उशीरा रात्रीची वेळ होती. चौथ्या प्रहरातील चौथी घटिका होती. राम, सीता, लक्ष्मण, समीची पोळा वस्तीच्या छतावरील तटाच्या भिंतीच्या आतल्या बाजूच्या टोकाला उभे होते. सुरक्षिततेचा उपाय म्हणून संपूर्ण पोळा वस्ती रिकामी केली गेली होती. खंदकावरील तराफ्याचा पूल नष्ट केला गेला होता.
मिथिलेच्या सुरक्षादलात एकूण चार हजार नगर रक्षक आणि रक्षिका होते. लाखभर लोकांची वस्ती असलेल्या छोट्या राजधानीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एवढे दळ पुरेसे होते. दुहेरी तटबंदीचा फायदा लक्षात घेतल्यानंतरही हा प्रश्न अजून बाकी होता, की, लंकेच्या रावणाच्या अंगरक्षकांकडून होणारा हल्ला हे दल परतवू शकेल का? कारण, नगर रक्षक दलाला विरोधी दलाचं प्रमाण दोनास पाच असं होतं.
आपण हे करू शकू याचा सीतेला विश्वास होता. घेरलेला प्राणी अधिक भयानकरीत्या हल्ला करतो. मिथिलावासी विजय मिळविण्यासाठी किंवा संपत्ती मिळविण्यासाठी किंवा आपला अहंकार कुरवाळण्यासाठी लढत नव्हते; ते आपलं नगर उध्वस्त होऊ नये म्हणून लढत होते. आणि हे उघड्या मैदानावर समोरासमोर लढलं जाणारं पारंपरिक युद्ध नव्हतं. मिथिलेचे लोक संरक्षणात्मक भिंतींच्या मागे होते- खरं तर दुहेरी भिंतींमागे होते. युद्धामध्ये संरक्षणासाठी दोन तटबंदीं उभारण्याची नवीन क्लृप्ती अलीकडे इतर किल्ल्यांमध्ये क्वचितच आजमावली गेली असेल. लंकेच्या सैनिकांनी अशा परिस्थितीची कल्पनाही केली नसावी. या सोयीमुळे तुलनेनं कमी सैन्यबळ असल्यानं फार मोठा फरक पडणार नव्हता.
राम आणि सीतेनं बाहेरील तटबंदीच्या भिंतीच्या संरक्षणाचा विचार सोडून दिला. त्यावर चढून रावणाच्या सेनेनं आतल्या तटबंदीवर हल्ला करावा अशी त्यांची योजना होती. त्यानुसार त्यांनी हल्ला केला तर ते दोन तटबंदीच्या मध्ये अडकले असते. ते या कोंडीत अडकले की मग मिथिलेच्या रक्षकांनी त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला असता. मिथिलेच्या रक्षकांकडून होणाऱ्या बाणांच्या भडिमारामुळे लंकेच्या सैनिकांसाठी ती कोंडी मारक स्थान बनली असती. दुसऱ्या बाजूनंही बाणांचा वर्षाव होणार हे मिथिलेच्या रक्षकांनी गृहित धरलं होतं. त्यापासून बचावासाठी रक्षकांना आपापल्या लाकडी ढाली सोबत बाळगण्याचा सल्ला दिला गेला होता. मिथिला नगरीतील जमावबंदीच्या कामी या ढालींचा वापर होत असे. लक्ष्मणाने त्यांना बाणांपासून बचावाच्या काही सामान्य युक्त्या शिकविल्या.
‘मलयपुत्र कुठे आहेत?’ लक्ष्मणाने रामला विचारले.
सीतेनं सभोवार नजर टाकली, पण उत्तर दिलं नाही. तिला खात्री होती की ऐनवेळी मलयपुत्र तिला सोडून जाणार नाहीत. तिला खात्री होती की शेवटच्या क्षणी कराव्या लागणाऱ्या तयारीत ते गुंतले असावेत. लंकेच्या लोकांनी माघार घ्यावी म्हणून धमक्या आणि लाच देऊन काही साधता येतं का हे सुद्धा ते आजमावत असावेत.
