प्रकरण 16
विसाव्या वर्षीसुद्धा सीताजवळ लहान मुलांसारखी उमेद आणि शक्ती होती, पण संपूर्ण भारतात तिने केलेला प्रवास आणि अगस्त्यकूटममध्ये तिला मिळालेल्या प्रशिक्षणामुळे ती आपल्या वयाच्या मानाने खूपच प्रगल्भ झाली होती.
समीचीला आधी सीतेच्या देशभर वरचेवर होणाऱ्या प्रवास-वाऱ्यांबद्दल कुतूहल वाटत असे. व्यापार आणि राजकारणासाठी या वाऱ्या असल्याचं तिला सांगितलं गेलं होतं. तिचा त्यावर विश्वास बसला होता किंवा, निदान तिने विश्वास असल्याचं दाखवलं तरी होतं. सीतेच्या अनुपस्थितीत मिथिलेचा सारा कारभार तीच पहात असे. पण आता सीता मिथिलेत परतली होती. प्रशासनाची सारी सूत्रं पुन्हा पंतप्रधानांच्या हाती आली होती.
राधिकाचं वरचेवर मिथिलेला येणं-जाणं असे. त्याप्रमाणेती यावेळीही आली होती.
‘समीची, कसं काय चाललंय?’ राधिकेनं समीचीला विचारलं.
मिथिलेच्या पंतप्रधानांच्या कक्षात त्यावेळी सीता, राधिका आणि समीची बसल्या होत्या.
‘उत्तम!’ समीची हसत म्हणाली, ‘विचारल्याबद्दल धन्यवाद.’
‘दक्षिण द्वाराजवळच्या झोपडपट्टीचं तू जे केलंस ते मला फार आवडलं. एका मलवापीच्या ठिकाणी तू एक व्यवस्थित आणि कायमस्वरूपी बांधकाम उभं केलंस.’
‘पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाशिवाय ते करणं शक्य झालं नसतं,’ समीचीनं खऱ्या विनयानं म्हटलं, ‘ती कल्पना आणि दृष्टी त्यांचीच होती. मी फक्त ती प्रत्यक्षात उतरवली.’
‘पंतप्रधान नाही, सीता.’
‘माफ करा?’
‘मी तुला किती वेळा सांगितलंय,’ सीता म्हणाली, ‘आपण जेव्हा एकांतात असू तेव्हा तू मला माझ्या नावाने हाक मारू शकतेस.’
समीचीनं राधिकाकडे पाहिलं आणि मग सीतेकडे पाहिलं.
सीतेनं गंमतीदारपणे डोळे फिरवले आणि म्हटलं, ‘राधिका माझी मैत्रीण आहे, समीची!’
समीचीसुद्धा हसली. म्हणाली, ‘माफ करा, वावगं नका समजू मला.’
‘आम्ही मनावर घेतलंच नाही, समीची!’ राधिका म्हणाली, ‘तू माझ्या मैत्रिणीचा उजवा हात आहेस. तू काही म्हटलंस तर मी ते वावगं कसं समजेन?’
समीची उठून उभी राहिली. म्हणाली, ‘आता मला परवानगी देशील का, सीता? मला नगरातल्या मध्य भागात जायचंय. तिथे कुलीनांचं एक सम्मेलन आहे. मला तिथे उपस्थित रहायचं आहे.’
‘ऐकलंय मी,’ सीता म्हणाली, तिने समीचीला थांबण्याचा संकेत केला, ‘श्रीमंत लोक नाखुश आहेत असं ऐकलंय मी.’
‘होय,’ समीची म्हणाली. ‘आधीपेक्षा आता ते जास्त श्रीमंत झाले आहेत. कारण आता मिथिलेचं बरं चाललंय. पण गरीबांची प्रगती जास्त वेगाने होत आहे. त्यामुळे आता श्रीमंतांना स्वस्त मजूर किंवा घरकामाला नोकर वगैरे मिळणं दुरापास्त झालं आहे. पण केवळ श्रीमंतच नाखुश आहेत असं नाही. जीवनमानात सुधारणा होण्याआधी खुश होते तेवढे आता गरीबही खुश राहिले नाहीत. आता त्यांच्यासुद्धा तक्रारी वाढल्या आहेत. त्यांना आणखी श्रीमंत व्हायचं आहे. आणि त्यांना वेगाने श्रीमंत व्हायचं आहे. मोठ्या अपेक्षांमुळे आता त्यांना जास्त असमाधानाला सामोरं जावं लागतंय.’
