प्रकरण 25
दोन तरुण जोडप्यांनी अयोध्येच्या बंदरात प्रवेश केला तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांना उचंबळून आलं. जणू संपूर्ण अयोध्या नगरी त्यांच्या स्वागतासाठी बंदरावर त्यांची वाट पाहात उभी होती.
प्रवासात रामबरोबर सीतेनं वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या होत्या आणि त्यात तिला खूपच आनंद मिळाला होता. लोकांच्या भल्यासाठी राज्य कशाप्रकारे उत्तम तऱ्हेने चालविता येईल याबद्दल त्यांनी सविस्तर चर्चा केली. जन्मासोबत जात जोडली जाण्याची वाईट प्रथा बंद ह्वावी म्हणून राज्यानं मुलांना अनिवार्यतः जन्माच्या वेळीच दत्तक घेण्याची संकल्पना तिने बोलून दाखवली होती. आपण हल्लीच ही संकल्पनेवर स्वीकारली आणि मुळात ही संकल्पना गुरु विश्वामित्रांची आहे हे तिने सांगितलं नाही. रामचा विश्वामित्रांवर विश्वास नव्हता, म्हणून. पूर्वाग्रहामुळे एखादी चांगली संकल्पना का डागाळायची? गुरु वशिष्ठांनी तयार केलेल्या ठोक सोमरस निर्मितीच्या तंत्रज्ञानाबद्दलही त्यांनी चर्चा केली. सोमरस एक तर सगळ्यांसाठी उपलब्ध असावा किंवा कुणासाठीही उपलब्ध नसावा असं रामला वाटे. सोमरस पूर्णपणे नाहीसा करणं शक्य नसल्यामुळे गुरु वशिष्ठांची सगळ्यांसाठी सोमरस निर्माण करण्याचं तंत्रज्ञान वापरून तो सगळ्यांना उपलब्ध करून द्यावा असं त्यानं सुचवलं.
या चर्चांमध्ये खूप गंमत यायची. पण एकदा अयोध्येत पोहोचलो की काही काळासाठी अशा चर्चांसाठी वेळ मिळणं दुरापास्त आहे हे ती जाणून होती. रामने अयोध्येत गेल्यानंतर करायच्या कामांची आखणी करून ठेवली होती. त्यात सगळ्यात आधी, वनवासासाठी जाण्यापासून कुणी त्याला रोखू नये याची त्याला व्यवस्था करायची होती. शिवाय, त्याला शक्तिहीन मिथिला राज्याच्या दत्तक कन्येशी विवाह करण्यामागची कारणंही सगळ्यांना पटवून द्यावी लागणार होती. जटायूंनी गंमतीनं सुचवलं होतं की अयोध्यावासियांना ती विष्णू आहे याचा सुगवा द्यावा, म्हणजे मग त्यांच्या लक्षात येईल की रामने सीतेशी विवाह का केला. सीताने हसून त्यांचं बोलणं कानांआड केलं होतं.
जहाजाच्या कठड्यापाशी उभं राहून सीतेनं भव्य पण अस्ताला चाललेल्या अयोध्या नगरीचं बंदर पाहिलं. सांकश्यच्या बंदराच्या तुलनेने ते कितीतरी पटींनी मोठं होतं. अजेय नगरी अयोध्येला घेरणाऱ्या या कालव्यात शरयू नदीचं पाणी पाट काढून सोडण्यात आलं होतं.
काही शतकांपूर्वी, सम्राट अयुतायुसांच्या शासनकाळात उग्र शरयू नदीचं पाणी खेचून हा कालवा बांधला गेला होता. त्यावेळी त्याचे आकारमान भव्य होते. पन्नास किलोमीटर्सहून अधिक असलेला त्याचा विस्तीर्ण घेर अयोध्येच्या तिसऱ्या आणि शेवटच्या तटाच्या भिंतीपर्यंत पसरलेला होता. आणि किनाऱ्यापासूनची त्याची रुंदीसुद्धा जवळ जवळ अडीच कि.मी. पेक्षा अधिक होती. या कालव्याची साठवण क्षमता प्रचंड होती. निर्माणानंतरच्या सुरवातीच्या काही वर्षांत पात्राच्या खालच्या अंगाला असलेल्या राज्यांनी पाण्याच्या तुटवड्याबद्दल तक्रारी केल्या होत्या. पण अयोध्येच्या शक्तीशाली योद्ध्यांनी त्यांच्या तक्रारी पार चिरडून टाकल्या होत्या.
