प्रकरण 20
आश्चर्यचकित झालेली सीता आपल्या दालनात एकटीच बसली होती. तिला सुखद धक्का बसला होता.
लक्ष्मण आणि उर्मिलेत झालेल्या संभाषणाचा सारांश समीचीने तिला सांगितला होता. त्यावरून तिला समजून चुकलं होतं की लक्ष्मण आपल्या बहिणीच्या प्रेमात पडला आहे. त्याला आपल्या मोठ्या भावाबद्दल खूप अभिमान वाटतो हे सुद्धा तिच्या लक्षात आलं होतं. तो कायम रामबद्दल बोलत असे. लक्ष्मणाने उर्मिला आणि समीचीला रामचे लग्नाबद्दलचे विचार काय आहेत ते सांगितलं होतं. त्यावरून लक्षात येत होतं की रामला साधारण स्त्रीबरोबर विवाह करायचा नव्हता. जिच्यासमोर कौतुकानं मस्तक झुकावं अशी स्त्री त्याला पत्नी म्हणून हवी होती.
सीतेला हे सांगताना समीची हसली होती. ती म्हणाली होती, ‘राम एखाद्या शाळकरी मुलासारखा निरागस आणि सरळ आहे. तो अजून मोठा झालेला नाहीय. दुष्टपणाचा किंवा वास्तवाच्या भानाचा त्याच्यात लवलेशही नाही. माझ्यावर विश्वास ठेव सीता, त्याला काही दुखापत होण्याआधी अयोध्येला परत पाठव.’
कोणतीही प्रतिक्रिया न देता सीतेनं समीचीचं बोलणं ऐकून घेतलं होतं. पण तिच्या मनात एकच गोष्ट घुमत होती – रामला अशी स्त्री पत्नी म्हणून हवी होती जिच्यासमोर कौतुकानं मस्तक झुकावं.
त्यानं माझ्यासमोर आपलं मस्तक झुकवलं.
ती खुद्कन हसली. अशी ती याआधी बहुधा कधीच हसली नव्हती. वेगळंच वाटत होतं. थोडंसं बालिश...
आपण कशा दिसतो याबद्दल सीतेनं कधीही विचार केलेला नव्हता. पण का कोण जाणे आता ती आपसूक जाऊन आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःकडे पाहात राहिली.
ती जवळ जवळ रामएवढीच उंच होती. सडपातळ होती. पण शरीर मांसल होतं. कमावलेलं, पिळदार शरीर होतं तिचं. गव्हाळ रंगाची. शरीराच्या मानानं तिचा चेहरा उजळ होता. तिच्या गालांची हाडं उंच होती. छोटं पण सरळ नाक होतं तिचं. ओठ ना पातळ होते ना जाड. तिच्या दोन डोळ्यांतील अंतर थोडं जास्त होतं आणि ते न छोटे होते न मोठे. सुरकुत्या नसलेल्या पापण्यांवर जाड, धनुष्याकृती भुवया होत्या. आपल्या सरळ काळ्याभोर केसांचा तिने अंबाडा घातला होता.
ती हिमालयातील लोकांसारखी दिसत होती.
आणि पहिल्यांदाच आला असं नव्हे, पण तिच्या मनात विचार आला की, आपलं मूळ स्थान हिमालयातलं तर नसावं?
एका लढाईत दंडावर झालेल्या जखमेवरून हात फिरवताना तिचा चेहरा कसनुसा झाला. अशा व्रणांबद्दल कधी तिला फार अभिमान वाटायचा.
या व्रणांमुळे मी कुरूप दिसते का?
तिने नकळत नकारार्थी डोकं हालवलं.
तिच्या मनात आलं, रामसारखा माणूस माझ्या शरीरावरील अशा व्रणांचा आदर करेल. हे शरीर योद्ध्याचं आहे.
ती पुन्हा हसली. ती स्वतःला नेहमी योद्धा समजत असे. राजकुमारी असतानासुद्धा आणि आता शासक असतानाही. अलीकडे तर, मलयपुत्रांकडून विष्णूसारखी वागणूक मिळत असे त्याचीसुद्धा तिला सवय झाली होती. पण ही भावना नवीनच होती. आता तिला स्वतः अनन्यसाधारण अप्सरा असल्यासारखं वाटत होतं. कोणत्याही पुरुषाला केवळ आपल्या पापण्या फडफडवून जागीच खिळवून ठेवण्याएवढ्या आपण सुंदर आहोत असं तिला वाटत होतं. खरोखर, अत्यंत मादक विचार होता हा.