‘बदल होतात तेव्हा थोडंफार इकडे-तिकडे होतंच...’ विचार करत सीता म्हणाली.
‘होय.’
‘संकट उभं राहातंय असं वाटलं तर मला कळव.’
‘हो, सीता,’ समीची म्हणाली. मग तिने सीतेला लष्करी सलाम केला आणि ती तेथून निघून गेली.
त्या दोघीच राहिल्या तेव्हा सीतेनं राधिकेला विचारलं, ‘आणि मग विष्णू बनू इच्छिणाऱ्या इतर उमेदवारांचं काय चाललंय हल्ली?’
‘रामची उत्तम प्रगती चाललीय, भरत जरा हेकेखोर आहे. अजून काय ते नक्की सांगता येणार नाही!’
महर्षी कश्यपांच्या गुरुकुलातील एक उलटून चाललेली संध्याकाळ. आठ वर्षे वयाचे पाच मित्र आपापसात एक खेळ खेळत होते. तो खेळ फक्त या शिक्षण केंद्रात शिकणाऱ्या हुशार मुलांसाठीच होता. बौद्धिक खेळ होता तो.
एक विद्यार्थी प्रश्न विचारत होता आणि इतर त्याला उत्तरं देत होते. प्रश्न विचारणाऱ्याच्या हातात एक दगड होता. तो त्याने जमिनीवर एकदा वाजवला. थांबला. मग दोनदा वाजवला, मग पुन्हा थांबला. तीनदा वाजवला. थांबला पाचदा वाजवला. थांबला. आठ वेळा वाजवला. थांबला. मग त्यानं आपल्य मित्रांकडे पाहात विचारलं, ‘सांगा, मी कोण?’
त्याच्या मित्रांनी एकमेकांकडे पाहिलं. ते गोंधळले होते.
मागे बसलेला सात वर्षांचा एक मुलगा संकोचत उभा राहिला. त्याने फाटके कपडे घातले होते. आणि तो तेथील इतर विद्यार्थ्यांसारखा दिसत नव्हता. तो म्हणाला, ‘मला वाटतं, दगडानं तू जमिनीवर 1,1,2,3,5,8 या क्रमानं टप्पे दिलेस. हो ना? हे पिंगळा सूत्र आहे. म्हणून मी ऋषी पिंगळा आहे.’
मित्रांनी त्या मुलाकडे पाहिलं. स्थानिक माता मंदिरातील पहारेकऱ्याच्या छोट्याश्या खोलीत रहाणारा तो एक अनाथ मुलगा होता. मुलगा खूप अशक्त होता, कुपोषणग्रस्त होता आणि त्याची प्रकृती खालावलेली होती. पण तो बुद्धीमान होता. गुरुकुलातील विश्वामित्र नावाच्या एका विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांना या मुलाबद्दल खात्री पटवून देऊन त्याला शाळेत दाखल करून घ्यायला लावलं होतं. हे करण्यासाठी त्या विद्यार्थ्याला आपल्या पित्याकडून – म्हणजे कन्नौजच्या राजाकडून गुरुकुलाला दिलेल्या मोठ्या देणगीचासुद्धा वापर करून घ्यावा लागला होता.
त्यानं दिलेलं उत्तर बरोबर असूनही मुलांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
प्रश्न विचारलेल्या मुलानं त्याला म्हटलं, ‘तू जे म्हणशील ते ऐकण्यात आम्हाल स्वारस्य नाही, वशिष्ठा. तू जाऊन पहारेकऱ्याच्या खोलीच्या सफाईचं काम का करत नाहीस?’
त्याचं बोलणं ऐकून इतर सगळी मुलं खो खो हसू लागली. वशिष्ठ शरमेनं जड झाला. पण तो तेथून निघून गेला नाही. तेथेच उभा राहिला.
