‘राधिका!’ सीताचा चेहरा आनंदानं उजळून निघाला.
गुरुकुलातील सीतेची मैत्रीण एक दिवस अचानक सीताला भेटायला आली. सतरा वर्षांच्या सीतेहून एका वर्षानं लहान असलेल्या सोळा वर्षांच्या राधिकेला समीची सीतेच्या खाजगी दालनात घेऊन आली होती. समीची मिथिलेची शिष्टाचार प्रमुख बनली होती. समीचीवर ही नवी जबाबदारी टाकल्यापासून तिला नगर संरक्षण दलाच्या कामाव्यतिरिक्तही बरीच कामं करावी लागत असत. म्हणून, समीचीला मदत व्हावी म्हणून सीतेनं उप संरक्षण प्रमुखाची नेमणूक केली होती. हा उप प्रमुख पुरुष होता. अत्यंत शक्तीशाली आणि स्वच्छ मनाचा अधिकारी होता. समीचीच्या पूर्वाग्रहांचा संरक्षण दलाच्या कामावर परिणाम होऊ नये याची तो काळजी घेत असे.
यावेळी राधिकेनं एकटीनं प्रवास केला नव्हता. यावेळी तिचे वडील वरुण रत्नाकर आणि काका वायुकेसरी तिच्या सोबत आले होते.
सीता आधीसुद्धा वरुण रत्नाकरांना भेटली होती. पण राधिकाचे काका आणि रत्नाकरांचे मामेभाऊ वायुकेसरी यांना ती पहिल्यांदाच भेटत होती. पण या दोघांमध्ये कोणतंही साम्य नव्हतं. वायुकेसरी खूपच ठेंगणे, जाडे आणि गोरे होते. त्यांचं पिळदार शरीर भरपूर केसाळ होतं.
कदाचित तेसुद्धा वानरांपैकीच असावेत
सीतेला वाटलं.
राधिका वाल्मिकी जमातीची होती. त्या जमातीत मातृसत्तांक पद्धत प्रचलित होती हे सीता जाणून होती. त्यांच्या समाजातील स्त्रिया इतर जमातीतील पुरुषांशी विवाह करत नसत. पुरुष वाल्मिकी नसलेल्या मुलींशी विवाह करू शकत, पण एका अटीवर. समाजाबाहेर विवाह करणाऱ्या पुरुषाला समाज सोडावा लागत असे. कदाचित वायुकेसरी हे अशाच वाल्मिकी जमातीतून बाहेर पडलेल्या आणि वानर स्त्रीशी विवाह केलेल्या पुरुषाचे पुत्र असतील.
खाली वाकून सीतेने दोघा वडीलधाऱ्या व्यक्तींच्या पायांना स्पर्श करून त्यांना वंदन केले.
दोघांनीही सीतेला दीर्घायुष्याचा आशिर्वाद दिला. वरुण रत्नाकर एक आदरणीय बुद्धीवादी व्यक्ती होते. विचारक होते. ज्ञानाचा सन्मान करणाऱ्या तत्कालीन लोकांच्या मनात वरुण रत्नाकरांबद्दल आदर होता. आपल्या वडिलांसोबत वेळ घालवायला त्यांना नक्की आवडेल हे सीतेला ठाऊक होतं. कारण तिचे वडील हे संपूर्ण सप्तसिंधू प्रदेशातील सर्वात विद्वान व्यक्ती आणि राजा होते. त्यांचे प्रमुख गुरु अष्टावक्र हिमालयात निघून गेल्यापासून जनकांना तत्वज्ञानाच्या चर्चेसाठी कुणी नसल्याची कमतरता भासत होती. त्यांनाही काही बुद्धिवाद्यांसोबत वेळ घालवायला नक्कीच आवडेल.