मलयपुत्र रणभूमीत मोर्चेबांधणीसाठी आले नाहीत याचं रामला आश्चर्य वाटत होतं. राम कुजबुजला, ‘मला वाटतं, फक्त आपल्यालाच लढावं लागेल.’
लक्ष्मणानं खेदानं डोकं हालविलं, तो थुंकला आणि मोठ्यानं म्हणाला, ‘भ्याड कुठचे.’
सीताने यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. गेल्या काही दिवसांत तिला लक्ष्मण फार तापट आहे हे कळलं होतं. होणाऱ्या युद्धात तिला त्याची गरज पडणार होती.
‘ते पाहा,’ समीची म्हणाली.
समीचीने दाखविलेल्या दिशेला सीता आणि लक्ष्मणाची नजर वळली.
मिथिलेच्या बाहेरील तटबंदीला लागून असलेल्या खंदकवजा तलावापलीकडे पेटत्या मशालींच्या रांगा दिसू लागल्या होत्या. रावणाच्या अंगरक्षकांनी संपूर्ण संध्याकाळ झटून मेहनत केली होती. त्यांनी जंगलातील झाडे कापून त्यांपासून पलीकडे जाण्यासाठी होड्या बनविल्या होत्या.
पाहाता पाहाता रावणाच्या अंगरक्षकांनी आपल्या होड्या तलावाच्या पाण्यात उतरवायला सुरवात केली. मिथिलेवर हल्ला करण्याची कारवाई सुरू झाली होती.
‘वेळ झाली,’ सीता म्हणाली.
‘होय,’ राम म्हणाला, ‘आणखी अर्ध्या तासात ते बहुधा तटबंदीच्या बाहेरील भिंतीपाशी पोहोचतील.’
रात्रीच्या अंधारात शंखध्वनी घुमला. आतापावेतो तो आवाज रावण आणि त्याच्या सेनेकडून येतो हे लोकांना ठाऊक झाले होते. मशालींच्या झगझगत्या उजेडात रावणाच्या अंगरक्षकांनी मोठमोठ्या शिड्या मिथिलेच्या बाहेरील तटबंदीच्या भिंतीशी लावल्या.
‘ते इथे पोहोचले,’ राम म्हणाला.
मागे वळून सीतेनं मान हालवून आपल्या संदेशवाहकांना तो संदेश पोहोचविण्याचा संकेत दिला.
तो संदेश मिथिलेच्या आता सैनिक बनलेल्या नगररक्षकांपर्यंत पोहोचविण्यात आला. रावणाचे सैनिक आता बाणांचा वर्षाव करतील असं सीतेला वाटलं होतं. लंकेचे सैनिक जोवर पहिल्या तटबंदीच्या बाहेर आहेत तोवरच बाण चालवतील असा त्याचा होरा होता. ज्या क्षणी ते भिंतीवर चढतील त्या क्षणापासून त्यांच्याकडून होत असलेला बाणांचा वर्षाव थांबेल हे त्याला ठाऊक होतं. आपल्या लोकांवर बाण चालवणं लंकेच्या धनुर्धाऱ्यांना परवडलं नसतं.
अचानक वादळ आल्यासारखा व्हूSSSश असा आवाज आला आणि त्यापाठोपाठ बाणांचा वर्षाव सुरू झाला.
‘ढाली,’ सीता ओरडली.
मिथिलेच्या रक्षकांनी लगेच आपल्या ढाली सावरल्या. बाणांचा वर्षाव झेलण्यासाठी ते सज्ज झाले. अशा वेळी सीतेची उपजतबुद्धी कामी आली.
बाणांचा आवाज. एकदम हजार बाण सोडल्यानंतर येणाऱ्या आवाजापेक्षा तो आवाज मोठा होता. तो आवाज बाणांचा नसावा, काहीतरी मोठं शस्त्र असावं.
स्वतःला ढालीमागे लपवत तिने रामकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. त्यालाही संकटाचा सुगावा लागला असावा असं त्याच्या मुद्रेवरून तिला वाटलं.
