श्वेतकेतुंच्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या रहाण्याची जागा आश्रमातील एकूण व्यवस्थेशी मिळतं-जुळतं घेणारी, अत्यंत मितव्ययी होती. प्रत्येक विद्यार्थ्याला खिडकी नसलेली, मातीची झोपडी दिलेली होती. अत्यंत छोट्या अशा या कुटीत झोपण्यासाठी जेमतेम एक छोटा पलंग मावत असे. त्याशिवाय कपडे टांगण्यासाठी काही खुंट्या, अभ्यासाचं साहित्य ठेवण्याची जागा तेथे होती. या झोपड्यांना दरवाजे नव्हते. जाण्या-येण्यासाठी मार्ग होते.
आदल्या दिवशी मलयपुत्रांच्या जहाजावर घडलेल्या घटना आठवत सीता आपल्या कुटीत अंथरुणात पडली होती.
तिच्या हातात आदल्या दिवशी विश्वामित्रांनी तिला दिलेली चांदीची सुरी होती. हात कापला जाण्याची शक्यता नव्हती कारण सुरी म्यानेत होती. पुन्हा पुन्हा तिची नजर त्या सुरीच्या मुठीकडे जात होती, मुठीवर कोरलेल्या सुंदर चित्रावर रेंगाळत होती.
‘विष्णू?’
‘मी?’
विश्वामित्र म्हणाले होते लवकरच तिचं प्रशिक्षण सुरू होईल. काही महिन्यांतच ती गुरुकुल सोडून जाण्याएवढी मोठी होणार होती. त्यावेळी ती अगस्त्यकूटम् येथे जाणार होती. अगस्त्यकूटम् ही भारताच्या दक्षिण टोकाजवळ असलेली मलयपुत्रांची राजधानी होती. त्यानंतर वेषांतर करून ती भारतभर भ्रमण करणार होती. तिला जी भूमी मिळणार होती ती तिने जाणून घ्यावी आणि तिचे नेतृत्व करावे अशी विश्वामित्रांची इच्छा होती. हे उद्दीष्ट साधण्यासाठी मलयपुत्रांच्या साथीने ते तिची मदत करणार होते. दरम्यानच्या काळात सीता आणि विश्वामित्र मिळून नव्या तऱ्हेने जीवन जगण्याची वाट ठरविण्यासाठी एक आराखडा बनविणार होते.
हे सगळंच अतिशय मोठं आणि गोंधळवून टाकणारं होतं.
‘राजकुमारी...’
सीता अंथरुणातून उठून दारापाशी आली. थोड्या अंतरावर जटायू उभे होते. त्यांनीच तिला हाक मारली होती.
‘राजकुमारी,’ ते पुन्हा म्हणाले.
सीतेनं दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला. म्हणाली, ‘मी आपल्या छोट्या बहिणीसारखी आहे, जटायू. कृपया मला लाजवू नका. मला माझ्या नावानंच हाक मारा.’
‘नाही, मी असं करू शकणार नाही, राजकुमारी. आपण आमच्या....’
जटायू पुढे काहीही बोलले नाहीत. मलयपुत्रांना कडक सूचना दिल्या गेल्या होत्या. सीता आपली पुढील विष्णू आहे असं बोलायची सक्त मनाई होती. योग्य वेळी याबाबतची घोषणा केली जाणार होती. सीतेलाही याबाबतीत कुणाशीही काहीही बोलण्याची मनाई होती. ती बोलली नसतीच, तरी. सीता खूपच अस्वस्थ आणि चिंतातुर होती. या पद्धतीनं नेमकं काय होईल हा विचार मनात आला की तिला थोडी भीतीयुक्त हुरहुर वाटे.
‘ठीक आहे तर मग, आपण मला आपली बहीण म्हणू शकता!’
जटायू हसले. ‘हे ठीक आहे, ताई.’
‘आपल्याला माझ्याशी कशाबद्दल बोलायचं होतं, जटायू?’
‘आता आपला हात कसा आहे?’