पुरुष थोड्या वेळाने राजा जनकांच्या दालनात निघून गेले. समीचीनं सुद्धा त्यांचा निरोप घेतला. कारण कामामुळे सध्या तिला इतर कोणत्याही गोष्टींसाठी वेळच मिळत नसे. लवकरच मिथिलेच्या राजकुमारीच्या खाजगी अभ्यासिकेत सीता आणि राधिका या दोघीच उरल्या.
‘कसं काय चाललंय तुझं राधिका?’ सीताने राधिकेचा हात हातात घेत म्हटलं.
‘माझ्य जीवनात सांगण्यासारखं काय होणार सीते?’ हसत राधिका म्हणाली, ‘जे काय आहे ते सगळं तुझ्यापाशी आहे!’
‘माझ्याकडे काय असणार?’ सीता हसत म्हणाली. तिने गंमतीने आपले डोळे मोठे करत बुब्बुळं गरागरा फिरवली. ‘काही नाही. फक्त एका छोट्या राज्याची राखण करते. करवसूली करते आणि झोपडपट्टीचा पुनर्विकास करते.’
‘फक्त सध्यासाठी. तुला आणखीही बरंच काही करायचंय...’
सीता अचानक सावध झाली. वरवर दिसताहेत त्यापेक्षा या संवादाला आणखी पैलू असावेत असं तिला वाटलं. ती आता सावधपणे, काळजीपूर्वक बोलू लागली. म्हणाली, ‘हो. मिथिलेची पंतप्रधान असल्यानं मला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. पण हे काही अशक्य कोटीतलं नाही. आमचं राज्य अतिशय छोटं आणि नगण्य आहे.’
‘पण भारत खूप मोठा देश आहे.’
आता सीता आणखी सावध झाली. म्हणाली, ‘हा कोपरा भारतासाठी काय करणार, राधिका? मिथिला हा एक नगण्य देश आहे. सगळ्यांच्या विस्मृतीत गेलेला.’
‘असेल तसंही,’ राधिका स्मितहास्य करत म्हणाली, ‘पण कोणतीही शहाणी भारतीय व्यक्ती अगस्त्यकूटम् विसरणार नाही.’
राधिकाला कसं समजलं? मी तरी आईशिवाय इतर कुणालाच काहीही सांगितलं नाही.
‘मला तुला मदत करायचीय, सीता,’ राधिका कुजबुजत म्हणाली, ‘विश्वास ठेव माझ्यावर. तू माझी मैत्रीण आहेस. आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि भारतावर माझं त्याहून जास्त प्रेम आहे. भारतासाठी तू खूप महत्वाची व्यक्ती आहेस.
जय परशु राम
’.
जय परशु राम
‘सीता कुजबुजली. क्षणभराच्या संकोचानंतर तिने विचारलं, ‘म्हणजे तुझे बाबा आणि तू....’
राधिका हसली. म्हणाली, ‘मी कुणीही नाही, सीता. पण माझे बाबा... आपण फक्त एवढंच म्हणू शकतो की ते महत्वाची व्यक्ती आहेत. आणि त्यांना तुला मदत करायचीय. मी फक्त निमित्त आहे. कारण या ब्रह्मांडानंच मला तुझी मैत्रीण बनविण्याचं कारस्थान रचलंय.’
‘तुझे वडील मलयपुत्रांपैकी आहेत का?’
‘नाही, ते मलयपुत्रांपैकी नाहीत.’
‘मग ते वायुपुत्रांपैकी आहेत का?’
‘वायुपुत्र भारतात रहात नाहीत. महादेवांच्या वंशजांची ही जमात भारताच्या पवित्र भूमीला कधीही भेट देऊ शकते पण ते इथे राहू शकत नाहीत. मग माझे वडील वायुपुत्र कसे असणार?’
‘मग ते आहेत तरी कोण?’
‘योग्य वेळी कळतील गोष्टी तुला...’ राधिका हसत म्हणाली, ‘आत्ता माझ्यावर तुला काही गोष्टी विचारण्याची जबाबदारी सोपवली गेलीय.’