या कालव्याचा एक मुख्य हेतु सैन्याशी निगडीत होता. एका अर्थी हा कालवा खंदक होता. त्याच्यामुळे किल्याला चारही बाजूंनी संरक्षण प्राप्त झालं होतं. संभाव्य हल्लेखोरांना या खंदकातून वल्ही चालवत नदीसारख्या रुंदीचा या कालवा ओलांडावा लागत असे. आणि हे वेडं साहस करणाऱ्या वीरांना कालव्याचं पात्र ओलांडताना कोणताही अडोसा नसल्यामुळे अजेय नगरी अयोध्येच्या तटावरून चोवीस तास धडाडत असणाऱ्या तोफांच्या माऱ्याला बळी पडावं लागत असे. या कालव्यावर चार मुख्य दिशांना चार पूल बांधलेले होते. किल्याच्या बाहेरील तटबंदीत या पुलांवरून नगरात प्रवेशासाठी पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या चार दिशांना चार भक्कम प्रवेशद्वारे बनवलेली होती. प्रत्येक पूल दोन भागात विभागलेले होते, प्रत्येक भागात मनोरा आणि उचल-पाड करता येणारे पूल होते. ज्यान्वये कालव्याच्या ठिकाणीच किल्याला दुहेरी संरक्षणाची व्यवस्था केली गेली होती.
तरीही, या प्रचंड कालव्याला केवळ संरक्षण व्यवस्था मानणं चूक ठरलं असतं. अयोध्यावासियांसाठी हा कालवा एक धार्मिक प्रतीक होता. तो विशाल कालवा आणि त्यातील गूढ-गहिरं संथ पाणी त्यांना समुद्राची आठवण करून देत असे. अब्जावधी वर्षांपूर्वीच्या याच पौराणिक, अतिप्राचीन, आदिम शून्यभारित समुद्राच्या मध्यभागी या ब्रह्मांडाची निर्मिती झाली होती. अब्जावधी वर्षांपूर्वी एकाचा प्रचंड मोठा विस्फोट होऊन त्यातून अनेकाची निर्मिती झाली होती. आणि त्यातूनच निर्मितीच्या चक्राला चालना मिळाली होती.
आधुनिक युगात ज्याला परमपिता किंवा ब्रह्म म्हटले जाते त्या निराकार एका चे अभेद्य नगरीतील अयोध्यानिवासी स्वतःला या विश्वातील प्रतिनिधि समजत असत. प्रत्येक जीवात त्या परमपित्या ब्रह्माचा वास असतो असं ते मानत असत. काही पुरुष आणि महिला या अंतरात्म्याला जागृत करू शकत असत आणि त्यामुळे देव पदाला पोहोचू शकत असत. अशा रीतीने देव पदाला प्राप्त झालेल्या लोकांची अयोध्या नगरीत भव्य मंदिरे उभारली गेलेली होती. अयोध्यानगरीतील विशाल कालव्यात बेटं बनवून त्यावरसुद्धा अशी मंदिरे बांधलेली होती.
अर्थात, गुरु वशिष्ठ जाणून होते की या कालव्याच्या निर्मितीमागची कारणे अतिशय रोकठोक, रुक्ष असून ती अशा सांकेतिकता आणि अद्भुतरम्यता यांच्या पलीकडे जाणारी आहेत. वेगवान शरयू नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यावर नियंत्रण राखण्यासाठी यातील द्वारांचा उत्तम रीत्या उपयोग करून घेणे हाच या कालव्याच्या निर्मितीमागचा प्रमुख हेतू होता. पूर येणे ही त्याकाळी उत्तर भारतातील नेहमीची समस्या होती.
एरवी नदीतून पाणी काढण्याऐवजी कालव्याच्या शांत, सौम्य पात्रातून पाणी काढणं तसं सोपं होतं. मोठ्या कालव्यांमधून काढलेल्या छोट्या कालव्यांनी संपूर्ण अयोध्या नगरीत पाणी खेळवलं जात असे. यामुळे शेती उत्पादनात अभूतपूर्व वाढ झाली होती. शेती उत्पादन वाढल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांना जमीन कसण्याच्या कामातून मुक्तता मिळाली होती. कारण कौसल राज्यातील प्रचंड जनसंख्येला अन्नपुरवठा करण्यासाठी केवळ काही शेतकऱ्यांची मेहनत पुरेशी पडू लागली होती. शेतीकामातून उसंत मिळालेल्या मजूर वर्गाला कुशल सैन्य अधिकाऱ्यांनी उत्तम प्रशिक्षण देऊन सैन्यात भरती करून घेतलं होतं. त्यामुळे अयोध्येकडे उत्तम सेना तयार झाली होती. या सैन्यानं आसपासचे बरेच प्रदेश जिंकून घेतले. आज अयोध्येचा राजा असणाऱ्या महाराज दशरथांचे आजोबा महान सम्राट रघू यांनी आपल्या कारकिर्दीत संपूर्ण सप्त सिंधू प्रदेश जिंकून घेतला होता आणि ते चक्रवर्ती सम्राट बनले होते.