हसत हसत सीतेनं कडुलिंबाचा लेप लावून बांधलेल्या हाताला दुसऱ्या हाताने स्पर्श केला. ‘रक्त काढण्याच्या बाबतीत मी जरा जास्तच उत्साही होते,’ ती म्हणाली.
‘हो,’
‘आता मी ठीक आहे.’
‘ऐकून बरं वाटलं,’ जटायू म्हणाले. ते थोडे बुजरे होते. मोठा श्वास घेऊन ते पुढे म्हणाले, ‘मलयपुत्रांव्यतिरिक्त केवळ तूच अशी एक व्यक्ती आहेस जिने विश्वामित्रांनी सांगितलेलं नसतानासुद्धा माझ्या बाबतीत दयाळूपणा दाखवला.’
काही महिन्यांअगोदर सीतेनं जटायूंना थोडं अन्न खाऊ घातलं होतं, कारण त्यांना पाहून त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या उदात्त गिधाडाची तिला आठवण आली होती ज्यानं तिचा जीव वाचवला होता. पण तिने ही गोष्ट स्वतःपुरतीच ठेवली.
‘या नव्या परिस्थितीबद्दल तुझी अजून नीट खात्री पटलेली नाही असं दिसतंय,’ जटायू म्हणाले, ‘थोडं गोंधळून जाणं साहजिक आहे.’
त्यांनी सीतेला एक गोष्ट सांगितली नव्हती की विष्णूच्या पदासाठी विश्वामित्रांनी केलेल्या सीतेच्या निवडीबाबत काही मलयपुत्रांच्या मनातसुद्धा शंका आहेत. पण त्यांच्यापैकी कुणीही आपल्या कोपिष्ट प्रमुखाच्या निवडीला उघडपणे आव्हान देण्यास तयार नव्हतं.
सीताने केवळ मान हालवली.
‘मलयपुत्रांव्यतिरिक्त इतर कुणाशीही तू याबाबतीत बोलू शकत नाहीस. त्यामुळेसुद्धा तुला कदाचित हे अवघड जात असेल.’
‘हो,’ सीता हसतमुखानं म्हणाली.
‘तुला जर कधी माझा सल्ला घ्यावासा वाटला, किंवा कुणाशीतरी बोलावं असं वाटलं तर मी आहेच, हे विसरू नकोस. आत्तापासून तुझं रक्षण करणं हेच माझं कर्तव्य आहे. माझी पलटण आणि मी कायम तुझ्या आसपास राहू,’ मागे संकेत करत जटायू म्हणाले.
त्यांच्यामागे काही अंतरावर पंधरा माणसं शांतपणे उभी होती.
‘मिथिलेत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी सार्वजनिकपणे उघड करून मी तिला संकोचात टाकणार नाही,’ जटायू म्हणाले, ‘मी नागा आहे हे मला ठाऊक आहे. पण मी कधीही केवळ काही तासांच्या रपेटीच्या अंतरावर असेन. आजपासून मी आणि माझी माणसं सावलीसारखी तुझ्या सोबत असू.’
‘आपण मला कधीही संकोचात टाकणार नाही, जटायू,’ सीता म्हणाली.
‘सीता!’
मिथिलेच्या राजकन्येनं डाव्या बाजूला पाहिलं. अरिष्टानेमी तेथे उभे होते.
‘सीता,’ अरिष्टानेमी म्हणाले, ‘गुरुवर्यांना तुझ्याशी बोलायचं आहे.’
‘माफ करा, जटायू मला,’ खिन्नपणाने हात जोडून सीता म्हणाली.
जटायूंनी सीतेच्या नमस्काराला नमस्कारानं उत्तर दिलं. मग सीता अरिष्टानेमींमागून निघाली. ती जेव्हा दिसेनाशी झाली, तेव्हा जटायूंनी खाली वाकून सीता जेथे उभी होती त्या जागची माती उचलून कपाळाला लावली. मग वळून ते सीता ज्या दिशेनं गेली होती त्या दिशेने चालत निघाले.
किती चांगली आहे ती.....
गुरु विश्वामित्र आणि गुरु वशिष्ठांमधल्या लढाईत राजकुमारी हुकुमाचं पान बनून राहू नयेत म्हणजे झालं.
