प्रकरण 10
हत्तीच्या सावकाश चालण्याने हौदा पाळण्यसारखा झुलत होता. सीताने आपल्या आईचा हात हातात धरून ठेवला होता आणि ती तिच्या जवळ बसली होती. माहूत हत्तींना झाडाच्या खालून, सावलीतून नेत होते. तरीही हवेतील ऊष्मा आणि कोरडेपणा जाणवत होताच.
सीता मात्र थरथरत होती. तिला अपराधी वाटत होतं आणि तिला भीतीसुद्धा वाटत होती.
सुनयनांनी हलकेच आपला हात वर उचलला. आपल्या आईला काय हवंय ते सीतेला जाणवलं. तिने सुनयनांचा हात आणखी वर उचलला आणि ती त्यांच्या कुशीत शिरली. आईचा हात तिने गळ्याभोवतून आणून खांद्यावर ठेवला. सुनयना समाधानानं हसल्या. त्यांनी सीतेच्या कपाळाचा मुका घेतला.
‘तुझे वडील येऊ शकले नाहीत याचं वाईट वाटतं, सीता,’ सुनयना म्हणाल्या, ‘त्यांना काही कामामुळे तिथेच थांबावं लागलं.’
आपली आई खोटं बोलतेय हे सीतेला ठाऊक होतं. आपल्या मुलीला आणखी दुःख व्हावं असं त्यांना वाटत नव्हतं.
कदाचित्, हेच बरोबर असावं.
कारण गेल्या वेळी मिथिलेत असताना सीताने रागाच्या भरात जनकांना सांगितलं होतं की त्यांनी अध्यात्मावर आपला वेळ व्यर्थ घालवणं थांबवायला हवं आणि राज्यकारभार चालविण्यात सुनयनांची मदत करायला हवी. हेच त्यांचं कर्तव्य होतं. पण सीतेच्या अशा बोलण्याने तिच्या वडिलांपेक्षा तिच्या आईला जास्त राग आला होता.
शिवाय, सीतेची चार वर्षे वयाची छोटी बहीण उर्मिलासुद्धा आजारी होती. बहुधा राजा जनक तिच्यासोबत मिथिलेत राहिले असावेत आणि आई श्वेतकेतुंच्या गुरुकुलात सीतेला भेटायला आली असावी. तब्बेत इतकी खालावलेली असूनसुद्धा आपल्या दुखावलेल्या मुलीला भेटण्यासाठी आणि तिला घरी नेण्यासाठी त्या आल्या असाव्यात.
सीतेनं आपले डोळे बंद केले. आणखी एक पश्चातापाचा अश्रु तिच्या गालांवर ओघळला.
सुनयना खोकल्या. लगेच सीतेनं आपल्या आईचं तोंड रुमालानं पुसून घेतलं. कापडावर लागलेल्या लाल डागांकडे पाहिलं. ते डाग तिला जाणीव करून देत होते की तिच्या आईचं आयुष्य वेगाने खंगत चाललं आहे.
तिच्या डोळ्यांतून अश्रुंची झड लागली.
‘प्रत्येकालाच कधी ना कधी मरायचं असतं, पोरी,’ सुनयना म्हणाल्या.
सीता रडतच होती.
‘पण जे भाग्यवान असतात त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तींच्या सहवासात मृत्यू येतो.’
दोन्ही हत्ती उभे राहिले. त्यांच्या माहुतांनी कौशल्याने त्यांना उभं केलं होतं. मिथिलेचे 50 सुरक्षा सैनिकही गप्प उभे होते. थोडासा आवाजही धोकादायक ठरू शकला असता. दहा मिनिटांपूर्वी सुनयनांनी मानवाला विरळाच दिसणारं दृश्य पाहिलं होतं. एका मोठ्या हत्तींच्या कळपातील मुख्य हत्तीणीचा मृत्यू झाला होता.
हत्तींच्या कळपांबद्दल सीतेला आपल्या आईनं सांगितलेली माहिती आठवली. हत्तींमध्ये बहुधा मातृसत्तांकसम पद्धत पाळली जात असावी. कळपातील सगळ्यात वयोवृद्ध हत्तीण कळपाची प्रमुख असते. बहुतेक कळपांमध्ये हत्तीणी आणि त्यांची नर-मादी पिल्ले असतात. लहानपणी या सगळ्या पिलांचा सांभाळ एकाच पद्धतीने केला जातो. वयात आल्यानंतर बहुधा नर पिल्ले कळप सोडून निघून जातात.