प्रश्न विचारणारा पुन्हा आपल्या मित्रांकडे वळला. त्यानं पुन्हा हातातील खड्यानं जमिनीवर टप्पे वाजवायला सुरवात केली. त्यानं एकदा खडा वाजवला. मग खडा जिथे वाजवला त्या केंद्राभोवती वर्तुळ रेखलं. मग त्या वर्तुळाचा व्यास रेखला. मग वर्तुळाबाहेर त्याने वेगाने एक टप्पा दिला. थांबला. मग त्यानं पुन्हा एकदा वेगानं दगड वाजवला. वेगात आठ वेळा वाजवला न् विचारलं, ‘मी कोण?’
लगेच वशिष्ठांच्या तोंडून निघालं, ‘मला माहीत आहे! तू जमिनीवर दगड वाजवलास आणि वर्तुळ रेखलंस. म्हणजे, ही आपली भूमाता. मग तू त्या वर्तुळाचा व्यास रेखलास आणि वर्तुळाबाहेर 1-0-8 या क्रमाने टप्पे दिलेस. म्हणजे, तू विचारलसं की, पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पटीचं काय आहे? तर – सूर्याचा व्यास तेवढा आहे. म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे - सूर्य!’
तरीही मित्रांनी वशिष्ठांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. कुणीही त्यानं दिलेल्या उत्तराची दखल घेतली नाही.
पण असा नकार स्वीकारायला वशिष्ठ तयार नव्हते. ते म्हणाले, ‘हा सूर्य सिद्धांताचा भाग आहे.... आणि मी दिलं तेच याचं खरं उत्तर आहे.’
आता मात्र प्रश्न विचारणारा संतापला. म्हणाला, ‘चल नीघ येथून, वशिष्ठा!’
तेवढ्यात मागून एक मोठा आवाज आला, ‘एSSSS!’
तो विश्वामित्रांचा आवाज होता. त्यांचं त्यावेळचं वय जरी आठ वर्षांचं असलं तरी शरीरानं ते खूपच धिप्पाड होते. त्या पाच मुलांना घाबरविण्यासाठी ते एकटे पुरेसे होते.
‘कौशिक...’ प्रश्न विचारणाऱ्य मुलानं नरमाईनं विश्वामित्रांचं गुरुकुलातील नाव वापरून म्हटलं, ‘तुझा याच्याशी काहीही संबंध नाही...’
विश्वामित्रांनी वशिष्ठांजवळ जाऊन त्यांचा हात हातात घेतला. मग त्या पाच मुलांकडे वळून ते रागानं म्हणाले, ‘तो सुद्धा आता या गुरुकुलातील विद्यार्थी आहे. तुम्ही त्याच्याशी त्याचं गुरुकुलातील नाव वापरून आदरानं बोलाल.’
प्रश्न विचारणाऱ्या मुलानं आवंढा गिळला. भीतीनं त्याचं अंग थरथर कापू लागलं. ‘त्याचं गुरुकुलातील नाव आहे, दिवोदास,’ वशिष्ठांच्या हातावरली पकड घट्ट करत विश्वामित्र म्हणाले. दिवोदास हे एका महान, प्राचीन राजाचं नाव होते. विश्वामित्रांनीच वशिष्ठांसाठी गुरुकुलातील हे नाव निवडलं होतं आणि मग मुख्याध्यापकांचं मन ते नाव आधिकारिक करण्यासाठी वळवलं होतं. म्हणाले, ‘आता बोला त्याचं नाव!’
पाचही मित्र गळाठून उभेच्या उभे होते.
रागावलेले विश्वामित्र त्यांच्या दिशेने चार पावले पुढे गेले. त्यांच्या संपूर्ण शरीरातून राग ओसंडत होता. भयंकर क्रोधी म्हणून ते प्रसिद्धच होते. ते त्या मुलांना म्हणाले, ‘माझ्या मित्राला त्याच्या गुरुकुलातील नावानं हाक द्या. म्हणा- दिवोदास.’