अशा सुंदर स्त्रिया तिला नेहमी तुच्छ आणि जीवनाविषयी गंभीर नसलेल्या वाटायच्या. पण आता मात्र तिला तसं वाटत नव्हतं.
सीतेनं कंबरेवर हात ठेवून एका बाजूनं तिरप्या नजरेनं स्वतःकडे पाहिलं.
पोळावस्तीत रामसोबत घालवलेले क्षण तिने पुन्हा आठवले.
राम...
हे नवीनच होतं. खास होतं. ती पुन्हा स्वतःशीच हसली.
तिने आपले केस मोकळे सोडले आणि ती आपल्या प्रतिबिंबाकडे पाहून हसली.
ही एका सुंदर नात्याची सुरवात होती.
अयोध्येतील शाही बागेच्या तुलनेनं मिथिलेची शाही बाग सर्वच बाबतीत छोटी होती. त्यात केवळ स्थानिक झाडं, रोपं, फुलांचे ताटवे होते. या बागेच्या सुंदरतेचं श्रेय खर्च केलेल्या अधिक रकमेऐवजी कुशल माळ्यांनाच देणं जास्त श्रेयस्कर ठरलं असतं. पण एकूण या बागेचा नकाशा प्रमाणबद्ध आणि व्यवस्थित काळजी घेतलेला वाटत होता. बागेतील दाट हिरव्या गवताची चादर नेत्रसुखद होती. बागेत वेगवेगळ्या आकाराची आणि रंगाची झाडं आणि फुलं भरपूर मोठ्या प्रमाणात होती. शिस्तबद्धरीत्या निसर्गानं इथे स्वतःला व्यक्त केलं होतं.
बागेमागच्या मोकळ्या जागेत सीता आणि उर्मिला त्यांची वाट पाहात होत्या. सीतेनं आपल्या छोट्या बहिणीला आपल्यासोबत येण्याची विनंती केली होती. त्यानिमित्ताने उर्मिलेला आणखी थोडा वेळ लक्ष्मणासोबत घालवता आला असता. शिवाय, यामुळे तिला लक्ष्मणाच्या ठळक उपस्थितीशिवाय रामबरोबर एकांतात थोडा वेळ मिळाला असता.
अयोध्येच्या राजकुमारांना घेऊन येण्याची जबाबदारी समीचीवर सोपविण्यात आली होती. थोड्याच वेळात ती तेथे आली आणि तिच्या पाठोपाठ राम आणि लक्ष्मणसुद्धा आले.
संध्याकाळच्या आकाशात त्याचा चेहरा आणखी तेजोमय दिसतोय... सीतेनं लगेच आपल्या भरकटणाऱ्या भावनांवर आणि हृदयाच्या धडधडीवर अंकुश लावला.
‘नमस्ते, राजकुमारी,’ राम सीतेला म्हणाला.
‘नमस्ते, राजकुमार,’ सीता म्हणाली.
मग आपल्या बहिणीकडे वळून ती म्हणाली, ‘माझ्या छोट्या बहिणीशी, उर्मिलेशी मी आपली ओळख करून देते.’ मग उर्मिलेकडे पाहून राम-लक्ष्मणाकडे संकेत करत सीता म्हणाली, ‘उर्मिला, हे अयोध्येचे राजकुमार राम आणि लक्ष्मण.’
या कानापासून त्या कानापर्यंत हसून लक्ष्मण म्हणाला, ‘काल यांच्या भेटीचा योग आला होता.’
उर्मिला लक्ष्मणाकडे पाहून नम्रपणे हसली. हात जोडून तिने लक्ष्मणाला नमस्कार केला. मग ती रामकडे वळली आणि त्यालाही नमस्कार केला.
‘मला आज राजकुमाराशी पुन्हा एकांतात बोलायचं आहे,’ राजकुमारी सीता म्हणाली.