कळपातील मादी प्रमुख ही कळपाची केवळ नेत्रीच नसते तर, ती कळपातील सगळ्यांची मातासुद्धा असते.
आणि म्हणूनच, कळपातील प्रमुख हत्तीणीचा मृत्यू हा संपूर्ण कळपालाच उध्वस्त करणारा ठरतो किंवा तो तसा ठरत असावा असं आपल्याला वाटतं.
‘मला वाटतं, आपण काही वर्षांपूर्वी पाहिला होता तोच हा कळप असावा,’ सुनयना कुजबुजल्या.
सीतानं होकारार्थी मान हालवली.
सुरक्षित अंतर राखून झाडांच्या आडोशानं त्यांनी पाहिलं.
कळप प्रमुखांच्या शवाच्या चारही बाजूंनी गोल करून सगळे हत्ती उभे होते. गंभीर, निश्चल, शांत. या शोकसंतप्त कळपाला क्रूरपणे तळपणाऱ्या सूर्याच्या तल्खीपासून थोडा थंडावा देण्यासाठीच जणू वाऱ्याची एक झुळुक धडपडत आली.
हत्तींच्या रिंगणाच्या आत, शवापाशी दोन पिल्लं उभी होती. त्यापैकी एक अतिशय छोटं होतं, दुसरं थोडं मोठं होतं.
‘आपण त्या पिल्लाचा जन्म पाहिला होता, सीता,’ सुनयना म्हणाल्या.
सीतेनं होकारार्थी मान हालवली.
तिला कळपप्रमुखाच्या पिल्लाचा जन्म आठवला. काही वर्षांपूर्वी हत्तीवर बसून रपेटीला आल्या असताना त्यांनी ते दृश्य पाहिलं होतं.
आज ते नर पिल्लू आपल्या मृत आईजवळ गुडघ्यावर बसलं होतं. त्याने आपली सोंड आईच्या सोंडेत गुंतवली होती. त्याचं अंग थरथरत होतं. दर काही मिनिटांनी तो आईची सोंड ओढत होता. जणू तो तिला जागं करायचा प्रयत्न करत होता.
मग मोठं मादी पिल्लू येऊन लहान नर पिल्लाजवळ उभं राहिलं. एकदम शांत, निःश्चल, कळपातील इतर हत्तींसारखंच.
‘आता पाहा...’ सुनयना म्हणाल्या.
एक प्रौढ मादी, ती कदाचित नवी कळपप्रमुख असावी, हळूहळू चालत शवापाशी गेली. तिने आपली सोंड लांबवून जणू अतीव आदरानं मृत मादीच्या कपाळावर टेकवली. मग गंभीरपणे तिने शवाला प्रदक्षिणा घातली. वळली आणि तेथून निघून गेली.
कळपातील इतर हत्तींनी एकामागून एक तिचं अनुकरण केलं. अगदी हुबेहूब तसंच केलं – मृत कळपप्रमुखाच्या माथ्याला आपल्या सोंडेनं स्पर्श केला, प्रदक्षिणा घातली आणि तेथून निघून गेले.
आदरानं. गौरवानं.
त्यांच्यापैकी कुणीही, एकदाही मागे वळून पाहिलं नाही.
छोट्या नर पिल्लाने मात्र जाण्यास नकार दिला. तो आपल्या आईला बिलगून राहिला. विवशपणे. भयंकर दीनपणानं त्यानं तिला ओढलं. त्याची बहीण त्याच्या शेजारी शांत समंजसपणानं उभी होती.
संपूर्ण कळप काही अंतरावर जाऊन उभा राहिला. कुणीही एकदाही मागे वळून पाहिलं नाही. अत्यंत धीरानं ते कळपातील इतर हत्तींच्या येण्याची वाट पाहात राहिले.
काही वेळानंतर, मोठ्या बहिणीने भावाला आपल्या सोंडेनं स्पर्श केला.
नर पिल्लानं तिला दरू ढकललं. नव्या शक्तीनिशी ते आपल्या पायांवर उभं राहिलं. त्यानं आपली सोंड पुन्हा आपल्या आईच्या सोंडेत गुंतवली आणि आईची सोंड जोरात ओढली. मग, मदतीची याचना करणारी नजर आपल्या बहिणीवर टाकली. जणू तिला उठून उभं राहाण्याची गळ घालत असल्यासारखा, पोटात ढवळून यावं अशी करुण किंकाळी मारत तो पुन्हा आपल्या आईकडे वळला.