दशरथांनीसुद्धा दूरवरचे प्रदेश जिंकून या वारशात भर टाकली होती आणि ते सुद्धा चक्रवर्ती सम्राट बनले होते. या सूर्यवंशी राजांची शक्तीसुद्धा सूर्याप्रमाणेच दिगंत फैलावलेली होती. अशा प्रकारे, राक्षस कुलातील लंकेच्या राजाने सप्त सिंधू प्रदेशाच्या सेनेला करछपच्या युद्धात वीस वर्षांपूर्वी पहिल्याच हल्ल्यात गारद करण्याआधीपर्यंत सर्व काही आलबेल होतं.
करछपच्या युद्धात अयोध्या हारली आणि परिणामी रावणाने सप्तसिंधू प्रदेशातील सर्व राज्यांवर, विशेषतः अयोध्येवर दंडात्मक कारवाईअंतर्गत व्यापारी कर लादले. या करांमुळे अयोध्येची शाही तिजोरी हलकी झाली. या ऱ्हासाचे दृश्य परिणाम तटबंदीला लागून असलेल्या कालव्यावर आणि त्यासोबतच्या इमारतींवर ही दिसून येऊ लागले होते.
अयोध्येवर स्पष्ट दिसून येत असलेली ऱ्हासाची लक्षणं तिच्या उतरत्या कळेची साक्ष देत असतानाही सीतेला अयोध्येनं खूप प्रभावित केलं होतं. सप्त सिंधू प्रदेशातील इतर सर्व नगरांपेक्षा हे नगर मोठं होतं. ऱ्हासोन्मुख असूनही अयोध्या मिथिलेहून कित्येक पटींनी भव्य नगर होतं. यापूर्वीही ती अयोध्येत आली होती, पण त्यावेळी ती अज्ञात होती. यावेळी पहिल्यांदाच ती सगळ्यांच्या लक्षात येत होती. लोक तिच्याकडे पाहात होते, तिला पारखत होते. अयोध्येच्या राजपरिवाराच्या अंगरक्षकांनी सुरक्षित अंतरावर थोपवून धरलेल्या कुलीन आणि सामान्य नागरिकांच्या तिच्याकडे पाहाणाऱ्या नजरेत तिला हे दिसत होतं.
बोटीवर चढण्या-उतरण्यासाठी वापरला जाणारा पूल येऊन जहाजाच्या कठड्यावर आदळला. त्याच्या आवाजानं सीतेच्या मनात माजलेली विचारांची गर्दी पांगली. एक तरतरीत, सुंदर माणूस तो पूल जहाजाशी जोडत होता. तो रामपेक्षा उंचीनं कमी होता पण अंगा-पिंडानं मजबूत होता.
हाच भरत असावा.
त्याच्या सोबत एक छोट्या चणीचा आणि उत्तम कपडे परिधान केलेला माणूस होता. त्याचे डोळे शांत आणि बुद्धिमत्तेची झलक असणारे होते. मोजून-मापून पावलं टाकत तो सावकाश चालत होता.
शत्रुघ्न...
‘दादा!’ भरत ओरडून म्हणाला, आणि धावत येऊन त्याने रामला मिठी मारली.
राधिका भरतच्या प्रेमात का पडली हे तेव्हा सीतेच्या लक्षात आलं. तो खरोखर खूपच आकर्षक होता.
भरतला मिठी मारता मारता राम हसत म्हणाला, ‘हा माझा भाऊ.’
भरत दोन पावलं मागे आला आणि त्यानं त्याच उत्साहानं लक्ष्मणाला मिठी मारली. त्याचवेळी अतिशय शांतपणाने शत्रुघ्नाने आपल्या वडील भावाला, रामला मिठी मारली.
मग ते चार भाऊ सीता आणि उर्मिलेच्या दिशेने वळले.
राम अभिमानाने आपला हात उंचावून म्हणाला, ‘आणि ही सीता, माझी पत्नी आणि तिच्या शेजारी लक्ष्मणाची पत्नी उभी आहे – उर्मिला.’
शत्रुघ्नाने हसतमुखानं दोन्ही हात जोडून म्हटलं, ‘नमस्कार. आपणा दोघींना भेटणं हा माझा सन्मानच आहे.
लक्ष्मणानं शत्रुघ्नाच्या पोटावर चापटी मारली आणि म्हटलं, ‘तू फारच औपचारिक वागतोस शत्रुघ्ना.’ मग त्यानं पुढे येऊन उर्मिलेला मिठी मारली. म्हणाला, ‘आमच्या कुटुंबात आपलं स्वागत आहे.’
उर्मिला हसली. तिचं अवघडलेपण किंचित कमी झालं.
मग भरत आपल्या मोठ्या वहिनीकडे वळला. सीतेचे हात हातात घेऊन तो म्हणाला, ‘मी तुमच्याद्दल खूप ऐकलंय, वहिनी... मला नेहमी वाटायचं, स्वतःपेक्षा चांगली पत्नी शोधणं माझ्या भावाला जमणार नाही.’ रामकडे पाहून तो हसला आणि पुन्हा सीतेकडे वळत म्हणाला, ‘पण माझ्या दादामध्ये अशक्य ते शक्य करून दाखविण्याची क्षमता आहेच.’