‘जरूर,’ समीची लगेच म्हणाली. ‘त्याआधी मी एकांतात आपणाशी थोडं बोलू शकेन का?’
समीची सीतेला बाजूला घेऊन गेली आणि तिच्या कानांत कुजबुजत म्हणाली, ‘सीता, मी जे म्हणते ते नीट लक्षात ठेव. राम खूपच साधा आहे. त्यामुळे त्याचं जीवन खरंच खूप मोठ्या संकटात सापडणार आहे. म्हणून, तू त्याला परत जायला सांग. हे सांगायची ही शेवटची संधी आहे.’
सीता शांतपणे हसली. समीचीच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याचा निर्णय तोवर घेऊन झाला होता.
मग तिने रामकडे एक कटाक्ष टाकला. त्यानंतर उर्मिलेचा हात धरून ती तिला घेऊन तिथून निघून गेली. लक्ष्मण उर्मिलेपाठोपाठ गेला.
रामने सीतेला विचारले, ‘राजकुमारी तुला मला भेटायचे होते, ते का?’
समीची आणि इतर सगळे गेल्याची सीतेने खात्री करून घेतली. बोलायला सुरवात करणार तेवढ्यात तिची नजर रामच्या उजव्या मनगटात बांधलेल्या धाग्याकडे गेली. ती हसली.
त्याने दोरा बांधलाय.
मग म्हणाली, ‘राजकुमार, कृपया मला एक मिनिटाचा वेळ द्या.’
सीता एका झाडामागे गेली. वाकून तेथे खोळात गुंडाळून ठेवलेली मोठी वस्तू उचलली. ती घेऊन ती रामजवळ आली. राम उत्सुकतेनं हे सगळं पाहात होता. सीतेने त्या वस्तूवरून खोळ उतरवला तेव्हा रामला आतली वस्तू दिसली. ते एक असामान्य लांबीचं धनुष्य होतं. त्यावर अतिशय नाजूक कोरीवकाम केलेलं होतं. अत्युत्तम शस्त्र होतं ते. एक संयुक्त धनुष्य ज्याची दोन्ही टोकं मागे वळलेली होती. बहुधा त्यातून निघालेला बाण खूप दूरवर जात असावा. रामने धनुष्याच्या मुठीच्या वरच्या आणि खालच्या भागाच्या आतील बाजूला केलेलं कोरीवकाम लक्षपूर्वक पाहिलं. त्यावर ज्योतीचं चित्र रेखाटलेलं होतं. ज्योत म्हणजे अग्नीदेवतेचं प्रतीक. अत्यंत पूज्य असलेल्या अग्निदेवतेला ऋग्वेदाच्या पहिल्या अध्यायातील पहिला श्लोक समर्पित होता. पण या ज्योतीची आकृती रामला थोडी वेगळी वाटली.
सीतेने कापडी पिशवीतून एक चपटे लाकडी धनुष्यपीठ ओढून बाहेर काढले आणि विधिवत ते जमिनीवर ठेवले. मग तिने रामकडे पाहिले. म्हणाली, ‘या धनुष्याला जमिनीचा स्पर्श होता कामा नये.’
रामला त्या धनुष्याचं खूप आकर्षण वाटलं. त्याला वाटलं या धनुष्यात एवढं आहे तरी काय? सीतेने धनुष्याचा खालचा भाग त्या पीठावर टेकवला. स्थिरतेसाठी त्याला आपल्या पायाचा आधार दिला. उजव्या हाताने तिने जोर लावून धनुष्याचे दुसरे टोक ओढून खाली आणले. यामुळे तिच्या खांद्यावर आणि दंडावर पडलेल्या जोरामुळे रामच्या लक्षात आलं की हे धनुष्य अतिशय मजबूत आहे आणि त्याला वाकवणं अत्यंत जिकिरीचं आहे. डाव्या हाताने तिने धनुष्याची दोरी ओढली आणि पटकन वरच्या टोकावर टांगली. मग तिने धनुष्याचे वरचे टोक सोडून त्याला पूर्वपदी जाऊ दिले. मग श्वास मोकळा करत अंग सैल सोडले. दोरीच्या क्षमतेनुसार धनुष्य ताणले गेले. तिने मग डाव्या हातावर धनुष्य पेलून प्रत्यंचा ताणली आणि सोडून दिली. सोडलेल्या दोरीतून मोठा ‘टॅंग’ असा आवाज आला.