पण आता त्याची आई कधीही न संपणाऱ्या झोपेच्या आधीन झाली होती. ती आता पुढल्या जन्मीच जागी होणार होती.
पण पिल्लाने प्रयत्न सोडला नाही. कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने तो आईची सोंड पुन्हा पुन्हा ओढत राहिला.
शेवटी त्याची मोठी बहीण आईच्या शवापाशी गेली. तिने आपल्या मातेच्या कपाळाला सोंडेनं स्पर्श केला. कऴपातील इतर हत्तींनी केला होता, तसाच. मग तिने मातेच्या शवाला प्रदक्षिणा घातली. ती आपल्या भावापाशी आली. त्याच्या सोंडेत आपली सोंड अडकवून त्याला तिने ओढण्याचा प्रयत्न केला.
नर पिल्लू हृदय पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्या फोडू लागलं. तो आपल्या बहिणीमागोमाग निघाला. पण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहात राहिला. पण त्याने आपल्या बहिणीला विरोधही केला नाही.
कळपातील इतर सर्व हत्तींप्रमाणे त्याची बहीणसुद्धा स्थिर पावलांनी पुढे चालत राहिली. तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही, एकदाही नाही.
सीतेनं मान वळवून आईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहात होते.
‘समाज पुढे चालत रहातो, माझ्या पोरी,’ सुनयना कुजबुजत म्हणाल्या, ‘देश पुढे जातात. जीवन पुढे सरकतं. आणि ते तसंच व्हायला हवं.’
सीता काहीही बोलू शकली नाही. ती आईकडे पाहू शकली नाही. तिने सुनयनाला मिठी मारली. आपलं डोकं आईच्या कुशीत दडवलं.
‘दुःखदायक आठवणींना कवटाळून बसण्यात अर्थ नसतो, सीता,’ सुनयना म्हणाल्या, ‘पुढे चालत रहायला हवं, जीवन जगायला हवं...’
सीतानं ऐकलं, पण तिचे अश्रू थांबले नाहीत.
‘संकटांपासून, आव्हानांपासून सुटका नाही. ते जीवनाचाच एक भाग असतात. मिथिलेला येणं टाळल्यानं तुझी संकटं नाहिशी होणार नाहीत. त्यामुळे कदाचित इतर संकटं निर्माण होतील.’
सीतेनं आईभोवती आपले हात आणखी आवळले.
‘पळून जाणं हा कोणत्याही संकटावरचा उपाय ठरू शकत नाही. संकटांचा सामना कर. त्यांना नीट हाताळ. योद्ध्याची जगण्याची रीत हीच असते.’ सुनयनांनी हनुवटी धरून सीतेचा चेहरा वर उचलला. तिच्या डोळ्यांत डोकावत त्या म्हणाल्या, ‘...आणि तू एक योद्धा आहेस हे कधीही विसरू नकोस,’ त्या म्हणाल्या.
सीताने होकारार्थी मान हालवली.
सुनयना पुढे म्हणाल्या, ‘तुला ठाऊकच आहे, तुझी बहिण जन्मतःच अशक्त आहे. उर्मिला योद्धा नाहीय. तुला तिची काळजी घ्यायला हवी, सीता. आणि, तूच मिथिलेचं राज्यही सांभाळायला हवंस.’
सीतेनं मनातल्या मनात एक शपथ घेतली, होय. मी करेन.
सुनयनांनी सीतेचा चेहरा कुरवाळला. त्या हसल्या. म्हणाल्या, ‘तुझ्या वडिलांचं कायम तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि तुझ्या लहान बहिणीचंही, हे लक्षात ठेव.’
‘मला ठाऊक आहे.’
‘आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम तर आहेच, पण त्याहीपेक्षा माझ्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुझ्या कर्मामुळे आपल्या कुटुंबाचं नाव हजारो वर्षांपर्यंत टिकून राहील. इतिहासात तुला महत्वाचं स्थान मिळेल.’
गुरुकुलात आईला पाहिल्यापासून पहिल्यांदाच सीतेच्या तोंडून शब्द बाहेर पडले - ‘मला माफ कर आई, मला माफ कर. मला...’