सीता मंद मंद हसली.
भरतने आपल्या वहिनीला मिठी मारली अन् म्हणाला, ‘आमच्या कुटुंबात आपलं स्वागत आहे, वहिनी.’
अयोध्येचे रस्ते माणसांनी नुसते फुलून गेले होते. त्या सगळ्यांना आपल्या राजकुमाराचं स्वागत करायचं होतं. त्यापैकी काही लोकांनी उत्साहानं राजकुमाराच्या पत्नीचंसुद्धा स्वागत केलं. मिरवणूक गोगलगायीच्या गतीनं पुढे सरकत होती. सर्वात पुढील रथात राजकुमार राम आणि सीता होते. लोकांकडून होणाऱ्या भरघोस स्वागताचा, जयघोषाचा स्वीकार करताना राम संकोचून गेला होता. त्यांच्या रथामागे आणखी दोन रथ होते. एका रथात भरत आणि शत्रुघ्न होते आणि दुसऱ्या रथात लक्ष्मण आणि त्याची पत्नी उर्मिला. भरत अत्यंत उत्साहानं जमावाकडून होत असलेल्या स्वागताला हात हालवून आणि हवेत चुंबनं फेकून उत्तर देत होता. शेजारी गंभीर आणि नम्रपणे उभ्या असलेल्या उर्मिलेला नाजुक उर्मिलेला आपला हात लागू नये म्हणून आपले बुंध्यांसारखे हात काळजीपूर्वक हालवून लक्ष्मण गर्दीच्या स्वागताला उत्तर देत होता. शत्रुघ्न नेहमीसारखा- जमावाच्या वागणुकीचा शैक्षणिक दृष्टीकोनातून अभ्यास करत असल्यासारखा गर्दीकडे स्थिर आणि निर्विकारपणे पाहात उभा होता.
गर्दी मोठ्या आणि स्पष्ट शब्दांत चारही भावांच्या नावाच्या घोषणा देत होती –
राम!
भरत!
लक्ष्मण!
शत्रुघ्न!
त्यांचे चार प्रिय राजपुत्र. राज्याचे रक्षणकर्ते. शेवटी ते पुन्हा सगळे एकत्र आले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याचा वारस राजपुत्र आता परत आला होता. जिंकून! तिरस्कृत रावणाला हरवून परतला होता तो!
लोकांनी त्याच्यावर फुलं उधळली, पवित्र अक्षता टाकल्या... सगळेच अतिशय आनंदी आणि उल्हसित होते. दिवसा-उजेडी लोकांनी दगडी दीपस्तंभ दिवे लावून सजवले होते. कित्येकांनी आपल्या अंगणात-कुंपणाच्या भिंतींवर दीप उजळवले होते. तेजस्वी सूर्यप्रकाश पसरला होता जणू आपल्याच सूर्यवंशीय राजकुमाराला तो वंदनच करत होता. सूर्यवंशीयांचं भूषण असलेला राम!
एरवी तीस मिनिटात जे अंतर पार केलं जायचं ते अंतर कापायला त्या दिवशी तब्बल चार तास लागले. शेवटी एकदाचे ते राजमहालातील रामला दिल्या गेलेल्या भागात पोहोचले.
अशक्त दिसणारे राजा दशरथ आपल्या फिरत्या सिंहासनावर बसले होते. त्यांच्या शेजारी महाराणी कौसल्या उभ्या होत्या. ते दोघेही आपल्या मुलांची वाट पाहात होते. नव्या वंधूच्या स्वागताची योग्य तयारी केली गेली होती. ज्येष्ठ महाराणींना आपल्या परंपरांचा आणि धार्मिक विधींचा खूप अभिमान होता.
कौसल्यांनी पाठविलेल्या स्वागत समारंभाच्या आमंत्रणाला उत्तर देण्याची कृपासुद्धा राणी कैकयींनी केली नव्हती. काशीच्या शांतीप्रिय राणी सुमित्रा मात्र आल्या होत्या. त्या राजा दशरथांच्या डाव्या बाजूला उभ्या होत्या. कौसल्या आधारासाठी नेहमी त्यांच्यावर अवलंबून असायच्या. अर्थात, सुमित्रांनासुद्धा आपल्या सुनेचं स्वागत करायचं होतं म्हणा!
दोन्ही जोडपी जेव्हा राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचली तेव्हा मोठमोठ्या आवाजात शंखध्वनी होऊ लागले.
शेवटी गर्दीतून अयोध्येचे चार राजकुमार आणि मिथिलेच्या दोन राजकुमारी समोर आल्या. राजपुत्र आणि नवविवाहित दंपतींनी गर्दी मागे टाकून राजवाड्याच्या परिसरात प्रवेश केला तेव्हा तापलेल्या पत्र्याच्या छतावर अडकलेल्या मांजराला शेवटी सावलीत यायला मिळावं तद्वत घाबरलेल्या अयोध्येच्या राजवाड्यातील पहारेकऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.