त्यांचे अंदाज बरोबर ठरले.
प्रचंड ताकदीच्या मोठमोठ्या क्षेपणास्त्रांतून मिथिलावासियांवर बाणांचा वर्षाव केला जात होता. मिथिलेच्या रक्षकांच्या वेदनांनी भरलेल्या किंकाळ्या, बाणांनी त्यांच्या ढाली फुटल्याचे भीतीदायक आवाज यांनी आसपासचं वातावरण भरून गेलं. मिथिलेचे कित्येक सैनिक क्षणार्धात यमसदनी पाठविले गेले होते.
‘काय आहे हे?’ ढालीमागे लपत लक्ष्मणाने विचारलं.
सीतेने पाहिलं की, वेगानं आलेला एक बाण लोण्याच्या गोळ्यात घुसणाऱ्या सुरीसारखा रामच्या ढालीत घुसला आणि त्याच्या ढालीचे दोन तुकडे झाले. तसूभराच्या अंतरानं राम वाचला होता.
आणि... तो बाण नव्हता, भाला होता!
मिथिलेच्या रक्षकांच्या ढाली बाणांपासून संरक्षणासाठी होत्या, मोठ्या भाल्यांपासून नव्हे.
ते इतक्या दुरून भाले कसे फेकताहेत?!
बाणांचा पहिला वर्षाव थांबला होता. सीतेला ठाऊक होतं, हा केवळ काही क्षणांचा विश्राम आहे. पुन्हा बाणांचा वर्षाव सुरू होणार आहे. रामसारखीच तिनंही ढाल खाली घेतली आणि भोवताली नजर टाकली.
रामचे उद्गार तिला ऐकू आले, ‘रुद्रदेवा, दया करा ...’
आसपास भयंकर संहाराची चिन्हं पसरली होती. रावणाच्या सैनिकांनी केलेल्या बाणांच्या वर्षावामुळे ढाली फुटून मिथिलेचे किमान एक चतुर्थांश रक्षक मारले गेले होते किंवा जखमी झाले होते.
रामने सीतकेडे पाहिलं न् तो म्हणाला, ‘कोणत्याही क्षणी भाल्यांचा वर्षाव पुन्हा सुरू होईल! घरात जा!’
‘घरात जा!’ सीता ओरडली.
‘घरात जा!’ सेनाधिकाऱ्यांनी ओरडा केला आणि सारे घरांच्या दिशेने धावत निघाले. दरवाजे उचलले आणि त्यांनी आत उड्या मारल्या. अत्यंत अव्यवस्थितपणे घेतलेली माघार होती ती. पण ती प्रभावकारक ठरली. काही मिनिटांतच मिथिलेचे जवळ जवळ सगळे रक्षक सुरक्षितपणे घरांत पोहोचले होते. आणि, पोळा वस्तीच्या छतावर पुन्हा पहिल्यासारखा बाणांचा वर्षाव सुरू झाला. घरात येण्याच्या प्रयत्नांत जे अर्धवट बाहेर राहिले होते ते सगळे बाणांच्या भडिमारात मारले गेले. बाकीचे - निदान सध्यापुरते तरी, सुरक्षित स्थळी पोहोचले होते.
घरांच्या सुरक्षिततेत पोहोचता क्षणी रामने सीतेला बाजूला ओढले. लक्ष्मण आणि समीचीसुद्धा आत आले. समीचीचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला होता. कपाळ चोळत ती असहाय होऊन आपल्या राजकुमारी सीतेच्या मागे उभी होती.
सीतेचा श्वास जोरजोरात चालला होता. चारही बाजूंनी घेरून कोपऱ्यात लोटत आणलेल्या वाघिणीच्या डोळ्यांसारखे तिचे डोळे भडकलेले होते. तिच्या रंध्रा-रंध्रातून राग ओसंडून वाहात होता.
‘आता काय करायचं?’ रामनं सीतेला विचारलं, ‘रावणाचे सैनिक बाहेरील तटबंदीची भिंत ओलांडून आत आले असावेत. लवकरच ते आपल्यासमोर येतील. त्यांना अडवणारं, थोपवणारं कुणीच नाहीय
‘सीता?’ रामने पुन्हा प्रश्नार्थक स्वरात सीतेला हाक दिली.