सुनयना हसल्या आणि त्यांनी सीतेला आणखी जवळ घेतलं. तिला घट्ट मिठी मारली.
‘माफ कर....,’ सीता स्फुंदत म्हणाली.
‘माझा विश्वास आहे तुझ्यावर. आम्हाला अभिमान वाटावा असं आयुष्य जगशील तू.’
‘पण तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही, आई.’
सुनयनांनी पुन्हा सीतेचा चेहरा वर उचलला आणि त्या म्हणाल्या, ‘तू जगू शकशील आणि जगशील.’
‘नाही... तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही...’
सुनयनांच्या चेहऱ्यावर ठामपणाचा भाव आला. त्या म्हणाल्या, ‘माझं ऐक, सीता. माझ्याबद्दल शोक करण्यात तू तुझं आयुष्य वाया घालवणार नाहीस. तू आपल्या बुद्धीचा वापर करशील. हुशारीने जगशील आणि मला अभिमान वाटेल असं जगशील.’
सीता रडत राहिली.
‘मागे वळून पाहू नकोस. भविष्याकडे पाहा. आपलं भविष्य तयार कर. आपल्या भूतकाळाबद्दल रडण्यात आयुष्य घालवू नकोस.’
सीतामध्ये काहीही बोलण्याचं त्राण उरलं नव्हतं.
‘मला एक शपथ हवीय तुझ्याकडून.’
सीता आईकडे पाहातच राहिली. अश्रुंनी तिचे डोळे तुडुंब भरले होते.
‘मला शपथ दे,’ सुनयना पुन्हा म्हणाल्या.
‘शपथ देते, आई. मी तुला शपथ देते.’
श्वेतकेतुंच्या आश्रमाला राणी सुनयनांनी भेट दिली त्याला आता चार आठवडे उलटले होते. सीता आपल्या आईसोबत घरी परतली होती. सुनयनांनी हिकमतीनं सीतेची मिथिलेच्या पंतप्रधानपदी नेमणूक करवली होती. राज्यकारभार चालविण्यासाठी तिला पंतप्रधान पदासोबत येणारे सर्व अधिकार आणि शक्ती मिळवून दिल्या होत्या.
सीता आता आपला जास्तीत जास्त वेळ सुनयनांसोबत घालवत असे. आपल्या आईची बिघडलेली तब्बेत सांभाळत असे. राज्याच्या मंत्र्यांशी सीतेच्या बैठकी सुनयनांच्या खाजगी दालनात, त्यांच्या शय्येशेजारी होत असत.
सुनयनांना आपल्या आणि तिच्या लहान बहिणीमधील नात्याबाबत फार चिंता वाटते हे सीतेला ठाऊक होतं. त्यामुळे तिने उर्मिलेशी आपले संबंध प्रगाढ करण्याचं ठरवलं. मिथिलेच्या राणीला वाटायचं की भविष्यात येणाऱ्या संकटांचा एकत्र सामना करण्यासाठी त्यांच्या मुलींमध्ये आतापासूनच प्रगाढ संबंध निर्माण व्हायला हवेत. एकमेकांना साथ देण्याची किती गरज असते याबद्दल त्यांच्याशी त्या याआधीच बोलल्या होत्या. त्या दोघींमध्ये प्रेम आणि निष्ठा कशी मजबूत हवी हे त्यांनी दोघींना समजावलं होतं.
एकदा, संध्याकाळच्या वेळी, सुनयनांच्या दालनात बराच वेळ चाललेल्या बैठकीनंतर सीता निघाली आणि शेजारीच असलेल्या उर्मिलेच्या दालनात आली. सेविकेला तिने थोडी कळी द्राक्षे आणण्यास सांगितलं. उर्मिलेला काळी द्राक्षे आवडत असत. सेविकेनं एका थाळीत द्राक्षे आणली तेव्हा तिला रजा देऊन सीतेनं तिच्या हातातून थाळी घेतली आणि उर्मिलेच्या दालनात प्रवेश केला.
तिच्या दालनात मंद प्रकाश पसरलेला होता. सूर्य अस्ताला गेला होता, पण तिच्या दालनात केवळ काही दिवेच उजळले होते.
‘उर्मिला!’
उर्मिला अंथरुणात नव्हती. सीता उर्मिलेला शोधू लागली. दालनाच्या ज्या गच्चीतून शाही बाग दिसत असे तेथेही तिने पाहिलं.
कुठे आहे उर्मिला?