राजघराण्यातील लोकांची मिरवणूक राजवाड्याच्या परिसरातील सुंदर सजवलेल्या संगमरवरी पायवाटेवरून निघाली. पायवाटेच्या दोन्ही बाजूंना हिरव्यागार बागा होत्या. राजवाड्यातील राजकुमार रामच्या जागेपाशी पोहोचताच मिरवणुकीचा वेग कमी झाला. महाराणी कौसल्यांवर नजर गेली तेव्हा सीताला त्यांना पाहून काहीतरी आठवल्यासारखं झालं. पण मनात आलेल्या त्या विचाराला तिने बाजूला सारलं.
हातात पूजेचं ताम्हण घेऊन राणी कौसल्यादेवी उंबऱ्याच्या दिशेने पुढे निघल्या. त्या ताम्हणात एक उजळलेला दिवा, अक्षता आणि सिंदूर होता. सात वेळा त्यांनी सीतेची आरती केली. सीतेच्या डोक्यावर, हवेत अक्षता उधळल्या. चिमूटभर सिंदूर घेऊन तो तिच्या भांगेत पेरला. आदरानं वाकून सीतेनं महाराणी कौसल्यांच्या पावलांना स्पर्श केला. आरतीचं ताम्हण एका सेविकेकडे सोपवून राणी कौसल्यांनी सीतेच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशिर्वाद दिला. ‘आयुष्मान भव, माझ्या बाळा.’
सीता उठून उभी राहिली. कौसल्या राजा दशरथांकडे संकेत करतात. ‘आपल्या सासऱ्यांचे आशिर्वाद घे पोरी.’ राणी सुमित्रांकडे बोट दाखवून त्या पुढे सांगतात, ‘आणि नंतर, छोट्या आईचा आशिर्वाद घे. त्यानंतर आपण इतर विधी पूर्ण करू.’
महारणी कौसल्यांच्या सूचनांचं पालन करण्यासाठी सीता पुढे होते. राम पुढे येऊन आपल्या आईच्या पावलांना स्पर्श करतो. त्या घाईघाईनं रामला आशिर्वाद देतात. रामलासुद्धा त्या वडिलांचे आशिर्वाद घेण्याविषयी सांगतात.
मग त्या उर्मिला आणि लक्ष्मणाला पुढे बोलावतात. महाराणी कौसल्यांना पाहून उर्मिलेच्या मनातही सीतेच्या मनात आलेला विचार येतो. पण ती सीतेसारखं त्या विचाराला बाजूला सारत नाही.
कौसल्यांना पाहून तिला आपल्या आईची – सुनयनांची आठवण येते. त्यांची आकृती अशीच छोटी होती, आणि डोळेसुद्धा असेच शांत आणि नरम होते. कौसल्यांची त्वचा सावळी होती आणि चेहऱ्यावरचे इतर अवयवही अर्थातच वेगळे होते. कुणीही त्या दोघींना नातलग म्हटलं नसतंच पण दोघींमध्ये काहीतरी साम्य होतं खास. अध्यात्माची आवड असणारे याला हृदयाचं नातं म्हणतील.
उर्मिला कौसल्याराणींची आरती संपण्याची वाट पाहिली. मग खाली वाकून तिने त्यांच्या पावलांना स्पर्श करून वंदन केलं. कौसल्यांनी मिथिलेच्या छोट्या राजकुमारीलासुद्धा आशिर्वाद दिला. उठून उभे राहाताना पुढे होऊन उर्मिलेनं आपसूक कौसल्यांना मिठी मारली. महाराणीं उर्मिलेच्या या अपरंपरागत वागण्यानं एवढ्या आश्चर्यचकित झाल्या की कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकल्या नाहीत.
उर्मिला जेव्हा मागे सरली तेव्हा तिचे डोळे पाणावले होते. सुनयना गेल्यानंतर एक शब्द ती डोळे पाणावल्याशिवाय ओठांवर आणूच शकत नव्हती, तो तिने आत्ता उच्चारला, ‘आई.’
गोड उर्मिलेच्या निरागसपणानं कौसल्यांच्या हृदयाला हात घातला. कदाचित, पहिल्यांदाच महाराणींसमोर त्यांच्याहून छोट्या चणीची स्त्री उभी होती. त्यांनी उर्मिलेचा गोल, छोट्या मुलांसारखा चेहरा पाहिला. या चेहऱ्यावर दोन मोठे, निष्पाप डोळे होते. त्यांच्या मनात आसपासच्या मोठ्या, घाबरवणाऱ्या पक्षांपासून संरक्षणाची गरज असलेली एक चिमणी आली. कौतुकानं त्या हसल्या, त्यांनी उर्मिलेला पुन्हा आपल्या कुशीत घेतलं. म्हणाल्या, ‘माझ्या पोरी.... आपल्या घरी तुझं स्वागत असो.’
