प्रकरण 30
राम आणि सीताने अयोध्या सोडली त्यानंतरच्या पहिल्या सहामाहीत बऱ्याच घडामोडी घडल्या.
गोदावरी नदीच्या उगमाजवळच्या प्रदेशात तिच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या पंचवटी, म्हणजे पाच वडाच्या झाडां जवळच्या स्थानी 19 लोकांच्या या समूहानं तळ ठोकला होता. या छोट्‌या रानवट, साध्या पण आरामदायक जागेला एका बाजूने नदीने संरक्षण दिलेलं होतं. ही जागा हनुमानानं सुचविली होती. या शिबिरातील केंद्रस्थानी मातीने बनलेल्या मुख्य कुटीत दोन खोल्या होत्या. एक राम आणि सीतेसाठी आणि दुसरी लक्ष्मणासाठी. समोर मोकळी जागा होती. व्यायामासाठी किंवा भेटीगाठीसाठी त्या मोकळ्या जागेचा वापर केला जात असे.
या शिबीराच्या पूर्वेकडच्या भागात काही झोपड्‌या जटायू आणि त्यांच्या सैनिकांसाठी बनविलेल्या होत्या.
या वस्तीच्या परिघावर दोन गोलाकार कुंपणं होती. त्यापैकी बाहेरील बाजूचं कुंपण विषारी वेलींनी बनलेलं होतं. आतील कुंपण नागवल्ली वेलींचं होतं आणि या कुंपणाला एक संकट सूचक प्रणाली जोडलेली होती. दोरखंडाच्या रूपात असलेल्या या प्रणालीची व्याप्ती पूर्ण कुंपणभर होती आणि शेवटी एका लाकडी पिंजऱ्याच्या दाराला ती जोडलेली होती. या पिंजऱ्यात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. हर प्रकारे त्यांची बडदास्त ठेवली जात असे. दर महिन्याला नवे पक्षी पकडले जात. त्यांना पिंजऱ्यात ठेवून जुन्या पक्षांना मुक्त केलं जाई. कुणी बाहेरचं कुंपण ओलांडून अनाहूतपणे आतलं कुंपण ओलांडायचा प्रयत्न केला तर कुंपणात लागलेल्या संकटसूचक प्रणालीमुळे पक्षांच्या पिंजऱ्याचं छप्पर उघडलं जाई. पंख फडफडवत, कलकलाट करत उडून जाणाऱ्या पक्षांमुळे शिबिरात रहाणाऱ्यांना काही मिनिटांआधी आगंतुकाची सूचना मिळत असे.
या सहा वर्षांत त्यांना कित्येक संकटांना सामोरं जावं लागलं होतं. पण ही संकटं मानवांमुळे आलेली नव्हती. त्यांच्या शरीरावरील तुरळक खुणा त्यांना जंगलातील त्यांच्या साहसकथांची आठवण करून देत असत. सोमरसामुळे त्यांना ज्या दिवशी त्यांनी अयोध्या सोडली होती त्या दिवसासारखंच तरुण आणि सळसळत्या रक्ताचं ठेवलं होतं. उन्हामुळे त्यांच्या त्वचा सावळ्या पडल्या होत्या. राम आधीपासूनच सावळ्या रंगाचा होता पण गोरा रंग असलेल्या लक्ष्मण आणि सीताची त्वचासुद्धा सावळी झाली होती. राम आणि लक्ष्मणानं दाढी-मिशा वाढवल्या होत्या. त्यामुळे ते युद्धरत साधूंसारखे दिसत होते.
आता त्यांच्या जीवनाला एक निश्चित पद्धत लाभली होती. ही पद्धत अतिशय साधी आणि पटकन् लक्षात येण्याजोगती होती. आंघोळ करण्यासाठी आणि काही निवांत क्षण सोबत घालविण्यासाठी राम आणि सीताला पहाटे पहाटे उठून नदीवर जायला आवडत असे. ती त्यांची दिवसभरातील आवडती वेळ होती.