वशिष्ठ एका झाडाच्या बुंध्याला टेकून जमिनीवर स्वस्थ बसलेले होते. दुरून ते आपला आश्रम पाहात होते. सकाळची वेळ होती. थोडा एकांत शोधत ते आले होते. मंद वाहात असलेल्या झऱ्याकडे त्यांनी पाहिलं. अदबीनं, एकामागोमाग एक उभं राहून एखाद्या मिरवणुकीत निघाल्यासारखी पाण्याच्या पृष्ठभागावर पडलेली पानं प्रवाहासोबत वाहात होती. झाडं, पाणी, पांनं... त्यांच्या मनातील जणू समाधानच प्रतिबिंबित करत होते.
त्यांचे चारही शिष्य – अयोध्येचे चार राजकुमार – राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न – त्यांच्या देखरेखीखाली त्यांनी बनविलेल्या साच्यात घडत होते. लंकेच्या राक्षस राजानं युद्धात राजा दशरथांचा दारुण पारभव केल्याच्या आणि सप्त सिंधू प्रदेशाचं भाग्य एका तडाख्यात बदलून टाकण्याच्या घटनेला बारा वर्षे उलटून गेली होती.
यामुळे वशिष्ठांची खात्री पटलेली होती की विष्णूच्या आगमनाची वेळ येऊन ठेपलेली आहे.
वशिष्ठांनी पुन्हा एकदा आपल्या छोट्याश्या गुरुकुलाकडे पाहिलं. इथेच महान ऋषी शुक्राचार्यांनी उपेक्षित, अधिकारशून्य राजांना पुढे जगातील सर्वात महान साम्राज्याची –
असुर सवित्रची
स्थापना केली होती. असुर सवित्र म्हणजे असुरांचा सूर्य.
या पवित्र जागेवर पुन्हा एकदा नव्या, श्रेष्ठ साम्राज्याचा उदय होईल, इथूनच एका नव्या विष्णूचा उदय होईल.
राम किंवा भरत या दोघांपैकी पुढील विष्णू म्हणून कुणाची निवड करावी हे वशिष्ठांनी अजून ठरवलेलं नव्हतं. एक गोष्ट निश्चित होती, वायुपुत्रांचा त्यांना पाठिंबा होता. पण महादेवांचे वंशज असलेल्या या जमातीच्या क्षमतेला बऱ्याच मर्यादा होत्या. वायुपुत्र आणि मलयपुत्रांची कार्यक्षेत्रं निश्चित होती.
आणि विष्णूला आधिकारिकरीत्या मलयपुत्रांची संमती मिळायला हवी होती. आणि मलयपुत्र प्रमुखांची.... त्यांचे जुने मित्र.....
अर्थात....
मी घेईन सांभाळून सगळं.
‘
गुरुवर्य,
?’
वशिष्ठांनी वळून पाहिलं. राम आणि भरत उभे होते.
‘बोला,’ वशिष्ठ म्हणाले, ‘काय शोधून काढलंय तुम्ही?’
‘ते तिथे नाहीत, गुरुवर्य,’ राम म्हणाला.
‘ते?’
‘केवळ अधिपती वरुणच नव्हे तर त्यांचे कित्येक सल्लागारसुद्धा गावातून गायब झालेत.’
वरुण हे आश्रम चालविणाऱ्या आणि आश्रमाची देखरेख करणाऱ्या जमातीचे अधिपती होते. शोण नदीच्या प्रवाहाच्या पश्चिम टोकाजवळ हा आश्रम होता. त्यांची
वाल्मिकी
ही जमात आश्रमाची जागा वेळोवेळी वेगवेगळ्या गुरुंना भाडेतत्वावर वापरण्यास देत असत. अयोध्येचे चार राजकुमार जोवर त्यांच्याकडे राहून शिक्षण घेणार होते तोवर गुरु वशिष्ठांनी हा आश्रम भाड्यानं घेतला होता. वशिष्ठांनी आपल्या शिष्यांची खरी ओळख वाल्मिकी जमातीपासून लपवून ठेवलेली होती. पण त्या जमातीतील लोकांना शिष्यांची खरी ओळख ठाऊक झाली असल्याची हल्ली त्यांना शंका येऊ लागली होती. त्यांना असंही वाटू लागलं होतं की, वाल्मिकी तोकांनीसुद्धा काही गोष्टी कौशल्यानं त्यांच्यापासून लपवून ठेवल्या होत्या.