अचानक सीतेचे डोळे विस्फारले. ती उद्गारली, ‘खिडक्या!’
‘काय?’ पंतप्रधानांच्या उद्गारांनी आश्चर्यचकित होऊन समीचीने विचारलं.
सीतेनं लगेच आपल्या नगर रक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना बोलावलं. तिने त्यांना माऱ्यातून वाचलेल्या मिथिलेच्या सगळ्या रक्षकांना पोळा वस्तीतील खिडक्यांवर लागलेल्या लाकडाच्या चौकटी उचकटायच्या कामाला जुंपण्याची आज्ञा दिली. यातील काही खिडक्या आतल्या तटबंदीच्या समाईक भिंतीवर तर काही घरांच्या मधल्या मोकळ्या जागेत उघडत होत्या. ते ज्या खोलीत होते तिची खिडकी दोन तटबंदींमधील मोकळ्या जागेत उघडत होती. म्हणजे, तेथून सरळ-सरळ हल्ला करणाऱ्या लंकेच्या सैनिकांवर बाण सोडता येणार होते!
‘अत्युत्तम!’ लक्ष्मण मोठ्या आवाजात म्हणाला. घाईघाईने तो जाळी लागलेल्या एका खिडकीच्या दिशेने गेला. आपला हात मागे नेला, स्नायू थोडे ताणले आणि खिडकीच्या लाकडी गजांवर त्याने पूर्ण ताकदीनिशी ठोसा लगावला. त्याच्या एका ठोशाने खिडकीत बसवलेली जाळीची चौकट उचकटली.
पोळा वस्तीच्या या भागातील सारी घरे आतल्या बाजूने एकमेकांशी छोट्या वाटांनी जोडलेली होती. संदेश वाऱ्यासारखा पसरला. काही क्षणांतच मिथिलेच्या सैनिकांनी खिडक्यांच्या चौकटी उखडल्या आणि, बाहेरील-आतील तटबंदीच्या भिंतींमध्ये असलेल्या लंकेच्या सैनिकांवर बाणांचा वर्षाव केला. लंकेच्या सैनिकांनी आपल्या मार्गात अडथळे येणार नाहीत हे गृहित धरलं होतं. त्यामुळे बाणांच्या या वर्षावाचा त्यांच्यावर अचूक परिणाम झाला. त्यांचे बरेच सैनिक धारातीर्थी पडले. प्रचंड नुकसान झालं.
मिथिलेचे सैनिक बाणांचा निरंतर वर्षाव करत राहिले. लंकेच्या शक्य तितक्या सैनिकांना त्यांनी गारद केलं. त्यामुळे हल्ल्याचा वेग बराच मंदावला.
अचानक शंखध्वनी सुरू झाला. पण यावेळी त्याचा स्वर वेगळा होता. लंकेचे सैनिक लगेच मागे फिरले आणि धावत सुटले. जितक्या वेगात त्यांनी हल्ला केला होता तितक्याच वेगात त्यांनी माघार घेतली.
मिथिलेच्या सैनिक दलात उत्साहाची लाट पसरली. त्यांनी पहिला हल्ला परतवून लावला होता.
पहाटेच्या वेळी राम, लक्ष्मण आणि सीता पोळा वस्तीच्या छतावर उभे होते. लंकेच्या सैनिकांच्या भाल्यांमुळे झालेल्या नासधुसीच्या उध्वस्त दृश्यावर कोवळे सूर्यकिरण पसरले होते. उजेड झाला आणि हृदय पिळवटून टाकणारं दृश्य पाहून किती नुकसान झालंय हे लक्षात आलं.
मिथिलेच्या सैनिकांचे छिन्नविच्छिन्न देह सभोवती पसरलेले होते. सीता त्यांच्याकडे पाहात राहिली. त्यापैकी काहींची डोकी धडांवर लटकलेली होती. काहींचे कोथळे बाहेर निघालेले होते. काही भाल्यामुळे झालेल्या जखमेतून रक्त वाहून गेल्याने गतप्राण झाले होते.