या घटनेला दोन महिने उलटून गेले होते. मलयपुत्र आपल्या अगस्त्यकूटम् या राजधानीत निघून गेले होते. तिला सांगितल्याप्रमाणे आता सीतेचा जास्तीत जास्त वेळ वाचनात जाई. मलयपुत्रांच्या प्रमुखांनी तिला ही पुस्तकं दिली होती. त्यांनी नृसिहं, वामन, परशुराम इत्यादि आधीच्या काही विष्णूंच्या जीवनातील घटनांची नोंद करून ठेवलेली होती. त्यांच्या जीवनात त्यांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागला, त्यावर त्यांनी कशी मात केली आणि उत्तमाचा मार्ग प्रशस्त कसा केला हे त्यातून सीताने शिकावं अशी त्यांची अपेक्षा होती.
सीताने हे काम अतिशय गंभीरपणे स्वीकारलं आणि गुप्तपणे ती यावर काम करू लागली. आज ती एका छोट्या तलावाजवळ बसली होती. या ठिकाणी इतर विद्यार्थी फारसे येत नसत. म्हणूनच व्यवधान आलं तेव्हा तिने चिडून पाहिलं.
राधिका होती तिथे. सीतेला गुरुकुलातील नावाने संबोधत ती म्हणाली, ‘भूमी, तुला लगेच मुख्य पटांगणात यावं लागेल. तुमच्या घरून कुणी तरी आलंय.’
त्रासलेल्या सीतेनं हात उंचावून तिला म्हटलं, ‘आलेच मी.’
‘सीता!’ राधिकेनं मोठ्या आवाजात हाक दिली.
सीतेनं मागे वळून पाहिलं. तिची मैत्रीण त्रासलेली दिसत होती. तिची नाराजी तिच्या आवाजातसुद्धा उमटलेली होती. ती चिडचिड करत म्हणाली, ‘तुझी आई आलीय, तुला यावं लागेल, आत्ता.’
सावकाश चालत सीता गुरुकुलाच्या पटांगणाच्या दिशेने निघाली. तिचं हृदय मोठमोठ्यानं धडधडत होतं. पायवाटेजवळच्या झाडाला दोन हत्ती बांधलेले तिने पाहिले. तेथूनच पुढे गुरुकुलात जाण्यासाठीचा लहान धक्का होता. सोबत हत्ती आणणं आपल्या आईला आवडतं हे सीतेला ठाऊक होतं. सुनयना येत तेव्हा त्या आणि सीता दाट जंगलात आतपर्यंत हत्तीवरून फेरी मारून येत असत. त्यांच्या नैसर्गिक घरकुलातच प्राण्यांबद्दलची माहिती सीतेला देणं सुनयनांना आवडे.
आतापर्यंत सीतेची ज्यांच्याशी भेट झाली होती त्या सर्व लोकांपेक्षा सुनयनांना प्राण्यांबद्दलची अधिक माहिती होती. जंगलात आईबरोबर फिरायला गेल्याच्या आठवणी सीतेच्या जीवनातील खूप आनंददायी आठवणी होत्या. धरती माता आणि आपली माता.
तिच्या मनात वेदनेची एक लकेर उमटली.
तिच्यामुळे कुशध्वजाने मिथिलेशी होणाऱ्या व्यापारावर कडक निर्बंध लादले होते. तिच्या काकांचं सांकश्य राज्य तिच्या वडिलांच्या मिथिला राज्यातील व्यापाराचं प्रमुख केंद्र होतं. परिणामी बहुतेक वस्तुंच्या, अगदी जीवनावश्यक वस्तुंच्याही किंमतीत भरमसाठ वाढ झाली होती. बहुतेक मिथिलावासी यासाठी सीतेला जबाबदार मानत. तिनेच कुशध्वजाचा शाही शिक्का तोडला हे एव्हाना सगळ्यांना ठाऊक झालं होतं. म्हणून त्यांच्याकडून त्याबदल्यात अशी प्रतिक्रिया होणं स्वाभाविकच होतं. प्राचीन परंपरेनुसार राजमुद्रा ही त्या राजाचं प्रतीक मानली जात असे. म्हणून ती तोडल्यास तो राजवधासम अपराध मानला जात असे.