प्रश्न विचारणारा मुलगा अडखळत बोलला, ‘दिवो...दास...’
‘मोठ्यानं आणि आदरानं म्हण- दिवोदास.’
एकदम पाचही मुलांनी एकत्रच म्हटलं, ‘दिवोदास.’
विश्वामित्रांनी वशिष्ठांना आपल्या जवळ घेतलं. म्हणाला, ‘दिवोदास, हा माझा मित्र आहे. त्याच्याशी काही गडबड केली तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा.’
‘गुरुवर्य!’
हाकेनं वशिष्ठांना त्या काळातून वर्तमानात आणलं. जवळ जवळ 140 वर्षांहून जुनी आठवण. त्यांनी लगेच आपले डोळे पुसले. अश्रु लपविण्यासाठीच असतात.
शत्रुघ्नकडे पाहाण्यासाठी ते वळले. त्याच्या हातात सूर्य सिद्धांत चे हस्तलिखित होते.
याला संपूर्ण जगात यावेळी हेच पुस्तक मिळालं? काय योगायोग म्हणावा हा!....
एरवी या योगायोगावर वशिष्ठ हसले असते कदाचित, पण त्यांना माहित होतं की, या विषयावर आता बराच वेळ चर्चा चालेल. अयोध्येच्या चार राजपुत्रांपैकी हा छोटा राजकुमार चौघांमध्ये सगळ्यात जास्त हुशार होता. म्हणून गंभीर चेहऱ्याने शत्रुघ्नकडे पाहात ते म्हणाले, ‘काय प्रश्न आहे तुझा?’
दोन वर्षांनंतर सीता आणि राधिकेची भेट होत होती.
दरम्यानच्या काळात पार हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गांधार देशापर्यंत सीतेनं पश्चिम भारताचा प्रवास केला होता. भारतीय संस्कृतीच्या पावलांचे ठसे या पर्वतांपलीकडेसुद्धा पहायला मिळायचे. पण हिंदुशाही पश्तुनी आणि वीर बलुची लोकांचा वास असलेला हिंदुकुश प्रदेश हीच बहुधा भारताची पश्चिम सीमा मानली जात असे. त्यापलीकडील प्रदेश हा म्लेच्छांचा म्हणजे, विदेशी लोकांचा मानला जाई.
‘अनुच्या भूमीविषयी तुला काय वाटायचं?’ राधिकेनं विचारलं.
वीर योद्धा राजा अनु यांच्या वंशजांच्या राज्याची राजधानी होती केकय आणि केकयचे राजे होते अश्वपती. राजा अनु यांच्या वंशजांची केकयच्या छत्राखाली असलेल्या आसपासच्या बऱ्याच राज्यांच्या राजांची अश्वपतींच्या ठायी निष्ठा होती. आणि राजे अश्वपती यांची निष्ठा होती दशरथ राजांवर. निदान, सार्वजनिक रूपानं तरी असंच मानलं जाई. कारण, अश्वपती राजांची मुलगी कैकय राजा दशरथांची प्रिय राणी होती.
‘आक्रामक लोक आहेत,’ सीता म्हणाली, ‘अनुन्नकी एरवी काहीही करत नाहीत. त्यांची शक्ती जर चांगल्या कामाला लागली तर भारताचं कल्याण होईल. वेगवेगळ्या क्षेत्रात भारत यशाची वेगवेगळी शिखरं गाठेल. पण त्यांच्यावर जर नीट नियंत्रण ठेवलं गेलं नाही तर त्याच शक्तीमुळे गोंधळ माजेल.’
‘मान्य,’ राधिका म्हणाली,‘राजगृह सुंदर आहे ना?’
राजगृह ही केकयची राजधानी होती. झेलम आणि चिनाब नदीच्या संगमस्थळापासून जवळच ही नगरी वसलेली होती. नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर नगरीचा पसारा पसरला होता. तेथील राजाचा प्रचंड मोठा आणि स्वर्गीय सुंदर राजवाडा झेलम नदीच्या पूर्व किनारी होता.
‘हो, खरंच, खूप सुंदर आहे,’ सीता म्हणाली, ‘बांधकामात ते कुशल आहेत.’