अधिपती वरुण आपल्या गावातच आहेत की नाहीत हे पाहायला त्यांनी राम आणि भरतला पाठवलं होतं. आता त्यांच्याशी बोलण्याची वेळ येऊन ठेपलेली होती. त्यांच्याशी बोलणी केल्यानंतरच आश्रम तिथेच ठेवायचा की हालवायचा याबद्दल त्यांना निर्णय घ्यायचा होता.
पण वरुण गावात नव्हते. वशिष्ठांना न सांगता ते गेले होते. हे थोडं वेगळं होतं.
‘कुठे गेले असतील ते?’ वशिष्ठांनी विचारलं.
‘बहुधा, मिथिलेला.’
वशिष्ठांनी मान डोलावली. अधिपती वरुण यांना ज्ञानाची भूक होती. ज्ञानाबद्दल त्यांना प्रेम होतं. विशेषतः तत्वज्ञान या विषयाची. अशा व्यक्तीचं मिथिलेला जाणं साहजिकच असावं.
‘ठीक आहे मुलांनो,’ वशिष्ठ म्हणाले. ‘चला, अभ्यासाला लागा.’
‘विष्णुची रुधिर आण
घेतली गेली असं आम्ही ऐकलं,’ राधिका म्हणाली.
‘हो,’ सीता म्हणाली, ‘गुरु श्वेतकेतुंच्या गुरुकुलात काही वर्षांपूर्वी शपथ घेतली गेली.’
राधिकानं निःश्वास सोडला.
सीतेच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. तिने विचारलं, ‘काही समस्या आहे का?’
‘हंऽऽऽ. म्हणजे, महर्षी विश्वामित्र थोडे... अपारंपारिक आहेत ना?’
‘अपारंपारिक? म्हणजे काय म्हणायचंय तुला?’
‘कारण या कार्यक्रमात वायुपुत्रांची उपस्थिती असायला हवी होती.’
सीतेनं भुवया उंचावल्या. म्हणाली, ‘मला हे ठाऊक नव्हतं...’
‘विष्णूंच्या वंशजांची जमात आणि महादेवांच्या वंशजांच्या जमातीनं भागीदारीत काम करावं अशी अपेक्षा असते.’
अचानक सगळ्याचा सीतेला उलगडा झाला. वर पाहात तिने विचारलं, ‘गुरु वशिष्ठ?’
राधिकेच्या ओठांवर स्मित आलं. ‘ज्याच्या प्रशिक्षणाला अजून सुरवातही झालेली नाही अशा शिष्याच्या मानाने तू लगेच ओळखलंस.’
खांदे उडवत सीतासुद्धा हसली.
राधिकेनं आपल्या मैत्रीणीचा हात हातात घेतला. म्हणाली, ‘वायुपुत्रांचा महर्षी विश्वामित्रांवर विश्वास नाही, आवडत नाहीत ते त्यांना. असतील त्यांची काही कारणं. पण ते उघड उघड मलयपुत्रांना विरोध करू शकत नाहीत. आणि हो, बरोबर ओळखलंस तू. वायुपुत्रांचा महर्षी विश्वामित्रांना पाठिंबा आहे.’
‘म्हणजे तुला असं सुचवायचंय का, की विष्णू कुणी बनावं याबद्दल वशिष्ठांचंही एक मत आहे?’
होकारार्थी मान हालवत राधिका म्हणाली, ‘होय.’
‘ते एकमेकांचा एवढा तिरस्कार का करतात?’
