्यावरच चार्वाकांचा विश्वास होता. त्यांच्या मते आत्मा ही नसतो आणि देवही नसतात. त्यांचं म्हणणं होतं की, सत्य केवळ आपलं शरीर असतं, पंचतत्वांनी बनलेलं. शरीर मेल्यानंतर पुन्हा पंचतत्वात विलीन होतं. ते प्रत्येक क्षण जगत असत, जीवनाचा आनंद लुटत असत. त्यांचे प्रशंसक त्यांना उदार, व्यक्तीवादी आणि कुणाहीबद्दल ग्रह न बाळगणारे मानत असत. तर त्यांच्यावर टीका करणारे त्यांना अविवेकी, स्वार्थी आणि गैरजबाबदार मानत असत.
नाही गुरुवर्य, मी कट्टर चार्वाक समर्थक नाही. मी जर उपयुक्ततावाद मानत असेन तर मला तत्वज्ञानाच्या
सर्व
शाखांबद्दल उदार दृष्टीकोण असायला हवा. त्यातून आपल्याला पटत असलेल्या भागांचाच फक्त मी स्वीकार करायला हवा. आणि ज्या गोष्टी पटत नाहीत त्य अस्वीकृत करायला हव्यात. माझं कर्म पूर्णत्वाला नेण्यासाठी उपयुक्त असणारं कोणतंही तत्वज्ञान मी स्वीकारायला हवं.
विश्वामित्र हसले.
चलाख! तेरा वर्षे वयाच्या मुलीच्या मानानं ही मुलगी खूप बुद्धीमान आहे.