ती पुन्हा दालनात परतली. मंद उजेडाचा तिला कंटाळा आला. आणखी दिवे आणून लावण्याची आज्ञा ती देणार तेवढ्यात एका कोपऱ्यात काही हालल्याचा तिला भास झाला.
सीतेनं हाक मारली, ‘उर्मिला?’
हाक मारतच सीता पुढे गेली.
गुडघे छातीशी घेऊन आणि त्यांवर डोके टेकून उर्मिला तेथे बसलेली होती.
सीतेनं लगेच हातातली थाळी एका बाजूला ठेवली आणि ती उर्मिलेशेजारी जमिनीवर बसली. तिने हात आपल्या छोट्या बहिणीभोवती टाकला.
‘उर्मिला...,’ हळुवार स्वरात सीतेनं हाक दिली.
गुडघ्यांत लपवलेली मान वर करून उर्मिलेनं आपल्या मोठ्या बहिणीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरून दुःख ओसंडून वाहात होतं.
‘ताई...’
‘बोल माझ्याशी, उर्मिला,’ सीता म्हणाली.
‘आई...’
सीतेनं उर्मिलेचे खांदे हऴुवार दाबले अन् म्हणाली, ‘हं?’
‘आई आपल्याला सोडून स्वर्गात चाललीय का?’
सीतेनं मोठा आवंढा गिळला. उर्मिलेच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आत्ता आई इथे असायला हवी होती असं तिला वाटलं. लगेच तिच्या लक्षात आलं की आई आता काही दिवसांचीच सोबती आहे. उर्मिलेची जबाबदारी आता तिच्यावर आहे. त्यामुळे उर्मिलेच्या प्रश्नाचं उत्तर तिनेच द्यायला हवंय. ती म्हणाली,
‘नाही उर्मिला, आई नेहमी इथेच असणार आहे.’
गोंधळून उर्मिलेनं सीतेच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या मनात नवी आशा निर्माण झाली होती. ती म्हणाली, ‘पण सगळेजण मला सांगतात की आई आता निघून जाणार आहे. म्हणून मला आता सगळं शिकून घ्यायला हवं...’
‘उर्मिला, आपल्याला जे ठाऊक आहे, ते इतर कुणालाच ठाऊक नाहीय. आई फक्त वेगळ्या ठिकाणी रहाणार आहे. ती तिच्या शरीरात रहाणार नाहीय.’ मग उर्मिलेच्या आणि आपल्या हृदयाकडे बोट दाखवत ती म्हणाली, ‘आई आता या दोन ठिकाणी रहाणार आहे. आणि आपण दोघी जेव्हा एकत्र येऊ तेव्हा तिचं रूप पूर्ण होईल.’
उर्मिलेनं आपल्या हृदयाकडे पाहिलं. तिचा श्वास आता समेवर येऊ लागला होता. मग तिने सीतेकडे पाहिलं. ‘ती आपल्याला कधीच सोडून जाणार नाही?’
‘उर्मिला, डोळे बंद कर.’
मोठ्या बहिणीनं सांगितलं तसं उर्मिलेनं केलं.
‘काय दिसतं तुला?’
उर्मिला हसली. म्हणाली, ‘मला आई दिसतेय. तिनं मला जवळ घेतलंय. ती माझ्या तोंडावरून हात फिरवतेय.’
सीतेनं आपला हात उर्मिलेच्या चेहऱ्यावरून फिरवला. उर्मिलेनं डोळे उघडले. तिच्या चेहरा भर हसू पसरलं होतं.
‘ती नेहमीच आपल्या सोबत राहील.’
उर्मिलेनं सीतेला घट्ट मिठी मारली. ‘ताई...’
‘आपण दोघी आता एकमेकींसाठी आई होऊ,’ सीता म्हणाली.
‘या जगातली माझी यात्रा आता संपत आलीय,’ सुनयना म्हणाल्या.
सीता आणि सुनयना दोघीच सुनयनांच्या दालनात होत्या. सुनयना अंथरुणात होत्या. त्यांचा हात हातात घेऊन सीता त्यांच्याशेजारी बसली होती.
‘आई...’
‘मिथिलेचे लोक माझ्याबाबत काय बोलतात ते मला माहीत आहे.’
‘आई, काही मूर्ख लोक जे बोलतात त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस...’
‘मला बोलू दे, पोरी...’ सीतेचा हात दाबत सुनयना म्हणाल्या.