‘फार कमी लोकांना याबद्दल माहिती असावी. पण गुरु वशिष्ठ आणि गुरु विश्वामित्रांमधलं वैर फार जुनं आहे. ते फारच कटु आणि भयानक आहे.....’
सीता विषादानं हसली. म्हणाली, ‘आपापसात भिडलेल्या दोन हत्तींमध्ये अडकलेल्या गवताच्या पात्यासारखी माझी अवस्था झालीय.’
‘मग, तुडवलं जाताना दुसऱ्या जातीच्या एका गवताच्या पात्याची संगत तुला फारशी बोचणार नाही, असं मला वाटतं!’
हसत सीतेनं राधिकेच्या खांद्यावर गुद्दा लगावला न् विचारलं, ‘कोण आहे हे गवताचं पातं?’
राधिकानं नाटकीपणानं दीर्घ श्वास घेतला. म्हणाली, ‘एक नाही, खरं तर दोन पाती आहेत.’
‘दोन?’
‘गुरु वशिष्ठ त्यांना प्रशिक्षण देताहेत.’
‘दोन विष्णू निर्माण करायचा विचार आहे का त्यांचा?’
‘नाही. बाबांना वाटतं, गुरु वशिष्ठ त्या दोघा शिष्यांपैकी एकाला निवडतील.’
‘कोण आहेत ते?’
‘अयोध्येचे राजकुमार – राम आणि भरत.’
सीतेनं भुवया उंचावल्या. म्हणाली, ‘गुरु वशिष्ठांनी नेम अगदी उंच लावलाय. तडक सम्राटांचे कुटुंबीयच, हं!’
राधिका हसली.
सीतेनं विचारलं, ‘त्या दोघांपैकी चांगला कोण आहे?’
‘माझ्या वडिलांना राम योग्य वाटतो.’
‘आणि तुला कोण योग्य वाटतो?’
‘माझ्या मताला वजन नाही. स्पष्टच सांगायचं तर, बाबांच्या मतालाही काही अर्थ नाही. वशिष्ठ ज्यांची निवड करतील त्यांना वायुपुत्र पाठिंबा देतील.’
‘गुरु वशिष्ठ आणि गुरु विश्वामित्रांनी एकत्र काम करावं असा एखादा उपाय नाही का? कारण, शेवटी ते दोघेही भारताच्या भल्यासाठीच काम करताहेत ना? गुरु वशिष्ठ ज्यांना विष्णूपद देतील त्यांच्याशी भागीदारीत काम करायला मी तयार आहे. ते दोघे एकमेकांचे भागीदार का होऊ शकत नाहीत?’
राधिका मान हालवत म्हणाली, ‘एखाद्याचा सगळ्यात वाईट शत्रू तोच होऊ शकतो जो कधीकाळी त्याचा सगळ्यात चांगला मित्र असतो.’
ऐकून सीतेला धक्का बसला. ‘खरं सांगतेस? ते दोघे कधीकाळी मित्र होते का?’
‘महर्षी विश्वामित्र आणि महर्षी वशिष्ठ बालपणीचे मित्र होते. जवळ जवळ सख्खे भाऊच. पण काहीतरी घडलं आणि आता ते दोघे एकमेकांचे कट्टर शत्रु आहेत.’
‘काय?’
‘फार कमी लोकांना हे माहीत आहे. आणि ज्यांना माहीत आहे ते इतर कुणाशी, अगदी आपल्या जवळच्या साथीदारांशीसुद्धा त्याबद्दल बोलत नाहीत.’
‘विचित्र आहे...’
यावर राधिका काही बोलली नाही.
सीतेनं खिडकीतून बाहेर पाहिलं अन् पुन्हा राधिकेकडे वळत ती म्हणाली, ‘तुला गुरु वशिष्ठांबद्दल एवढी माहिती कशी?’
‘आमच्या गावाजवळ आम्ही गुरुकुलासाठी जागा बाळगलीय हे तुला ठाऊक आहे ना? सध्या तो आश्रम गुरु वशिष्ठांनी भाडेतत्वावर घेतला आहे. ते तेथे चार राजपुत्रांना शिक्षण देतात.’