राजवाड्यातील महाराणी कौसल्यांची एक सेविका मान तुकवून, मंथरांच्या सूचनांची वाट पहात उभी होती.
ती मंथरांच्या घरातच चालणाऱ्या कार्यालयात आली होती. मंथरा अयोध्येतील खूप श्रीमंत उद्योजिका होत्या. त्या सप्त सिंधू प्रदेशातील सर्वात श्रीमंत व्यापारी आहेत अशी वदंता होती. राजा दशरथांपेक्षाही त्या श्रीमंत असल्याच्या अफवा होत्या. त्यांचा खाजगी आणि अत्यंत जवळचा नोकर द्रुह्यु या अफवा सत्य असल्याची शपथेवर ग्वाही देत असे. अफवेचा हा आधार मोठाच म्हणायला हवा.
‘बाई,’ सेविका कुजबुजत म्हणाली, ‘माझ्यासाठी काय हुकूम आहे?’
द्रुह्युने लागलीच संकेत देऊन तिला गप्प बसायला सांगितलं. ती पुन्हा गप्प झाली.
विनीत द्रुह्यू मंथरांशेजारी गप्प उभा होता.
पाठीवर कुबड असलेल्या मंथरा खास त्यांच्यासाठी बनविलेल्या खुर्चीत बसल्या होत्या. या खुर्चीमुळे त्यांच्या कुबड असलेल्या पाठीला मोठाच आधार मिळत असे. गरीब कुटुंबात मंथरांचा जन्म झाला होता. लहानपणी त्यांना देवी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या निस्तेज चेहऱ्यावर कायमस्वरूपी व्रण पडले होते. हे थोडं म्हणून की काय, वयाच्या अकराव्या वर्षी त्यांना पोलियो झाला. काळानुरूप त्याची इतर सगळी लक्षणं नष्ट झाली, पण उजव्या पायाला मारलेला लकवा मात्र थोड्याफार प्रमाणात उरला होता. त्यामुळे त्यांना किंचित लंगडत चालावं लागत असे. वीस वर्षांची असताना त्या एकदा मैत्रिणीच्या घरी गेल्या असता चालण्याच्या विचित्र ढबीमुळे गच्चीवरून खाली कोसळल्या होत्या. या अपघातामुळे त्यांच्या पाठीत विचित्र व्यंग निर्माण झालं होतं. त्यामुळे त्या वयात त्यांची अतिशय क्रूर थट्टा केली जात असे. आजही त्यांच्याकडे तिरस्कारानेच पाहिलं जाई. अर्थात्, सांपत्तिक स्थितीमुळे कुणीही ही गोष्ट त्यांना तोंडावर बोलून दाखवत नसे. पण लोक आपल्याबद्दल आपल्यामागे नेमकं काय बोलतात हे त्यांना ठाऊक होतं. आता केवळ त्यांच्या व्यंग असलेल्या शरीराबद्दलच लोक त्यांचा तिरस्कार करत नसत तर, त्या वैश्य जातीच्या आहेत म्हणून आणि अतिशय श्रीमंत उद्योजिका आहेत म्हणूनही लोक त्यांचा प्रचंड तिरस्कार करत असत.
राजमहालासारख्या आपल्या महालाच्या कक्षातील खिडकीतून मंथरांनी आपल्या मोठ्या बागेकडे पाहिलं.
सेविका अस्वस्थ होऊन चुळबुळत उभी होती. लवकरच राजमहालात ती आपल्या जागेवर नसल्याचे कुणा ना कुणाच्या लक्षात येईल. तिला लवकरच परतावं लागेल. तिने द्रुह्यूवर विनंती करणारी नजर टाकली पण त्यानं फक्त तिच्याकडे पाहिलं.
मंथरांशी एकनिष्ठ राहिल्यानं आपला काही फायदा होईल याबाबत हल्ली द्रुह्यू साशंक झाला होता. मंथरांच्या एकुलत्या मुलीवर बीभत्स सामूहिक बलात्कार झाला होता आणि नंतर बलात्काऱ्यांनी निर्घृण पद्धतीनं तिची हत्या केली होती. सर्व बलात्कारी पकडले गेले होते आणि न्यायालयानं त्यांना मृत्यूदंड ठोठावला होता. पण धेनुकाला, बलात्काऱ्यांमधील सर्वात अधिक क्रूर आणि त्यांचा म्होरक्याला कायद्यातील त्रुटीमुळे सोडून द्यावं लागलं होतं. तो वयानं सज्ञान नव्हता. अयोध्येतील कायदा व्यवस्थेनुसार सज्ञान नसलेल्या अपराध्याला मृत्यूदंड देता येत नसे. अयोध्येचा राजकुमार आणि नगर संरक्षण दल प्रमुखांनी काहीही झालं तरी कायद्याचं पालन करण्याचा आग्रह धरला. मंथरानं याचा सूड उगवण्याचं ठरवलं. प्रचंड पैसा खर्चून तिने धेनुकाला तुरुंगातून पळवलं आणि मग त्याला सावकाश, क्रूर, यातनादायक मृत्यू देवविला. तरीही त्यांच्या मनातली सूडाची आग शांत झाली नव्हती. आता तिचं लक्ष्य होता राम. धीरानं, संयमानं त्या संधीची वाट पाहात होत्या. आणि ती संधी त्यांना मिळाली होती.