प्रत्यंचेच्या आवाजावरून रामने ताडलं की हे धनुष्य खास आहे. आजपर्यंत त्याने धनुष्याच्या ताणलेल्या प्रत्यंचेचे जितके आवाज ऐकले होते त्यांच्याहून हा आवाज खूप मोठा होता. तो म्हणाला, ‘अरे वा:! हे एकदम उत्तम धनुष्य आहे!’
‘हे सगळ्यात उत्तम धनुष्य आहे.’
‘हे धनुष्य तुझं आहे का?’
‘माझ्याजवळ असं धनुष्य असणं शक्य नाही. मी फक्त या धनुष्याची सध्या काळजीवाहक आहे. माझ्या मृत्यूनंतर इतर कुणाकडे ही जबाबदारी सोपवली जाईल.’
धनुष्याच्या मुठीजवळची ज्योतीची चित्रे पाहाताना रामने डोळे बारीक केले. पाहाता पाहाता तो म्हणाला, ‘या ज्योती थोड्या...’
सीता मध्येच म्हणाली, ‘हे धनुष्य एकेकाळी त्याचं होतं ज्याची आपण दोघे पूजा करतो. अजूनही हे त्याचंच आहे.’
रामला आश्चर्याचा धक्का बसला. अचंभित होऊन तो धनुष्याकडे पाहात राहिला. त्याच्या मनात आलेल्या विचारांना दुजोरा देत सीतेनं त्याला सांगितलं.
हसत सीता म्हणाली, ‘होय, हे पिनाक आहे.’
पिनाक हे पूर्वीच्या महादेवाचं म्हणजे रुद्रदेवांचं परंपरागत धनुष्य होतं. आजपर्यंत निर्मिलेल्या धनुष्यांमध्ये ते सर्वात अधिक मजबूत धनुष्य होतं. कित्येक धातुंच्या मिश्रणाने ते बनविलेलं होतं अशी आख्यायिका होती. त्याची कोणत्याही प्रकारे हानी होऊ नये म्हणून त्यावर एकामागून एक असे कित्येक उपचार केलेले होते. हे धनुष्य सांभाळणंसुद्धा सोपं नाही अशी वदंता होती. मूठ, वक्राकार आणि दोन्ही टोकाच्या मागे वळलेल्या धनुष्याच्या भागांना नियमीतपणे खास तेलाचं वंगण द्यावं लागत असे.
‘मिथिलेला पिनाक कसे मिळाले?’ रामने विचारले. त्या सुंदर शस्त्रावरून त्याची नजर हालत नव्हती.
‘फार मोठी गोष्ट आहे ती,’ सीता म्हणाली, ‘पण तू या धनुष्याचा सराव करावास अशी माझी इच्छा आहे. उद्या स्वयंवरात याच धनुष्याचा वापर करण्यात येणार आहे.’
राम एक पाऊल मागे सरकला. त्याकाळी कित्येक प्रकारे स्वयंवर आयोजित केलं जायचं. त्यापैकी दोन प्रकार असे होते – वधु स्वतः आपल्या पसंतीने वराची निवड करे किंवा तिच्या वतीने स्पर्धा घेतली जाई. या स्पर्धेत जिंकणाऱ्याशी वधूचा विवाह होई. पण स्वयंवरात भाग घेणाऱ्या वराला आधीच माहिती आणि मदत देण्याची पद्धत मात्र नियमांच्या विरुद्ध होती.
रामने नकारार्थी डोकं हालवलं. तो म्हणाला, ‘ज्या धनुष्याला कधी रुद्रदेवांचा स्पर्श झाला होता त्याला स्पर्श करायला मिळणे हा सुद्धा सन्मानच आहे. पण मी हे उद्याच करेन, आज नाही.’
सीतेच्या कपाळावर नाराजीच्या आठ्या उमटल्या. काय? याला माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही?
ती म्हणाली, ‘मला वाटलं, तुला माझा हात जिंकायचाय.’
‘होय, मला नीट रीतीनं जिंकायचंय. मी नियमानुसारच जिंकू इच्छितो.’