सीतेनं केलेल्या या गुन्ह्यासाठी तिच्या मातेला, म्हणजे राणी सुनयनांना जबाबदार ठरविण्यात आलं होतं. कारण सीतेला दत्तक घेण्याचा निर्णय राणी सुनयनांचा होता हे सर्वांना ठाऊक होतं.
मी तिला केवळ आणि केवळ दुःखच दिलंय. जन्मभर राबून तिने जे उभं केलं ते बहुतेक सगळं मी उध्वस्त केलं.
आईने मला विसरून जावं.
जंगलातील उघड्या जागी येईपर्यंत तिची ही भावना पक्की झाली होती.
राजघराण्यातील व्यक्ती आली म्हणून एरवी जमली असता त्यापेक्षा त्या ठिकाणी बरीच गर्दी जमली होती. एका भक्कम रिकाम्या पालखीभोवती आठ पुरुष जमा झाले होते. तशा प्रकारची पालखी सीतेने याआधी कधी पाहिली नव्हती. ती लांब आणि रुंद होती. त्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला गरज पडल्यास आडवं होता यावं हा कदाचित अशी पालखी बनविण्यामागील हेतू असावा. डावीकडे, अशोक वृक्षाभोवती बांधलेल्या पारावर तिला आठ स्त्रिया दिसल्या. सगळीकडे तिने आपल्या आईला शोधलं पण ती तिला कुठेच दिसली नाही.
आपली आई कुठे आहे हे विचारण्यासाठी ती त्या स्त्रियांच्या दिशेने थोडी पुढे गेली. तेवढ्यात त्यांच्यापैकी काही स्त्रिया बाजूला सरकल्या आणि राणी सुनयना तिला दिसल्या.
आपल्य आईला पाहून सीताचा श्वासच थांबला.
तिला समोर दिसत असलेली स्त्री तिच्या आईची सावली असल्यासारखी वाटत होती. तिच्या शरीरात केवळ हाडे आणि चामडेच शिल्लक होते. तिचा गोल, चद्रांसारखा चेहरा पूर्ण सुकून रोडावला होता. तिच्य गालाची हाडेसुद्धा आत रुतली होती. ती बांध्याने लहानखुरीच होती, पण कधीच रोगी वाटली नव्हती. आता तिच्या शरीराचा मांसल भाग झडून गेला होता. तिच्या शरीरावर कधी काळी असलेली थोडी चरबीसुद्धा वितळून नष्ट होऊन गेली होती. खोबणीत तिचे डोळे खोल गेले होते. तिचे सुळसुळीत, काळे, सुंदर केस विरळ आणि भुतासारखे पांढरे झाले होते. उभं रहाणंही तिला कष्टकारक वाटत होतं. उभं रहाण्यासाठी तिला आपल्या सेविकांची मदत घ्यावी लागत होती.
सुनयनांची नजर आपल्या प्राणप्रिय मुलीकडे गेली आणि त्यांचा चेहरा उजळून निघाला. सीतेला ज्यातून संरक्षण आणि दिलासा जाणवत असे ते त्यांचं स्मित मात्र अजिबात बदललेलं नव्हतं.
‘माझी पोर,’ सुनयना म्हणाल्या. त्यांचा आवाजसुद्धा अतिशय बारीक झाला होता. सीतेला तो जेमतेम ऐकू आला.
मिथिलेच्या राणीच्या मनात वात्सल्य दाटले. त्यांनी आपले बाहू पसरले. त्यांच्या चेहऱ्यावरील मृत्यूची सावली आईच्या प्रेमभरल्या हृदयानं उजळून टाकली होती.
सीता जेथे होती तेथेच खिळून उभी राहिली. धरणीने दुभंगून आपल्याला पोटात घ्यावं असं तिला वाटू लागलं होतं.