‘आणि तेथील योद्धे क्रूर आहेत.. अक्षरशः वेडे आहेत!...’ गालातल्या गालात हसत राधिका म्हणाली.
सीता मोठ्यानं हसली. म्हणाली, ‘खरंय... क्रूरपणा आणि वेडेपणा यांना विभागणारी रेखा अतिशय झिरझिरीत असते.’
राधिका आज नेहमीपेक्षा खूप आनंदी आहे हे सीतेच्या लक्षात आलं होतं. ती म्हणाली, ‘मला अयोध्येच्या राजकुमारांविषयी आणखी सांग.’
‘रामचं उत्तम चाललंय. माझ्या वडिलांना खात्रीपूर्वक वाटतंय की गुरु वशिष्ठ त्याचीच निवड करतील.’
‘आणि भरत?’
राधिका थोडी लाजली. सीतेचा संशय खरा ठरला.
‘तो सुद्धा व्यवस्थित वाढत आहे.’ बोलताना राधिकेच्या चेहऱ्यावर स्वप्नील भाव होते.
‘एवढा व्यवस्थित?’ सीतेनं विनोद केला.
लाजून लाल झालेला राधिकाचा चेहरा काहीही न बोलता सगळं काही सांगून गेला. राधिकेनं सीतेच्या मनगटावर चापटी मारत म्हटलं, ‘गप गं!’
सीता मजेत हसली. म्हणाली, ‘देवी मोहिनींची शप्पत! राधिका प्रेमात पडलीय!!’
राधिकेनं सीतेवर डोळे वटारले. पण तिचं म्हणणं खोडलं नाही.
‘पण मग कायद्याचं काय...?’
राधिकाच्या कबील्याची संस्कृती मातृप्रधान होती. स्त्रियांना कबील्याबाहेरील पुरुषांशी विवाह करण्याची सक्त मनाई होती. केवळ एकाच अटीवर स्त्रियांना जमातीबाहेर विवाह करता येई, त्यांना जमातीतून घालवून दिलं जाई.
हात हवेत फटकारत राधिकेनं जणू तो विचारही निकालात काढला. म्हणाली, ‘ते सगळं भविष्यात पाहू, आता नको. सध्या मला फक्त भरतचा सहवास भोगू दे. निसर्गानं बनविलेला अद्भुत प्रेमी आणि अनुरागी व्यक्ती आहे भरत.’
सीता हसली. मग विषय बदलत तिने विचारलं, ‘आणि राम?’
‘अतिशय विरक्त, उदासीन, गंभीर वृत्तीचा.’
‘गंभीर आहे होय?’
‘हो. गंभीर आणि अर्थपूर्ण नेहमीच अर्थपूर्ण. अगदी कायम. कर्तव्यपूर्तता आणि दिलेला शब्द पाळण्याबाबत त्याची स्वतःची अगदी भक्कम आणि कठोर मतं आहेत. याबाबतीत तो इतरांबद्दल कठोर आहेच, पण तो स्वतःबद्दलही तेवढाच कठोर असतो. तो प्रचंड देशभक्त आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्याबद्दल त्याला प्रेम आहे. तो कायद्याला बांधील आहे. कायम! आणि त्याच्या शरीरात साधं एखादं हाडही प्रेमासाठी नसेल असं वाटतं. तो काही चांगला पती बनू शकणार नाही याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे.’
सीतानं बैठकीवर मागे सरकून पाठ टेकली आणि हात दोन बाजूंच्या उशांवर ठेवले. डोळे बारीक करून ती स्वतःशी पुटपुटली, पण तो चांगला विष्णू बनेल.
मैत्रिणींच्या या भेटीला आता एक वर्ष उलटलं होतं. सीता कामात एवढी अडकली होती की गेलं वर्षभर तिला मिथिला सोडून बाहेर जाणंसुद्धा शक्य झालं नव्हतं. त्यामुळे आधी न कळविता राधिका जेव्हा अचानक उगवली तेव्हा सीताला फार आनंद झाला.