आजचा दिवससुद्धा असाच एक दिवस होता. त्यांनी आपले केस आदल्या दिवशीच धुतले होते. त्यामुळे आज परत डोकं धुण्याची गरज नव्हती. आंघोळ करताना त्यांनी आपल्या केसांचा डोक्यावर अंबाडा बांधून ठेवला होता. गोदावरीच्या स्वच्छ पाण्यात आंघोळ केल्यानंतर ते नदीकिनारी बसले होते. ताजी बोरं आणि फळांचं भोजन चाखत त्यांच्या गप्पा चालल्या होत्या.
राम सीतेच्या मांडीवर डोकं टेकून झोपला होता. ती त्याच्या केसांशी खेळत होती. तिची बोटं एका गुंतलेल्या बटीत अडकली. तिने गुंता सोडविण्याचा प्रयत्न केला. रामनं हळू कुरकुर केली. पण गुंता लगेच सुटला. सीतेला बट जास्त खेचावी लागली नाही.
सीता हसत म्हणाली, ‘पाहा, मी अगदी हलक्य हातानं गुंता सोडवू शकते.’
रामने हसत टोमणा दिला, ‘हो, पण कधीकधी...’
रामने सीतेच्या केसांत आपला हात फिरवला. सीतेचे मोकळे केस तिच्या पाठीवरून तिच्या मांडीवर जिथे रामने डोकं टेकलं होतं तिथपर्यंत पसरलेले होते. राम म्हणाला, “तुझ्या एकाच तऱ्हेच्या केशरचनेचा मला कंटाळा आला.’
खांदे उडवत सीता म्हणाली,.’तू दुसऱ्या प्रकारची केशरचना करायला हवीस मग. केस मोकळे आहेत आत्ता...’
‘हो, करेन ना मी,’ राम म्हणाला. रामने मग सीतेचा हात हातात घेतला आणि दूर वाहाणाऱ्या नदीकडे पाहात तो म्हणाला,.’पण आत्ता नको. उठल्यानंतर बांधेन.’
सीता हसली. रामच्या केसात बोटं फिरवत राहिली..’राम...’
‘हं...’
‘मला तुला काहीतरी सांगायचंय.’
‘काय?’
‘आपल्या कालच्या संभाषणाबद्दल.’
राम सीतेकडे वळला. म्हणाला, ‘तू कधी हा विषय काढतेस याचाच मी विचार करत होतो.’
आदल्या दिवशी सीता आणि राममध्ये बऱ्याच विषयांवर बोलणं झालं होतं. त्यापैकी सगळ्यात महत्वाचा विषय होता गुरू वशिष्ठांचा - रामच पुढील विष्णू बनेल - हा विश्वास. रामने मग सीतेला तिचे गुरू कोण हे विचारलं होतं. पण सीतेनं उत्तर देणं टाळलं होतं.
‘वैवाहिक नात्यात कोणतीही गुपितं नसावीत. माझे गुरू कोण आहेत, किंवा होते, ते मी तुला सांगायला हवं.’
रामनं सीतेच्या डोळ्याला डोळा देत म्हटलं,.’गुरू विश्वामित्र.’
सीतेला धक्काच बसला. तिच्या डोळ्यांतून तिची भावना व्यक्त झाली. रामनं अगदी बरोबर अंदाज बांधला होता.
राम हसला. म्हणाला,.’मी आंधळा नाहीय, समजलं? त्या दिवशी मिथिलेत तू ज्या प्रकारे आणि जसं गुरू विश्वामित्रांना बोललीस तसं केवळ एक आवडता विद्यार्थीच आपल्या गुरूला बोलू शकतो.’
‘मग याआधी तू त्याबद्दल काही का बोलला नाहीस?’
‘मी वाट पाहात होतो. ही गोष्ट तू स्वत: मला सांगण्याएवढा तुला माझा भंरवसा वाटण्याची.’