द्रुह्यूंनी थंड, भावहीन चेहऱ्यानं आपल्या मालकिणीकडे टक लावून पाहिलं.
हे म्हातारं वटवाघुळ आपल्या सूडाच्या कामगिरीवर खूप संपत्ती उधळतंय. त्यामुळे उद्योगाचं नुकसान होतंय. आपला उद्योग यानं पूर्णपणे गमावलाय. पण या सगळ्यात मी काय करू शकतो? बाप्पानं काय ठरवलंय हे कुणाला कसं कळणार? सध्या तरी मी यांच्याबरोबर अडकलोय...
मंथरांनी निर्णय घेतला. त्यांनी द्रुह्युकडे पाहून मान हालवली.
द्रुह्यूला पुन्हा धक्का बसला. पण त्यानं स्वतःला सावरलं.
एक हजार सुवर्णमुद्रा! या क्ष्रुद्र सेविकेला राजमहालात दहा वर्षे काम करूनही एवढी रक्कम मिळणार नाही!
पण हे बोलून काही उपयोग होणार नाही हे त्याला ठाऊक होतं. त्यानं लगेच एक रोख रक्कम देणारी हुंडी तयार केली. सेविका ती हुंडी कुठेही वठवू शकली असती. मंथरांची मुद्रा असलेली हुंडी वठवायला कोण नकार देईल?
‘देवी...’
मंथरांनी पुढे झुकून कंबरेला लटकवलेल्या चंचीतून आपली मुद्रा काढली. आणि हुंडीवर मुद्रा उमटवली.
द्रुह्युनं ती हुंडी मग त्या सेविकेला दिली. तिच्या चेहऱ्यावर तिला झालेला हर्ष स्पष्ट प्रतिबिंबित झाला.
द्रुह्युनं तिला लगेच जमिनीवर आणलं. आपली थंड नजर तिच्यावर रोखून तो कुजबुजला, ‘लक्षात ठेव, माहिती वेळेवर मिळाली नाही किंवा चुकीची माहिती दिलीस तर... तू कुठे रहातेस ते आम्हाला ठाऊक आहे...’
‘चूक होणार नाही, स्वामी,’ सेविका म्हणाली.
सेविका जाण्यासाठी वळली, मंथरा म्हणाल्या, ‘राम लवकरच राजमहलातील महाराणी कौसल्यांच्या भागात सम्राट दशरथांची बेट घेण्यासाठी येणार आहे असं मला कळलंय.’
‘तेथे काय बोलणं होईल ते सगळं मी आपल्यापर्यंत पोहोचवेन, देवी,’ सेविकेनं कमरेत, जरा जास्तच झुकून, सांगितलं.
द्रुह्यूनं मंथरांकडे आणि नंतर महालातील सेविकेकडे पाहिलं. मनातल्या मनात त्यांनी एक निःश्वास सोडला. आणखी पैसे दिले जाणार हे त्याच्या लक्षात आलं.
‘ताई, इथे महालातील माझा भाग मिथिलेच्या संपूर्ण राजमहालापेक्षाही मोठा आहे,’ उर्मिला उत्साहानं म्हणाली.
उर्मिलेनं सेविकांना आपलं सामान आपल्या पतीच्या दालनात कुठे आणि कसं सजवायचं याच्या काळजीपूर्वक सूचना दिल्या. त्या आपल्या कामाला लागल्या तशी उर्मिला लगेच आपल्या मोठ्या बहिणीला भेटायला निघाली. लक्ष्मणाला आपल्या पत्नीला थांबण्याची विनंती करण्याची इच्छा झाली होती, पण तिला आपल्या बहिणीच्या सानिध्यात जास्त बरं वाटेल हा विचार मनात आला आणि त्यानं आपल्या इच्छेवर अंकुश ठेवला. त्याला वाटलं, काही दिवसांतच तिचं जीवन नाटकीयरीत्या बदलून गेलंय.
बहिणीचा हात हातात घेऊन तो थोपटत सीता हसली. राम आणि आपण थोड्याच दिवसांत राजमहाल सोडून निघणार असल्याचं आणि चौदा वर्षांनंतरच परतणार असल्याचं तिने अजून उर्मिलेला सांगितलं नव्हतं.
उर्मिलेला या मोठ्या, भव्य राजवाड्यात आपल्या प्रिय बहिणीशिवाय रहावं लागणार होतं.
आत्ताच तिला कशाला त्रास द्या? तिला आधी इथे नीट स्थिर होऊ दे.
‘लक्ष्मण काय म्हणतो?’ सीतेने विचारलं.