सीतेनं प्रेमानं राधिकेचं स्वागत केलं. तिला मिठी मारली. पण राधिकेच्या डोळ्यांकडे जेव्हा तिचं लक्ष गेलं तेव्हा ती लगेच तिच्यापासून दूर झाली.
‘काय झालं?’
‘काही नाही,’ उदासपणे डोकं हालवत राधिका म्हणाली.
काय झालं असावं हे सीतेनं लगेच ताडलं. तिने आपल्या मैत्रिणीचे हात हातात घेतले. विचारलं, ‘त्य़ानं तुला सोडलं का?’
राधिकेच्या कपाळाला नाराजीच्या आठ्या पडल्या. नकारार्थी मान हालवत ती म्हणाली, ‘अजिबात नाही. तू भरतला जाणत नाहीस. अतिशय सभ्य माणूस आहे तो. खरं तर, त्यानं मी त्याला सोडू नये म्हणून अक्षरशः माझ्याकडे भीक मागितली. किती विनवण्या केल्या.’
हिने त्याला सोडलं!
‘देवी मोहिनी! हे मी काय ऐकतेय! तुझ्या जमातीच्या विचित्र नियमांचं जाऊ दे. तुला जर तो हवा असेल तर त्याला मिळविण्यासाठी तुला लढावं लागेल...’
‘नाही, हे कायद्याबद्दल नाही... तशीच वेळ आली असती तर मी जमात सोडलीही असती... मला जर त्याच्याशी विवाह करायचा असता तर...’
‘मग गाडी अडली कुठे?’ सीतेनं विचारलं.
‘नीट चाललं नसतं... आमचं, हे मला समजलं. मला या ‘महानता परियोजने’चा भाग व्हायचं नाहीय, सीता. मला ठाऊक आहे, राम, भरत आणि तू मिळून भारतासाठी भरपूर काही करू शकाल. प्रचंड व्यक्तीगत त्रासानंतरच बहुधा महानता वाट्याला येते. कायम असंच असतं. मला ठाऊक आहे. नेहमी असंच होत आलंय. आणि कायम असंच होत रहाणार आहे. मला मात्र माझ्या बाबतीत तसं व्हायला नकोय. मला सुखी व्हायचंय. मला महान व्हायचं नाहीय.’
‘तू फारच निराशावादी झाली आहेस, राधिका.’
‘नाही. मी निराशावादी होऊन विचार करत नाहीय. तू मला हवं तर स्वार्थी म्हणू शकतेस....’
सीता मध्येच म्हणाली, ‘मी तुला कधीही स्वार्थी म्हणू शकणार नाही. वास्तववादी असशील, पण स्वार्थी अजिबात नाहीस तू.’
‘मग वास्तवाबद्दलच बोलायचं तर, मी कशाचा विरोध करतेय ते मला ठाऊक आहे. जन्मभर मी माझ्या वडिलांना पाहात आलेय. त्यांच्यात एक आग आहे. मला ती त्यांच्या डोळ्यांत दिसते. कायम. तीच आग मला तुझ्यात दिसते. राममध्ये दिसते. तुम्ही सगळे सारखेच हात. भरतसुद्धा तुमच्यासारखाच आहे. तुम्हा सगळ्यांसारखाच तो सुद्धा मातृभूमीसाठी सगळं काही त्यागायला तयार आहे. मला फक्त सुखी आयुष्य जगायचंय...’
‘पण त्याच्याशिवाय तू सुखी होऊ शकशील का?’
राधिकेच्या दुःखी चेहऱ्यानं वेदना लपविण्याचा प्रयत्न केला नाही. ‘मी जर त्याच्यशी लग्न केलं आणि आपल्या सुखासाठी जन्मभर त्याला पदोपदी लागट बोलत राहिले, उणी-दुणी काढत राहिले, भारताबद्दलची त्याची स्वप्नं त्याला मी संपवायला सांगत राहिले. अशानं मी त्यालाही दुःखी करेन आणि स्वतःलाही दुःखी करेन.’
‘पण...’