‘माझा आधीपासूनच तुझ्यावर भरंवसा आहे राम.’
‘हो. पण फक्त पत्नी म्हणून. काही गुपितं वैवाहिक नात्यांहूनही मोठी असतात. मलयपुत्र कोण आहेत हे मला ठाऊक आहे. गुरू विश्वामित्रांची लाडकी शिष्या असणं म्हणजे काय ते मी समजू शकतो.’
सीतेनं सुस्कारा सोडला. म्हणाली, ‘खरंच, अगदी बालिश आहे मी. हे सांगण्यासाठी एवढा काळ घालवला. विनाकरण जर बोलणं टाळलं तर साध्यासाध्या गोष्टी बोलणंही नंतर उगाच अवघड होऊन बसतं. मी खरं तर त्यांचं ऐकायला नको होतं....’
‘झालं गेलं गंगेला मिळालं.’ बोलता बोलता राम उठून बसला आणि सीतेच्या जवळ सरकला. त्यानं तिचे हात हातात घेत म्हटलं, ‘आता, सांग मला.’
सीतेनं खोल श्वास घेतला. तिला उगाच थोडं घाबरल्यासारखं वाटत होतं. ती म्हणाली, ‘मलयपुत्रांचा विश्वास आहे की, मी त्यांची विष्णू आहे.’
सीतेच्या डोळ्यात पाहात राम हसला. त्याच्या नजरेतून तिच्याबद्दलचा आदर व्यक्त होत होता. तो म्हणाला, ‘मी तुला बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. तुझ्या कित्येक कल्पना मी ऐकलेल्या आहेत. तू खूप चांगली विष्णू बनशील. तुझं अनुगमन करायचा अभिमान वाटेल मला.’
‘अनुगमन करू नकोस, सहभागिता कर.’
रामच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली.
‘एका वेळी दोन विष्णू का बरं असू शकत नाहीत? आपण जर मिळून काम केलं तर मलयपुत्र आणि वायुपुत्रांमधली ही मूर्ख तेढ कायमची सुटेल. आपण सगळे मिळून काम करू आणि भारताला नव्या मार्गावर नेऊ.’
‘याला संमती मिळेल असं मला वाटत नाही, सीता. कायद्याचं उल्लंघन करून विष्णू आपल्या कारकिर्दीची सुरवात करू शकत नाही. मी तुझं अनुगमन करेन.’
‘एकच विष्णू असावा असा कोणताही नियम नाहीय. विश्वास ठेव माझ्यावर.’
‘बरं. मानलं की असा कोणताही कायदा नाही. तू आणि मी एकत्र काम करू शकू. अगदी मलयपुत्र आणि वायुपुत्रसुद्धा एकत्र काम करायला शिकतील. पण गुरू वशिष्ठ आणि गुरू विश्वमित्रांचं काय? त्यांच्यात तरी अगदी हाडवैर आहे. आणि मलयपुत्रांकडून अजून माझ्या क्षमता ओळखल्या जाणं शिल्लक आहे. आपले गुरू असे असल्यानं...’
‘आपण ते सांभाळून घेऊ,’ रामजवळ सरकून त्याला मिठी मारत सीता म्हणाली, ‘हे तुला सांगायला मी फार वेळ घेतला याचं वाईट वाटतंय मला.’
‘तू काल माझे केस बांधताना मला हे सांगशील असं मला वाटलं होतं. म्हणूनच मी तुझ्या गालांवरून हात फिरवत वाट पाहात राहिलो. पण तुझी अजून तयारी झाली नव्हती कदाचित....’
‘तुला ठाऊक आहे का, गुरु वशिष्ठ असं मानतात की....’