सीता हसली.
हा माणूस काहीतरी वेगळाच आहे. इतिहासात सगळ्यांनी याला कसं लुबाडलं याची तरी नोंद होईल किंवा तो कुणीतरी महान व्यक्ती बनेल.
रामशी लग्न करण्याचा निर्णय आपण घेतला याचा तिला विशेष आनंद वाटत होता. तरी मनाच्या एका कोपऱ्यात तिला भीतीसुद्धा वाटत होती. कारण तिला कळून चुकलं होतं की या माणसाचे हाल होणार आहेत. त्याच्याबद्दल तिला जेवढी माहिती होती त्यावरून जीवनात आत्तापर्यंतही त्याने खूप काही सहन केलंय हे तिला ठाऊक होतं.
‘तुला हे पटत नाहीय का?’ रामने तिला विचारलं. त्याचा थोडा अपेक्षाभंग झाल्यासारखा वाटत होता.
‘नाही, तसं नाही. मला फारच आवडलं. तू वेगळा आहेस, राजकुमार राम.’
राम लाजला.
तो पुन्हा लाजतोय...!
‘उद्या सकाळी या धनुष्यातून बाण सोडशील आणि ते मी पाहीन,’ सीता म्हणाली.
‘त्याने मदत नाकारली? खरंच?’ आश्चर्य वाटून जटायूंनी विचारलं.
हल्ली जंगलातील एका भागात जटायू आणि सीता नियमीतपणे भेटत असत त्याच ठिकाणी आजही त्यांची भेट झाली होती. नगराच्या उत्तर दिशेला हे स्थान होतं. रावणाची तात्पुरती छावणी जिथे होती तेथून ही जागा बरीच लांब होती.
‘हो,’ सीता म्हणाली.
जटायू डोकं हालवत हासले. ‘तो काही सामान्य माणूस नाही,’ ते म्हणाले.
‘नाहीच. पण मलयपुत्र ही गोष्ट मान्य करतील की नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकणार नाही.’
जणू मलयपुत्रांच्या प्रमुखांना आपलं बोलणं ऐकू गेलं की काय अशी धास्ती त्यांना वाटल्यासारखे जटायूंनी लगेच आसपास जंगलावर एक नजर टाकली. विश्वामित्रांना राम आवडत नसे हे त्यांना ठाऊक होतं. अयोध्येचा राजकुमार त्यांच्यासाठी केवळ एक साधन होता, साध्य करून घेण्यासाठीचं एक साधन.
‘ठीक आहे. शब्द काही त्यां...’ सीतेनं त्यांचं नाव घेणं टाळलं. मग म्हणाली, ‘रामबद्दल आपलं काय मत आहे?’
‘कित्येक बाबतीत तो वेगळा आहे, ताई,’ जटायू सावधपणे कुजबुजले. ‘कदाचित आत्ता आपल्या देशाला ज्याची गरज आहे असा आहे तो. नियमांबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल टोकाचा आग्रही. या महान भूमीबद्दलचं त्याचं प्रेम, सगळ्यांकडून, अगदी स्वतःकडूनही त्याच्या उच्च अपेक्षा...’
शेवटी, तिच्या मनावर प्रचंड दडपण आणणारा प्रश्न तिने जटायूंना विचारला, ‘मलयपुत्रांनी रामबद्दल उद्याच्या स्वयंवराच्या संदर्भात जे काही ठरवलंय त्यापैकी मला काही माहीत असायला हवं का?’
जटायू गप्प झाले. ते थोडे अस्वस्थही झाले असावेत असं सीतेला वाटलं.
‘तुम्ही मला आपली बहीण मानता, जटायू. आणि मी जे विचारतेय ते माझ्या भविष्याबद्दल, पतीबद्दल आहे. मला माहीत असायला हवं.’
जटायूंची नजर खाली वळली. मलयपुत्रांवरची निष्ठा आणि सीतेबद्दलची भक्ती या दोहोंमध्ये ते भरडले जात होते.
‘कृपया जटायू, मला सांगा. माहीत असायला हवं मला.’