‘माझे कमीत कमी हजार सैनिक तरी...’
‘वहिनी, आपणही त्यांना मोठा दणका दिलाय,’ लक्ष्मण म्हणाला, ‘आतील आणि बाहेरील तटबंदींच्या भिंतींमध्ये लंकेच्या किमान हजार सैनिकांचे मृतदेह विखुरलेले आहेत.’
अश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांनी सीतेने लक्ष्मणाकडे पाहिलं. ती खेदाने म्हणाली, ‘हो, पण त्यांच्याकडे अजून नऊ हजार सैनिक आहेत. आणि आपल्याकडे केवळ तीन हजार आहेत.’
खंदकवजा तलावाच्या पलीकडे रावणाच्या छावणीवर रामने नजर टाकली. सीतेची नजरही तिकडे वळली. तेथे रुग्णालयांचे तंबू उभारले गेले होते. त्याचवेळी त्यांच्यापैकी बरेच जण झाडे तोडून जंगल मागे हटवण्याच्या कामात गुंतले होते.
म्हणजे, त्यांचा लंकेला परत जाण्याचा मनसूबा नव्हता हे स्पष्ट होतं.
‘पुढच्या वेळी ते आणखी चांगल्या तऱ्हेने हल्ला करतील,’ राम म्हणाला, ‘जर ते तटबंदीची आतली भिंतही पार करून आले तर... तर मग सगळंच संपेल.’
सीतेने रामच्या खांद्यावर हात ठेवला आणि उसासा सोडला. तिची नजर जमिनीवर पसरलेल्या विध्वंसावर खिळलेली होती. रामला केलेल्या साध्या स्पर्शाने तिला धीर मिळत असावा असं वाटत होतं. जणू, आता तिच्याजवळ ज्याच्यावर विसंबून रहाता येईल असा मित्र होता.
मागे वळून सीतेने आपल्या शहरावर एक नजर टाकली. रुद्रदेवांच्या भव्य मंदिराच्या घुमटावर तिची नजर स्थिरावली. पोळा वस्तीपलीकडील उद्यानाच्या पलीकडे ते मंदिर होतं. तिच्या डोळ्यांत कठोर निग्रह झळकला. त्या निग्रहानं तिच्या नसांनसांत फौलाद ओतलं.
‘हे अजून संपलेलं नाहीय. मी नागरिकांना युद्धात भाग घेण्याची विनंती करते. स्वयंपाकाच्या सुऱ्या घेऊन जरी ते इथे येऊन उभे राहिले तरी आपली संख्या लंकेच्या त्या कुचकामी सैन्याच्या दसपटीने वाढेल. आपण नक्कीच त्यांचा सामना करू शकू.’
रामच्या खांद्याच्या स्नायूंतील धडधड सीतेच्या हाताला जाणवत होती. तिने रामच्या डोळ्यांत पाहिले. तिथे तिला केवळ आत्मविश्वास आणि भरंवसा दिसला.
त्याचा माझ्यावर विश्वास आहे. मी हे हाताळावं एवढा त्याचा माझ्यावर भरंवसा आहे!
मी हे करेन. आता मी हारणार नाही.
निश्चय झाल्यासारखी सीतेने मान हालवली आणि घाईघाईने ती निघाली. मिथिलेच्या रक्षकांना तिने आपल्या मागून येण्याची खूण केली.
राम आणि लक्ष्मणही तिच्या मागोमाग निघाले. सीता मागे वळली. म्हणाली, ‘कृपया इथेच थांबा. विश्वासातलं कुणीतरी इथे असायला हवं. युद्धाबद्दल ज्याला माहिती आहे, असं कुणीतरी इथे हवं. इथे थांबण्यासाठी आणि लंकावासियांनी जर अचानक हल्ला केला तर सैनिकांचं नेतृत्व करण्यासाठी कुणीतरी इथे हवं.’