उर्मिला स्वप्नात असल्यासारखी हसली. म्हणाली, ‘तो अगदी सज्जन पुरुष आहे. मी काहीही मागितलं तरी तो नाही म्हणत नाही!’
सीता खळखळून हसली. मग आपल्या बहिणीला चिडवत म्हणाली, ‘त्याचीच तर तुला सध्या गरज आहे. खूप प्रेम करणाऱ्या पतीची. एखाद्या छोट्या राजकुमारीसारखे तुझे लाड करणाऱ्या पतीची!’
उर्मिलेनं उठून छोट्या राजकन्येसारखी गोल गिरकी घेतली. मग मान उंचावून नाटकी गंभीरपणानं म्हणाली, ‘आहेच मुळी, मी छोटी राजकन्या!’
मग दोघी बहिणी खळखळून हसल्या. सीतेनं उर्मिलेला मिठी मारली. म्हणाली, ‘तू आहेसच माझी छोटी राजकन्या. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.’
‘माझंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे, ताई,’ उर्मिला म्हणाली.
तेवढ्यात, द्वारपालानं खटका वाजवला आणि मोठ्या आवाजात वर्दी दिली, ‘सप्त सिंधू प्रदेशाच्या आणि अयोध्येच्या महाराणी, वारस राजपुत्राच्या माता, महाराणी कौसल्या येत आहेत. आदर आणि प्रेमार्थ सगळ्यांनी उठून उभं रहावं.’
सीतेनं उर्मिलेकडे आश्चर्यानं पाहिलं. मग दोघी बहिणी लगेच उठून उभ्या राहिल्या.
महाराणी कौसल्या लगबगीनं आत शिरल्या. त्यांच्या मागोमाग दोन सेविका हातात दोन मोठे सोनेरी रंगाचे वाडगे घेऊन आल्या. वाडग्यांवर रेशमी कापडाचं आवरण होतं.
सीतेकडे पाहून कौसल्या मंद हसल्या. त्यांनी विचारलं, ‘कशी आहेस पोरी?’
‘मी उत्तम आहे, मोठी आई,’ सीता म्हणाली.
दोघी बहिणींनी वाकून कौसल्यांना नमस्कार केला. अयोध्येच्या महाराणींनी दोघींना दीर्घायुष्याचा आशिर्वाद दिला.
मग कौसल्या उर्मिलेकडे वळल्या. त्यांच्या चेहऱ्यावर ममतेचं हसू होतं. सीतेच्या लक्षात आलं, तिला मिळालेल्या स्मितापेक्षा त्यांचं आत्ताचं स्मित अधिक गोड होतं. यावेळी त्यांच्या स्मितात आईच्या प्रेमाची पखरण होती.
सीतेच्या ओठांवर हसू पसरलं. आनंदाचं. माझी छोटी बहीण इथे सुरक्षित आहे.
‘उर्मिला, माझ्या पोरी,’ कौसल्या म्हणाल्या, ‘मी तुझ्या दालनात गेले होते. तू इथे आहेस हे तिथेच मला समजलं.’
‘हो, आई.’
‘तुला काळी द्राक्षे आवडतात ना?’
आश्चर्यानं उर्मिलेनं डोळ्यांची उघडझाप केली. मग विचारलं, ‘हे तुम्हाला कसं समजलं, मां?’
कौसल्या हसल्या. डोळ्यात गुप्त बातमी मिळवल्याचा भाव आणत त्या म्हणाल्या, ‘मला सगळं समजतं!’
उर्मिला नाजुक हसली. महाराणींनी वाडग्यांवरचे रेशमी वस्त्राचे आवरण झटक्यात हटवलं. दोन वाडगे काळ्या टपोऱ्या द्राक्षांनी गच्च भरलेले होते.
उर्मिला आनंदाने चीत्कारली. तिने टाळ्या वाजविल्या. मग तिने तोंड उघडले. सीतेला आश्चर्य वाटलं. उर्मिला नेहमी आपल्या आईच्या-सुनयनांच्या हातून घास घेत असे. तिने कधीही आपल्या मोठ्या बहिणीला आपल्याला खाऊ घालण्याची विनंती केली नव्हती.
आनंदाने सीताचे डोळे पाणावले. तिच्या बहिणीला पुन्हा एकदा आई मिळाली होती.
कौसल्यांनी एक द्राक्ष उचलून ते उर्मिलेच्या उघड्या तोंडात भरवलं.
‘मम्’ खाता खाता उर्मिला म्हणाली, ‘खूप गोड आहे, आई!’
‘आणि द्राक्षे तब्बेतीलासुद्धा चांगली असतात!’ कौसल्या म्हणाल्या. मग त्यांनी आपल्या मोठ्या सुनेकडे पाहिलं. म्हणाल्या, ‘तूसुद्धा खाऊन घे, सीता.’
‘हो, खाते ना, मोठ्या आई,’ सीता म्हणाली, ‘धन्यवाद.’