पाठ ताठ करत जटायूंनी एक दीर्घ श्वास सोडला. मग म्हणाले, ‘आपल्या गंगा आश्रमाजवळ काही असुरांवर हल्ला झाल्याची घटना तुला आठवत असेल ना?’
विश्वामित्र अयोध्येला गेले होते आणि एक गंभीर सैनिकी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी राम आणि लक्ष्मणाची मदत मागितली होती. ते त्या दोघांना घेऊन गंगा नदीजवळच्या आपल्या आश्रमात गेले होते. तेथे त्यांनी राम आणि लक्ष्मणाला आपल्या मलयपुत्र सैनिकांच्या एका तुकडीला घेऊन असुरांच्या एका छोट्या कबिल्यावर हल्ला करण्यास सांगितलं होतं कारण त्या कबील्याचे लोकच गुरुवर्यांच्या आश्रमावर वारंवार हल्ले करतात असं त्यांचं म्हणणं होतं. असुर कबील्याच्या समस्येचं निवारण झाल्यानंतरच ते सीतेच्या स्वयंवरात भाग घेण्यासाठी मिथिलेच्या दिशेने रवाना झाले होते.
‘हो,’ सीता म्हणाली, ‘रामचं जीवन त्यावेळी संकटात सापडलं होतं का?’
जटायूंनी नकारार्थी मान हालवली. ते म्हणाले, ‘तो दयनीय स्थितीतील काही वेडपट लोकांचा एक कबीला होता. असमर्थ योद्धे होते ते. रामचं आयुष्य कधीही संकटात सापडलं नव्हतं.’
सीतेच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. ती गोंधळली होती. म्हणाली, ‘मला हे समजत नाहीय...’
‘मुळात रामचा काटा काढण्याची ती योजनाच नव्हती. त्याच्या तुल्यबळ समर्थकांसमोर त्याची पत घालवायची हाच यामागील हेतू होता.’
कटाबद्दल माहिती मिळाली आणि अविश्वासानं सीतेचे डोळे विस्फारले गेले.
‘मलयपुत्रांना कधीही त्याचे प्राण हरायचे नव्हते. त्यांना फक्त त्याला पुढील विष्णूसाठीच्या संभाव्य उमेदवारीतून बाद करायचं होतं आणि आपल्या नियंत्रणात ठेवायचं होतं.’
‘मलयपुत्रांचा रावणाला जाऊन मिळण्याचा विचार तरी नव्हता ना?’
सीतेचा प्रश्न ऐकून जटायूंना धक्का बसला. ते म्हणाले, ‘महान विष्णू, आपण हा प्रश्न मनात तरी कसा आणू शकता? ते कधीही रावणाला सामील होणार नाहीत. खरं तर, ते त्याचा नाश करू इच्छितात. पण योग्य वेळी. लक्षात ठेव, भारताला त्याची महानता पुन्हा मिळवून देणे केवळ या एका उद्देशाशी मलयपुत्र इमान राखतात. इतर कोणत्याही गोष्टी त्यांच्या लेखी महत्वाच्या नाहीत. रावण हा त्यांच्यासाठी उद्दीष्टपूर्तीचं केवळ एक साधन आहे.’
‘रामसुद्धा. आणि मी सुद्धा.’
‘नाही. नाही... मलयपुत्र तुमचा केवळ वापर करून घेतील असा विचारही तुझ्या मनात कसा येतो?’
सीतेनं जटायूंकडे पाहिलं, शांतपणे. समीची कदाचित बरोबरच सांगत होती. काही शक्ती माझ्या नियंत्रणाच्या पार पलीकडे आहेत. आणि राम...
जटायूंनी सीतेच्या विचारांची साखळी तोडली आणि अनिच्छेनंच तिला तिने काय करावं याबाबत एक संकेत दिला. ते म्हणाले, ‘लक्षात ठेवा, महान विष्णू, मलयपुत्रांच्या योजनेतील आपण एक अत्यंत महत्वाचा दुवा आहात. ते काहीही करून तुम्हाला सुरक्षित राखतील. तुम्हाला काहीही होऊ देणार नाहीत. तुमच्यावर कोणतंही संकट येणार नाही.’
सीता हसली. जटायूंनी तिला संकेत दिला होता. आपण काय करायचं हे आता तिला कळलं होतं.