यावर लक्ष्मण काहीतरी बोलू इच्छित होता पण रामने त्याला गप्प रहाण्याची खूण केली आणि तो गप्प राहिला.
‘आम्ही इथे थांबतो, सीता,’ राम म्हणाला, ‘आम्ही आहोत तोवर एकही लंकावासी नगरात प्रवेश करू शकणार नाही. लवकरात लवकर इतरांना तयार कर.’
सीता हसली आणि जणू कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिने रामच्या हाताला स्पर्श केला.
मग ती वळली आणि धावत निघाली.
दुसऱ्या प्रहरातील तिसरी घटिका होती. नऊ वाजण्याचा सुमार. दिवसाचा स्वच्छ प्रकाश पसरलेला होता. पण हा प्रकाश मिथिलावासियांच्या डोक्यात अकलेचा उजेड पाडू शकला नव्हता. मिथिलेच्या एक हजार वीर नगर रक्षक दलातील जवानांच्या युद्धातील मृत्यूच्या बातमीने आणि पोळा वस्तीतील हाहाकारानंसुद्धा नागरिकांच्या मनात राग उफाळून आला नव्हता. कितीतरी पटींनी अधिक संख्येच्या शत्रूचा पुरेशी शस्त्रास्त्रं नसताना सीतेच्या नेतृत्वात मिथिलेच्या नगर सुरक्षा दलानं केलेल्या सामन्याच्या वीरश्रीयुक्त घटनांबद्दल ऐकूनसुद्धा त्यांच्या मनात स्फूर्ती किंवा चैतन्य निर्माण झालं नव्हतं. खरं तर, लोकांना वाटत होतं की सीतेनं शरणागती पत्करावी, तडजोड स्वीकारावी आणि वाटाघाटी करून प्रश्न मिटवावा.
सीतेनं स्थनिक नेत्यांना बाजाराच्या चौकात बोलावलं होतं. नागरिकांची सेना बनवून लंकावासियांचा सामना करण्याचा विचार तिच्या मनात होता. ही काही तासांआधीची गोष्ट. मातृभूमीसाठीसुद्धा आपल्या जीवनाला किंवा आपल्या संपत्तीला कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करण्याची श्रीमंतांची वृत्ती ही आश्चर्याची बाब नव्हतीच. पण आधी सुनयना आणि नंतर सीतेनं लागू केलेल्या सुधारणांमुळे ज्या गरीबांचं कल्याण झालं होतं त्यांनासुद्धा आपल्या राज्यासाठी लढण्याची गरज वाटत नव्हती हे खरोखर धक्कादायक होतं.
मिथिलावासियांनी आपला भ्याडपणा लपविण्यासाठी नैतिकतेचा मुलामा देऊन जी कारणं मांडली होती ती ऐकून सीतेला वाटत होतं की रागानं आपली एखादी नस तडकेल.
‘आपण खरं तर व्यावहारिकदृष्ट्या विचार करायला हवा....’
‘गरीबीतून काबाडकष्ट करून आम्ही एवढी संपत्ती कमावली, आमच्या मुलांसाठी चांगल्या शिक्षणाची सोय केली, जमीन-जुमला खरेदी केला तो काय एका युद्धात हे सगळं गमावण्यासाठी?’
‘खरंच, हिंसेनं कोणता प्रश्न सुटला आहे का? आपण खरं तर प्रेमाचा प्रसार करायला हवा, युद्धाचा नाही...’
‘युद्ध हे खरं तर पुरुषप्रधान समाजातील उच्चभ्रू लोकांचं कारस्थान असतं....’
‘लंकावासीसुद्धा आपल्यासारखेच मानव प्राणी आहेत. आपण त्यांच्याशी बोललो तर ते नक्की आपलं ऐकतील...’
‘आपलं मन नक्की स्वच्छ आहे का? लंकेच्या लोकांबद्दल आपल्याला जे वाटतं ते बोलायला आपण स्वतंत्र आहोत, पण आपण स्वयंवरात रावणाचा अपमान केलाय हे खरंय ना?...’