‘सीता, गुरू वशिष्ठ गुरू विश्वामित्रांसारखेच आहेत. ते खूप बुद्धीमान आहेत. पण शेवटी ते माणूसच आहेत. कधी कधी परिस्थितीचा अंदाज बांधण्यात त्यांच्याकडून चूक होते. मी कायद्याचा भक्त असेन, पण मी मूर्ख नाही.’
सीता हसली. ‘आधी मी तुझ्यावर विश्वास ठेवायला कचरले याचं मला वाईट वाटतं.’
राम हसला. म्हणाला, ‘हो, तुला वाईट वाटायलाच हवं. आणि लक्षात ठेव, आपलं लग्न झालंय. या गोष्टीचा मी भविष्यात कधीही तुझ्याविरुद्ध वापर करू शकेन.’
सीता खदखदून हसली. हसता हसता तिने रामच्या खांद्यावर चापट्‌या मारल्या. रामनं तिचे हात धरले. तिला जवळ ओढलं आणि तिचं चुंबन घेतलं. दोघेही एकमेकांच्या मिठीत, मैत्रीतील मौनात हरवले. गोदावरीकडे पाहात राहिले.
‘आता आपण काय करायचं?’ सीतेनं विचारलं.
‘आपला वनवास संपेपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. आपण फक्त काय करायचं त्याची तयारी करू शकतो...’
‘गुरू वशिष्ठांनी मला स्वीकारलंय. तेव्हा, आपल्या सहभागितेबद्दल त्यांना कोणताही आक्षेप असेल असं मला वाटत नाही.’
‘पण गुरू विश्वामित्र... ते माझा स्वीकार करणार नाहीत.’
‘मिथिलेत त्यांनी जे केलं त्याबद्दल तू त्यांच्याबद्दल मनात गैर काही बाळगू नकोस.’
‘ते आपल्या विष्णूला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या जीवनभराची ती कमाई होती. ते आपल्या मातृभूमीच्या कल्याणासाठी प्रयत्न करत होते. दैवी अस्त्राबद्दल त्यांचा जो चढेल रोख होता त्याबद्दल मी त्यांना माफ करेन असं मी म्हणणार नाही. पण त्यांची भावना नेमकी काय होती ते मी समजू शकतो.’
‘मग, सध्या आपण मलयपुत्रांना आपण जे ठरवलंय त्याबद्दल सांगायचं नाही का?’
‘नाही. खरं तर, सध्या आपण वायुपुत्रांना तरी हे सांगावं की नाही याबद्दल माझा निश्चय होत नाहीय... आपण थोडे दिवस थांबू.’
‘एक वायुपुत्र आहे, ज्याला आपण हे सांगू शकतो.’
तू कुणा वायुपुत्राला कशी काय ओळखतेस? सगळ्यांकडून मला विष्णूच्या रूपात स्वीकारलं जाईपर्यंत गुरू वशिष्ठांनी माझी कोणत्याही वायूपुत्राशी, मी बऱ्याचदा विनंती केली तरीही, ओळख करून दिली नव्हती. त्यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असं त्यांचं म्हणणं होतं.’
‘माझीसुद्धा त्याच्याशी गुरू वशिष्ठांनी ओळख करून दिलेली नाहीय! केवळ भाग्यानंच, गुरुकुलातील माझ्या एका मैत्रिणीकरवी माझी त्याच्याशी ओळख झाली. तो आपल्याला सल्ला आणि मदत देऊ शकेल.’
‘कोण आहे तो?’
‘तो राधिकाचा चुलत भाऊ आहे.’
‘राधिका! भरतची राधिका?’
सीताच्या चेहऱ्यावर दु:खाचं स्मित आलं, ‘हो...’
‘तुला ठाऊक आहे ना, भरत अजून तिच्यावर प्रेम करतो.’
‘ऐकलंय मी... पण...’
‘हो, त्यांच्या जमातीचा कायदा.... मी भरतला सांगितलं, नको लागूस तिच्या मागे...’