‘मला इतकं ठाऊक आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये मी त्याआधी केलेलं काम लोक विसरून गेले आहेत. कुशध्वजानं जेव्हापासून आपल्या राज्याचं सुख शोषायला सुरवात केली, तेव्हापासून.’
आपल्या मनात पुन्हा तीच अपराधीपणाची भावना निर्माण होतेय हे सीतेला जाणवलं.
‘त्यात तुझी काहीही चूक नाहीय,’ सुनयना स्पष्टपणे म्हणाल्या. ‘कोणत्याही सबबीवर कुशध्वजानं आम्हाला त्रास दिलाच असता. त्याला मिथिलेवर राज्य करायचंय.’
‘आई, मी काय करावं असं तुला वाटतंय?’
आपल्या मुलीचा आक्रामक स्वभाव सुनयनांना ठाऊक होता. त्या म्हणाल्या, ‘कुशध्वजाला काहीही नाही... तो तुझ्या वडिलांचा भाऊ आहे. पण तू माझं नाव उजळ करावंस अशी माझी अपेक्षा आहे.’
सीता गप्प झाली.
‘या जगात येताना आपण सोबत काहीही घेऊन येत नाही आणि जाताना सोबत काहीही घेऊन जात नाही, असं म्हणतात. पण हे काही खरं नाही. आपलं कर्म नेहमी आपल्या सोबत असतं. आणि आपण आपलं नाव, कीर्ती सोडून जात असतो. मला माझं नाव दिगंत करायचंय सीता. तू ते करावंस अशी माझी इच्छा आहे. मिथिलेचं गतवैभव तू तिला परत मिळवून द्यावंस अशी माझी इच्छा आहे.’
‘मी नक्की ते मिळवून देईन, आई.’
सुनयनांच्या ओठांवर स्मित पसरलं. त्या म्हणाल्या, ‘आणि एकदा का तू हे केलंस... की तुला मिथिला सोडून जायची परवानगी माझ्याकडून मिळाली असं समज.’
‘आई?’
‘तुझ्यासारख्या व्यक्तीसाठी मिथिला हे अतिशय छोटं स्थान आहे, सीता खूप मोठ्या गोष्टी करण्यासाठी तुझा जन्म झाला आहे. त्यासाठी तुला मोठं व्यासपीठ हवं. कदाचित, संपूर्ण भारताएवढं मोठं किंवा कदाचित, इतिहासच पुन्हा...’
सीतेला एकदा वाटलं की सुनयनांना एकदा मलयपुत्रांबद्दल आणि त्यांनी तिला पुढील विष्णूच्या रूपात ओळखलंय हे सांगावं.
सांगावं किंवा नाही हे ठरविण्यासाठी तिला केवळ काही सेकंदच लागले.
मुख्य पंडित उठून सीतेकडे चालत आले. त्यांच्या उजव्या हातात मशाल होती. इतर पंडित त्यांच्या मागे रांगेत उभे होते. ते सगळे गरुड पुराणा तील स्तोत्र म्हणत होते. ‘वेळ येऊन ठेपली, राजकुमारी!’
सीतेनं होकारार्थी मान हालवली आणि आपल्या शेजारी बसलेल्या उर्मिलेकडे नजर खाली आणून तिने पाहिलं. सुनयनांच्या मृत्यूपासून आतापर्यंत उर्मिलाचं रडणं थांबलेलं नव्हतं. आपल्या दोन्ही हातांनी तिने सीतेचा दंड घट्ट धरून ठेवला होता. सीतेनं तिची पकड ढिली करण्याचा प्रयत्न केला पण तिची बहीण तिला सोडायला तयार नव्हती. ती सीतेला आणखीनच बिलगली. सीतेनं वडिलांकडे पाहिलं. ते पुढे आले. त्यांनी उर्मिलेला उचलून कडेवर घेतलं आणि ते आपल्या मोठ्या मुलीशेजारी येऊन उभे राहिले. लहानग्या उर्मिलेसारखेच राजा जनकसुद्धा उध्वस्त आणि हरवलेले दिसत होते. अध्यात्माच्या शिखरांवर विचरत असताना त्यांना ज्या मानवी ढालीचं संरक्षण मिळालं होतं ती आता हरपली होती. कठोर वास्तव त्यांच्या जीवनात वाळवंटासारखं पसरलं होतं.
सीता पंडितांकडे वळली. तिने त्यांच्या हातातून मशाल घेतली.