‘मी तेथे येऊन राम आणि भरतला भेटू शकेन का? गुरु वशिष्ठांना वाटतं तेवढे ते दोघे महान आहेत का ते मला पाहायची मला खूप उत्सुकता आहे.’
‘ते अजून खूप लहान आहेत सीता. राम तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. आणि तू हे विसरू नकोस, मलयपुत्रांची तुझ्या प्रत्येक हालचालीवर नजर असते. ते कायम तुझ्या मागावर असतात. सगळीकडे तुझ्या पाठीपाठी असतात.. गुरु वशिष्ठांच्या गुरुकुलाची जागा आपण त्यांना दाखवू शकत नाही. ती त्यांनी गुप्त राखली आहे....’
राधिकेचं म्हणणं मान्य करणं सीतेला जड जात होतं. ती म्हणाली, ‘हंSSS’
‘त्यांचं काय चाललंय याबद्दल मी तुला माहिती पुरवत राहीन. काही झालं तरी बाबांना गुरु वशिष्ठांशी एकदा स्पष्ट बोलायचंय. लागलीच, ते त्यांना मदतही देऊ करतील.’
‘गुरु वशिष्ठांना ते मदत करणार? माझ्या विरुद्ध?’
राधिका हसली. म्हणाली, ‘बाबांनाही तुझ्यासारखीच भागीदारीची अपेक्षा आहे.’
सीता पुढे झुकली. ‘मला जे माहीत आहे त्यापैकी बरंच काही मी तुला सांगितलंय. मला वाटतं आता तुला जे माहीत आहे ते तू मला सांगावंस.... कोण आहेत तुझे बाबा?’
क्षणभर राधिका घुटमळली.
तिचा अनिश्चय पाहून सीता पुढे म्हणाली, ‘तुझ्या वडिलांची परवानगी नसताना तू मला अयोध्येच्या राजपुत्रांबद्दल सांगितलं नसतंस. आणि, मला खात्री आहे की, तू त्यांच्याबद्दल सांगितलंस की मी तुला हा प्रश्न विचारणार याचीसुद्धा त्यांना कल्पना असावी. म्हणजेच, आपली खरी ओळख उघड होऊ नये अशी इच्छा असती तर त्यांनी तुला माझ्या भेटीसाठी पाठवलं नसतंच. ते कोण आहेत ते मला सांग.’
काही क्षण राधिका गप्प राहिली. मग तिने विचारलं, ‘तू मोहिनींबद्दल ऐकलंयस का?’
‘तू गंमत तर करत नाहीएस?’ सीतेनं विचारलं, ‘त्यांच्याबद्दल कुणाला माहीत नसेल? त्या महान विष्णू आहेत.’
राधिका हसली. म्हणाली, ‘सगळे नाही, पण भारतातील बहुतेक लोक तिला विष्णू मानतात. मला ठाऊक आहे की मलयपुत्र तिला विष्णूच समजतात आणि तिचा आदर करतात.’
‘मीसुद्धा त्यांना विष्णू समजते. आणि मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो.’
‘आणि आम्हीसुद्धा. आम्ही वाल्मिकी आहोत. माझ्या वडिलांची जमात ही देवी मोहिनींची वंशज आहे.’
सीता सावरून ताठ बसली. तिला खूप मोठा धक्का बसला होता. ‘बाप रे!’ तेवढ्यात तिच्या डोक्यात आणखी एक विचार आला. तिने तो पटकन् बोलून दाखवला, ‘तुझे काका, वायूकेसरी, हनुदादाचे वडील आहेत?’
राधिकानं मान डोलावली, ‘होय.’
सीता हसली. म्हणाली, ‘तरीच...’
राधिकेनं तिला मध्येच अडवलं. म्हणाली, ‘बरोबर आहे तुझे. ते एक कारण असू शकतं. पण केवळ तेच एक कारण नाहीय.’