भरतला नाकारण्याची राधिकाची कारणं वेगळी होती हे सीताला ठाऊक होतं. पण हे रामला सांगण्यात कोणतंही औचित्य नव्हतं. ते सगळं आता इतिहासात जमा होतं.
‘तिच्या या भावाचं नाव काय आहे? वायुपुत्राचं?’
‘हनुदादा.’
‘हनुदादा’
‘हो, मी त्याला याच नावानं बोलावते. जग त्याला देव हनुमान म्हणून ओळखतं.’
हनुमानानं हसून, हात जोडून, मान लववून नमस्कार केला. म्हणाला, ‘मी विष्णूला वंदन करतो, देवी सीता. मी विष्णूला वंदन करतो, देव राम.’
राम आणि सीता दोघांनी अवघडून एकमेकांकडे पाहिलं.
सीता आणि रामनं लक्ष्मण आणि मलयपुत्रांना सांगितलं होतं की ते शिकार करायला जात आहेत. पण खरं तर ते अर्ध्या दिवसाच्या अंतरावरील जंगलातील एका उघड्‌या जागी पोहोचले होते. गोदावरीच्या पात्रातून ते प्रवाहाच्या दिशेने निघाले होते. हनुमान तेथे त्यांची वाट पाहात होता. सीताने रामचा परिचय हनुमानाशी करून दिला आणि त्याला आपल्या निर्णयाबद्दलसुद्धा सांगितलं. हनुमानानं अगदी सहज त्यांचा निर्णय स्वीकारला.
‘पण गुरू विश्वामित्र आणि गुरू वशिष्ठ हा निर्णय स्वीकारतील असं तुला वाटतं का?’ सीताने हनुमानाला विचारलं.
‘मला ठाऊक नाही,’ हनुमान म्हणाला. मग रामकडे पाहात तो पुढे म्हणाला, ‘तू विष्णू व्हावंस अशी त्यांची इच्छा आहे हे गुरू वशिष्ठांनी तुला सांगितलं म्हणून गुरू विश्वामित्र खूप रागावले होते.’
राम गप्प राहिला.
हनुमान पुढे म्हणाला, ‘तुझा भाऊ लक्ष्मण हा खूप शूर आणि निष्ठावान आहे. तो तुझ्यासाठी आपले प्राणही देईल. पण कधी कधी तो सांगणं अपेक्षित नसलेल्या गुप्त गोष्टीही बोलून जातो.’
राम ओशाळवाणं हसला. म्हणाला, ‘हो, तो अरिष्टानेमींसमोर म्हणाला. लक्ष्मणाला कुणाला दुखवायचं नसतं. तो फक्त...’
‘बरोबर आहे,’ हनुमान म्हणाला, ‘त्याला तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे. त्याचं तुझ्यावर खूप प्रेमही आहे. पण त्या प्रेमामुळेच तो कधीकधी चुका करतो. कृपा करून गैरसमज करून घेऊ नकोस. पण तुम्हा दोघांमध्ये हे जे काही ठरलंय त्याबद्दल, किंवा माझ्याबद्दलसुद्धा आत्ताच त्याला काही सांगू नका असं मी सुचवेन.’
रामनं होकारार्थी मान हालवली.
‘गुरू वशिष्ठ आणि गुरू विश्वामित्रांमधील शत्रुत्वाचं कारण काय आहे?’ सीतेनं विचारलं, ‘मी कधीच ते शोधून काढू शकले नाही.’
‘हो,’ राम म्हणाले, ‘गुरू वशिष्ठसुद्धा याबद्दल काही बोलत नाहीत.’
‘मलासुद्धा नक्की काही माहीत नाही,’ हनुमान म्हणाला, ‘पण मी असं ऐकलंय की, नंदिनी नावाच्या एका स्त्रीमुळे हे घडलंय.’
‘खरंच?’ सीता म्हणाली, ‘त्याच्यामधील वैमनस्याचं कारण एक स्त्री आहे? हे अगदी पठडीतल्यासारखं वाटतंय.’