‘इकडे ये पोरी,’ सुनयना म्हणाल्या. बोलताना वर उचलले गेलेले त्यांचे हात पुन्हा थकून खाली आले आणि त्यांच्या दोन बाजूंना निर्जीव होऊन पडले.
सुनयना खोकत होत्या. एका सेविकेनं लगबगीनं पुढे होत त्यांचं तोंड रुमालानं पुसलं. पांढऱ्या कापडावर काही लाल ठिपके होते.
सीता धडपडत आपल्या आईजवळ गेली. ती झपाटल्यासारखी वाटत होती. गुडघ्यांवर बसून तिने आपलं डोकं आईच्या मांडीवर ठेवलं. पावसानंतर नरम झालेल्या जमिनीसारखी असणारी आईची मांडी आता कित्येक वर्षांचा दुष्काळ सहन केलेल्या जमिनीसारखी कडक आणि हाडकुळी झाली होती.
सुनयनांनी सीतेच्या केसांतून आपली बोटं फिरवली. केवळ शरीरालाच नव्हे तर आत्म्यालाही सावली देणारा प्रचंड वटवृक्ष कोसळताना पाहात असलेल्या चिमणीसारखी सीता भयाने आणि दुःखाने थरथरली.
सीताच्या केसांतून हात फिरवत सुनयनांनी वाकून तिच्या कपाळाचा मुका घेतला आणि त्य़ा कुजबुजल्या, ‘माझी पोर...’
सीता हमसून हमसून रडू लागली.
मिथिलेच्या राणीसोबत आलेल्या राजवैद्यांनी आवेशानं रडणाऱ्या सीतेचा दुःखावेग थोपविण्याचा प्रयत्न केला. शरीरानं जरी अत्यंत अशक्त झाल्या असल्या तरी सुनयना मनानं खंबीर होत्या. त्यांना आपल्या मुलीसोबत हत्तीच्या पाठीवर अंबारीत बसून जंगलात फेरफेटका मारण्यास कुणीही मनाई करू शकत नव्हतं.
राजवैद्यांनी आपला रामबाण उपाय योजला. ते राणींच्या कानांत कुजबुजले, ‘ही आपली कदाचित शेवटची फेरी ठरेल हत्तीवरची महाराणी!’
आणि सुनयनांनी त्यांना उत्तर दिलं, ‘म्हणूनच जायला हवं.’
दोन्ही हत्तींना तयार करेपर्यंत सुनयनांनी पालखीत आराम केला. एका हत्तीवरून राजवैद्य आणि इतर सेवकवर्ग जाणार होता आणि दुसऱ्या हत्तीवरून सुनयना आणि सीता जाणार होत्या.
सगळी तयारी झाल्यावर सुनयनांना बसलेल्या हत्तीच्या पाठीवरील हौद्यापर्यंत उचलून नेण्यात आलं. राणींसोबत एका सेविकेनं जाण्याचा प्रयत्न केला.
‘नाही!’ सुनयनांनी तिला सोबत येण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.
‘पण, महाराणी...,’ सेविका म्हणाली, तिच्या हातात एक रुमाल आणि छोटी शीशी होती. वनौषधी विरघळवून तयार केलेल्या वाफांमुळे सुनयनांची शक्ती थोड्या वेळासाठी वाढत असे.
‘माझ्यासोबत माझी मुलगी आहे,’ सुनयना म्हणाल्या, ‘मला इतर कुणाची गरज नाही.’
सीतेनं लगेच सेविकेच्या हातून शीशी आणि रुमाल घेतला आणि ती चढून हौद्यात जाऊन बसली.
सुनयनांनी माहुताला संकेत केला. त्यानं ह्त्तीच्या कानांमागे आपल्या पायानं खाजवलं. राणी सुनयनांना त्रास होऊ नये अशा रीतीने हत्ती हळुवार उठला.
‘चला, जाऊ या,’ सुनयनांनी आदेश दिला.
दोन्ही हत्ती चपळतेनं जंगलात निघाले. त्यांच्यासोबत मिथिलेचे पन्नास सशस्त्र सुरक्षा रक्षक चालत निघाले.