‘आत्ता त्रास होतोय मला, पण वेळ सगळ्या जखमा भरून काढते, सीता. आजपासून काही वर्षांनी काय उरेल? तर, काही कडू-गोड आठवणी. खरं तर, गोड जास्त, कडू कमी. प्रेम आणि आसक्तीच्या आठवणी कुणीही, कधीही हिरावून घेऊ शकत नाहीत. आणि मला तेवढं पुरे.’
‘खूप विचार केलायस तू यावर?’
‘सीता, सुख हा अपघात नसतो. ती निवड असते. सुखी होणं आपल्याच हातात असतं. आणि, कोण म्हणतं की, आपल्याला केवळ एकच आत्मीय साथीदार मिळू शकतो? कधी कधी आपल्या मित्राला आपल्यात एवढ्या मूलभूत सुधारणा हव्या असतात की ते एकमेकांच्य दुःखाला कारणीभूत होतात. पुढे कधी मलासुद्धा दुसरा आत्मीय साथीदार मिळेल. मला जे हवं तेच ज्याला हवं असेल असा. तो कदाचित भरतसारखा आकर्षक नसेल, किंवा भरत जेवढा महान आहे तेवढा तो महान नसेल किंवा होणारही नाही, पण मला जे हवं तेच तो आणेल. साधा आनंद. मिळेल मला असा माणूस... आमच्या जमातीत. किंवा जमातीबाहेर.
सीतेनं आपला हात हळुवारपणे आपल्या मैत्रिणीच्या खांद्यावर ठेवला.
राधिकाने एक खोल श्वास घेतला. डोकं हालवलं. आपल्या विचारांच्या जाळ्यातून ती बाहेर आली. तिला मिथिलेत एका विशेष कामगिरीवर पाठविलं गेलं होतं. ‘आणि हो, गुरु वशिष्ठांनी निर्णय घेतलाय आणि वायुपुत्रांनीसुद्धा निर्णय घेतलाय.’
‘काय?’
‘तो रामच आहे.’
सीतेनं एक दीर्घ, समाधानाचा श्वास घेतला. मग तिच्या चेहऱ्यावर स्मित विलसू लागलं.
या नंतर एक वर्ष उलटलं. सीता आता चोवीस वर्षांची झाली होती. त्याआधीच्या वर्षी तिने संपूर्ण पश्चिम भारताचा दौरा केला होता. बलुचीस्तानच्या समुद्रकिनाऱ्यांपासून खाली दक्षिणेतील जिथे अगस्त्यकूटम् होतं त्या केरळपर्यंत. शेवटी ती मिथिलेला परतली होती. मग आपली सगळी तुंबलेली कामं करण्यात तिचा वेळ जात असे. तिला जो काही थोडा मोकळा वेळ मिळे तो ती आपल्या छोट्या बहिणीसोबत – उर्मिलेसोबत आणि वडील जनकांसोबत घालवे.
बऱ्याच काळापासून कुशध्वज मिथिलेला आले नव्हते. ते सांकश्यमध्येही नव्हते. हे थोडं विचित्र होतं. ते कुठे आहेत याबद्दल माहिती काढण्याचा सीतेनं प्रयत्न केला होता. पण तिला तोवर याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नव्हती. तिला सुलोचनच्या मृत्यूनंतर सांकश्यच्या प्रशासनाची योग्यता खूपच कमी झाली होती. सगळ्यांना वाटलं होतं की सुलोचनचा मृत्यू हृदयाघातानं झाला होता.
सीताला अधून-मधून आधी न कळविता येणाऱ्या राधिकेच्या भेटींची आता सवय झाली होती. त्यामुळे काही महिन्यांनंतर आलेल्या राधिकेचं तिनं अत्यंत आनंदानं स्वागत केलं.
‘कसं काय चाललंय, तुमच्या गावाचं?’ सीतेनं विचारलं. ‘आता अयोध्येच्या राजकुमारांचं यजमानत्व करण्याचा आनंद तरी संपला ना?’
राधिका हसत हसत म्हणाली, ‘ठीक आहे...’
‘तू ठीक आहेस ना?’ सीतेनं विचारलं.
‘ठीक होतेय...’
‘आणि अयोध्येत रामचं कसं चाललंय?’