‘एवढे जवान जर मारले गेले तर त्यात काय मोठंसं? आमचं रक्षण करणं, आणि ते करता करता मरण आलं तर ते पत्करणं हेच तर त्यांचं काम आहे. आणि ते हे सगळं फुकटात करतात असंही नाही. आम्ही कर देतो तो कशासाठी? आणि कराबद्दलच बोलायचं तर लंकेच्या लोकांना कमी कर द्यावा लागतो...’
‘मला वाटतं, आम्ही लंकेच्या लोकांशी बोलायला हवं. याबद्दल मत घेऊ सगळ्यांचं...’
आपली सहनशक्ती संपुष्टात आल्यानंतर सीतेनं राजा जनक आणि उर्मिलालासुद्धा नागरिकांना समजावण्याची विनंती केली. मिथिलावासियांच्या मनात आपल्या राजा जनकांबद्दल संतासारखा आदर होता, पण त्यांनी केलेल्या लढण्याच्या कळकळीच्या विनंतीचासुद्धा मिथिलेच्या नागरिकांवर काहीही परिणाम झाला नाही. महिलांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या उर्मिलेच्या विनंतीलासुद्धा विशेष यश मिळालं नाही.
सीताच्या मुठी रागानं घट्ट आवळल्या गेल्या. मिथिलेच्या भ्याड जनतेला ती रागानं काहीतरी बोलणार होती पण तेवढ्यात कुणाचा तरी हात तिच्य खांद्यावर आला. मागे वळून पाहिलं तेव्हा तिथे समीची उभी असलेली तिला दिसली.
सीतेनं लगेच तिला बाजूला घेतलं आणि विचारलं, ‘कुठवर पोहोचले ते?’
विश्वामित्र किंवा अरिष्टानेमींना शोधून आणण्यासाठी समीचीला पाठवण्यात आलं होतं. अशा कठिण प्रसंगी, विशेषतः तिच्या नगराला बेचिराख करण्याची धमकी मिळालेली असताना मलयपुत्र तिची साथ सोडून जातील यावर विश्वास ठेवण्यास सीतेनं नकार दिला. आपल्या नगरीसोबत ती स्वतःसुद्धा मरून जाईल याची त्यांना जाणीव होती. आणि तिला ठाऊक होतं की तिचं जगणं त्यांच्यासाठी फार महत्वाचं होतं.
‘मी त्यांना सगळीकडे शोधलं, सीता,’ समीची म्हणाली, ‘पण मला ते कुठेही सापडले नाहीत.’
खाली पाहात सीतेनं तोंडातल्या तोंडात त्यांना लाखोली वाहिली.
समीचीनं खूप कष्टानं आवंढा गिळला. म्हणाली, ‘सीता...’
सीतेनं आपल्या मैत्रिणीकडे पाहिलं.
‘तुला ऐकायला आवडणार नाही हे मला ठाऊक आहे, पण सध्या आपल्यासमोर इतर कोणताही पर्याय उरलेला नाही. आपल्याला लंकावासियांशी वाटाघाटी कराव्याच लागतील. जर आपण राजा रावण यांना...’
रागानं सीताचे डोळे आग ओकू लागले. ती म्हणाली, ‘माझ्यासमोर अशा गोष्टी बोलायच्या नाहीत...’
सीता बोलता बोलता मध्येच थांबली कारण पोळा वस्तीच्या दिशेने कोणतातरी मोठा आवाज ऐकू आला.
काही तासांपूर्वी ज्या भागामध्ये लंकेच्या लोकांशी लढाई झाली होती तेथून न दिसणाऱ्या पोळा वस्तीच्या छताच्या भागातून काही विस्फोटांचे आवाज ऐकू आले होते. त्यानंतर काही सेकंदांतच एक छोटं क्षेपणास्त्र तेथून उडालं होतं. असुरास्त्रानं अजस्त्र वळण घेत उड्डाण केलं. केवळ काही सेकंदांतच त्याने मिथिलेच्या दोन्ही तटबंदींचं अंतर ओलांडलं. त्या ठिकाणी लंकेचे लोक आहेत हे सीतेला ठाऊक होतं.