गुरुकुलात सुनयना आल्या होत्या त्याला केवळ तीन महिनेच उलटले होते.
राजवाड्यात परतल्यानंतर सीतेला वाटलं होतं की आता आपल्याला आईसोबत खूप वेळ घालविता येईल. तिच्याकडून प्रेम मिळविता येईल, जगता येईल...
पण भाग्यात काही वेगळंच होतं.
पंडित ईशावास्य उपनिषदा तील स्तोत्र म्हणू लागले तेव्हा ती पुढे सरकली.
वायुर अनिलम् अमृतम् अथेदं भस्मान्तं शरीरम्।
या विनाशी शरीराची राख होऊ दे. पण या विनाशी शरीरातील श्वा सअमर आहे. त्याचं स्थान इतरत्र आहे. हा शअवास त्या अविनाशी श्वासात पुन्हा मिसळू दे.
चंदनाच्या ओंडक्यांवर तिच्या आईचं शरीर ठेवलेलं होतं. तिथे ती गेली. आपल्या आईचं रूप आठवताना तिने डोळे बंद केले. तिने रडू नये. आत्ता, इथे तरी, तिने मुळीच रडू नये. लोकांसमोर रडू नये. तिला ठाऊक होतं की कित्येक मिथिलावासी तिला दोष देतात. कारण तिच्यामुळे अशा आजारपणात, अशक्तपणा असतानासुद्धा केवळ तिच्यासाठी त्यांना श्वेतकेतुंच्या गुरुकुलापर्यंत जावं लागलं होतं. कुशध्वजानं त्यांना त्रास दिला त्यामागचं कारणही तीच आहे असं ते समजतात हे सुद्धा तिला ठाऊक होतं.
यावेळी तिनं खंबीर रहायला हवंय. आईसाठी. तिने आपल्या मैत्रिणीकडे – समीचीकडे पाहिलं. ती थोड्या अंतरावर उभी होती. त्या दोघींच्या आधारातून तिला शक्ती मिळत होती.
सीतेनं आईच्या – राणी सुनयनांच्या चितेला अग्नी दिला. भरपूर तुपाची आहुती प्यायलेल्या लाकडांनी चटकन पेट घेतला. एवढ्या श्रेष्ठ व्यक्तीमत्वाला मुक्ती देण्याचा सन्मान मिळाल्यामुळेच जणू चितेतील ज्वाळा प्रखर तेजानं लपलपत राहिल्या.
‘शेवटचा नमस्कार, आई!’
एक पाऊल मागे येऊन सीतेनं आकाशाकडे तेथील देवाकडे – ब्रह्माकडे पाहिलं.
मोक्ष मिळविण्यासाठी जर कुणी योग्य असेल, तर ती माझी आई आहे.
जंगलात कळपप्रमुख हत्तीणीची शोकसभा पाहात असताना आई जे म्हणाली होती ते सीतेला आठवलं,
‘मागे पाहू नकोस. पुढे पाहा.’
चितेच्या अग्नीला सीता म्हणाली, ‘मी पाहीन मागे वळून आई. न पाहाणं कसं शक्य आहे? तूच तर माझं जीवन आहेस.’
आईशी झालेलं शेवटचं सुसंगत बोलणं तिला आठवलं. सुनयनांनी सीताला बजावून सांगितलं होतं की विष्णूची जबाबदारी जर पूर्ण करायची असेल तर मलयपुत्रांवर किंवा वायुपुत्रांवर पूर्ण विश्वास कधीच टाकू नकोस. या दोन्ही जमातींचे आपापले छुपे हेतू असतील, म्हणून, तिला भागीदाराची गरज आहे.
आईचा आवाज सीतेच्या मनात घुमला. ज्यांच्यावर विश्वास ठेवता येईल असे भागीदार शोध, जे तुझा हेतु साध्य करण्यात निष्ठेनं तुझी मदत करतील असे. व्यक्तीगत निष्ठा महत्वाची नाही, त्यांनी तुझ्या हेतूशी निष्ठा बाळगायला हवी.
आईचं शेवटचं वाक्य तिला आठवलं.
मी कायम तुझ्याकडे पाहात आहे. मला अभिमान वाटेल असं कर.
सीतेनं खोल श्वास घेतला, मुठी आवळल्या आणि शपथ घेतली,
‘नक्की आई, मी हे नक्की करेन.’