‘त्याला नगररक्षक दलाचं प्रमुख बनवलं गेलंय. आणि भरतला परराष्ट्र सलोखा खात्याचं प्रमुख बनवलंय.’
‘हंSSSS… म्हणजे अजूनही राणी कैकयीची अयोध्येवर पकड आहे म्हणायची. पुढे वारस राजकुमार बनण्यासाठी योग्य पदावर त्याची नेमणूक केली गेलीय.’
‘असं वाटतंय खरं. नगररक्षक दलाच्या प्रमुखाचं पद हे पार कठिण आणि कष्टाचं मोल न करणारं पद असतं.’
‘आहे खरं असं. पण रामचं उत्तम चाललंय. त्यानं राज्याच्या अपराध दरात लक्षणीय घट आणलीय. त्यामुळे नागरिकांत तो फार लोकप्रिय झाला आहे.’
‘त्यानं ही जादू कशी साध्य केली?’
‘त्यानं फक्त कायद्याचं पालन केलं. हा हा हा!’
सीतासुद्धा गोंधळून हसली. मग म्हणाली, ‘रामनं कायदा पाळला तर कसा काय फरक पडतो? लोकांनीसुद्धा तो पाळला पाहिजे ना? आणि भारतातील लोक ते कधीच करणार नहीत. मला वाटतं, नियम किंवा कायदा तोडणं आपल्याला आवडतं. विनाकारण. फक्त झिंग येण्यासाठी म्हणून आपण कायदे तोडतो. भारतीयांशी वागताना माणसाला उपयुक्ततावादी असावं लागतं. कायदे लागू करायलाच हवेत हे खरं आहे, पण नुसते कायदे लागू करून भागत नाही. कधी कधी कायद्याला जे अपेक्षित असतं ते साध्य करण्यासाठी त्याचा गैरवापरही करावा लागतो.’
‘नाही, मला हे मान्य नाही. रामनं एक नवा मार्ग दाखवून दिला आहे. तो म्हणजे, त्यानं कायद्याला स्वतःसुद्धा बांधील आहोत याची लोकांना खात्री पटवून दिलीय. अयोध्येतील कुलीनांसाठी त्या कायद्यात कोणत्याही सवलती किंवा सूट नाही. अशा रीतीनं जेव्हा रामनं कायदा लागू केला तेव्हा सामान्य लोकांच्या मनात जणू वीज संचारली. त्यांना वाटलं, राजकुमारसुद्धा जर कायद्याला बांधील असेल तर आपण स्वतः का नाही?’
सीता आसनावर पुढे झुकून बसत म्हणाली, ‘मजेदार आहे...’
‘गुरू विश्वामित्र कुठे आहेत?’ राधिकेनं विचारलं.
सीता क्षणभर घुटमळली.
‘मी सहज विचारतेय. कारण आम्हाला वाटतंय, गुरू वशिष्ठ परिहाला गेले आहेत. विष्णू म्हणून रामची उमेदवारी सुचविण्यासाठी.’
ऐकून सीतेला धक्का बसला. ती उद्गारली, ‘गुरू विश्वामित्रसुद्धा परिहालाच गेले आहेत.’
राधिकाने उसासा टाकला. ‘सगळ्या बाबी लवकरच ठरतील. तू मात्र विष्णू म्हणून राम आणि तुझ्या भागीदारीबद्दल गुरु विश्वामित्रांना लवकरात लवकर सांगून त्याबद्दल त्यांची खात्री पटवून दे.’
सीतेनं एक दीर्घ श्वास घेतला. ‘वायुपुत्र काय करणार आहेत याबद्दल तुला काही माहिती आहे का?’
‘ते मी तुला आधीच सांगितलंय. त्यांचं झुकतं माप गुरु वशिष्ठांकडे कलतं आहे. प्रश्न एवढाच हे की गुरु विश्वमित्रांसमोर ते पडतं घेतील का? कारण तेच तर मलयपुत्रांचे प्रमुख आहेत. आणि मागील विष्णूंचे प्रतिनिधी आहेत.’
‘मी बोलेन हनुभाऊशी.’