डोळे जणू क्षेपणास्त्राला चिकटल्यासारखे बाजाराच्या चौकात उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती स्तंभित होऊन क्षेपणास्त्राचा तो वेगानं होत असलेला प्रवास पाहात राहिली. सीतेचा अपवाद वगळता त्यांच्यापैकी कुणालाही तेथे नेमकं काय चाललंय याची यत्किंचितही कल्पना नव्हती.
मलयपुत्र रात्रभर काय करत होते आणि आत्ता त्यांनी काय केलं ते लख्खपणे सीतेच्या लक्षात आलं.
असुरास्त्र.
खंदकवजा तलावावर असताना क्षेपणास्त्रात ऐकू येईल न येईलसा विस्फोट झाला.
लंकेच्या छावणीवर असुरास्त्र फिरलं आणि नाटकीयरीत्या त्यात विस्फोट झाला.
विस्फोट झालेल्या क्षेपणास्त्रातून भडक हिरवा प्रकाश निघालेला मिथिलावासियांनी पाहिला. कानाला दडे बसणारा आवाज करत त्याचा विस्फोट झाला. वीज चमकावी तसा तो चमकला. विस्फोट झालेल्या क्षेपणास्त्राचे तुकडे खाली पडताना त्यांनी पाहिले.
आकाशात जेव्हा हे थरारनाट्य घडताना ते पाहात होते तेव्हा क्षेपणास्त्रात झालेल्या मुख्य विस्फोटाच्या आवाजानं मिथिलेच्या तटबंदीच्या भिंती हादरल्या. बाजाराच्या चौकात, जिथे काही मिनिटांपूर्वी नागरिकांची सभा भरली होती तेथपर्यंत विस्फोटांचे हादरे जाणवले.
मिथिलावासियांनी त्या भयंकर आवाजाच्या भीतीने आपले कान झाकले. काही लोक देवाच्या दयेसाठी प्रार्थना करू लागले.
तेथे जमा झालेल्या लोकांवर भीतीदायक शांततेचं सावट पसरलं. कित्येक घाबरलेले मिथिलावासी गोंधळून इकडे-तिकडे पाहातच राहिले.
पण मिथिला वाचली हे सीतेला समजलं होतं. आता यानंतर काय होणार याचा तिला अंदाज होताच. रावण आणि त्याच्या लंकेच्या साथीदारांवर आभाळ कोसळलं. त्या सगळ्यांची आता शुद्ध हरपणार. कित्येक आठवडे नाहीतर निदान कित्येक दिवस ते त्याच अवस्थेत रहाणार. त्यांच्यापैकी काही लोक कदाचित मरतीलही.
पण तिचं शहर आता सुरक्षित होतं. ते वाचवलं गेलं होतं.
पोळा वस्तीतून रावणावर बाजी पालटविल्यानंतर कदाचित रावणाच्या सैनिकांना थोपविण्याचा केवळ हा एकच मार्ग शिल्लक उरला होता.
सुटकेची भावना जेव्हा तिच्या नसांनसांत पसरली तशी ती कुजबुजली, ‘रुद्र देवा! मलयपुत्रांवर आणि गुरु विश्वामित्रांवर कृपा असू द्या.’
मग, अचानक क्षणार्धात तिचा आनंद कापरासारखा विरून गेला. भयानं तिच्या हृदयात भाल्यासारखा प्रवेश केला.
असुरास्त्र कुणी चालवलं?
असुरास्त्र बऱ्याच अंतरावरून डागावं लागतं हे तिला ठाऊक होतं. आणि केवळ अतिशय निष्णात धनुर्धारीच हे काम यशस्वीरीत्या पार पाडू शकतो. दूरवरून बाण चालवून असुरास्त्र डागू शकतील असे आत्ता मिथिलेत केवळ तीन लोक होते. विश्वामित्र, अरिष्टानेमी आणि...
राम... कृपा करून... नको... रुद्र देवा, दया असू द्या.
सीता धावतच पोळा वस्तीच्या दिशेनं निघाली. तिच्या मागोमाग समीची आणि तिचे अंगरक्षकही निघाले.