हनुमान हसत म्हणाला, ‘खरं तर इतरही काही समस्या होत्या असं म्हणतात. पण खात्रीपूर्वक कुणीही काही सांगत नाही. हे सगळे फक्त अंदाजच आहेत.’
‘महत्वाचं काय? तर, या विषयावर मलयपुत्र आणि वायुपुत्र एकत्र येतील असं खरंच तुम्हाला वाटतं का?’ रामने विचारलं. ‘आम्ही दोघांनीही विष्णू बनावं याला ते संमती देतील का? याविरुद्ध कोणताही कायदा नाही असं सीताने मला सांगितलं आहे. पण हे नक्कीच विष्णू आणि महादेवांच्या मानक नियमावलीविरुद्ध असावं, हो ना?’
हनुमान हलकेच हसला. म्हणाला, ‘राजपुत्र राम, विष्णू आणि महादेव या संस्था किती काळापासून चालत आलेल्या आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का?’
रामने खांदे उडवले. म्हणाला, ‘मला ठाऊक नाही. हजारो वर्षे? त्याहून आधीपासून नसलं तरी, मनुदेवांच्या काळापासून असेल कदाचित.’
‘आणि गेल्या अनेक सहस्त्रकांत एकूण किती विष्णू आणि किती महादेव पूर्वीच्या विष्णू आणि महादेवांच्या वंशजांनी घालून दिलेल्या नियमावलीनुसार झाले असावेत असं तुला वाटतं?’
रामनं सीतेकडे पाहिलं. मग पुन्हा हनुमानाकडे पाहात तो म्हणाला, ‘मला ठाऊक नाही.’
हनुमानाचे डोळे चकाकले. तो म्हणाला, ‘शून्य वेळा.’
‘खरं?’
‘एकदाही, एकदासुद्धा विष्णू किंवा महादेव ठरलेल्या योजनेनुसार बनले नाहीत. अतिशय काटेकोरपणे बनविलेल्या उत्तम योजना बहुधा बिघडतात. नेहमीच आश्चर्य वाटावं असं काहीतरी घडत असतं.’
राम मंद हसला. म्हणाला, ‘आपल्या देशाला व्यवस्था आणि योजनांचं वावडं आहे.’
‘हो, आहे असं खर!’ हनुमान म्हणाला, ‘योजना तंतोतंत लागू केल्या म्हणून महादेवांना आणि विष्णूंना त्यांच्या कार्यात यश मिळालं असं नाही, तर, आपल्या या भूमीसाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं म्हणून त्यांना यश मिळालं. आणि, त्यांच्यासारखाच विचार करणाऱ्या कित्येकांनी त्यांचं अनुकरण केलं. हेच तर त्यांचं रहस्य आहे. यशस्वी होण्यासाठी केवळ योजना नव्हे तर, मनापासून आवड आणि तीव्र इच्छा असायला हवी.’
‘म्हणजे, तुला असं वाटतं का, की, मलयपुत्रांचं आणि वायुपुत्रांचं मन वळविण्यात आपल्याला यश मिळेल?’
‘अर्थातच मिळेल,’ हनुमान म्हणाला, ‘त्यांना भारत आवडत नाही का? पण जर तुम्ही मला विचारलंत की आम्ही नेमके कसे यशस्वी होऊ, तर, माझं उत्तर - मला माहीत नाही - असं असेल. कारण आपल्याकडे अजून कोणतीही योजना नाहीय! पण आपल्याकडे वेळ आहे. तुम्ही दोघे सप्त सिंधू प्रदेशात परतेपर्यंत आपण काहीही करू शकत नाही.’
वनवासाचा 13 वर्षांहून अधिक काळ उलटला होता. साधारण वर्षभरात राम, लक्ष्मण आणि सीतेला सप्त सिंधू प्रदेशात परतायचं होतं. त्यानंतर ते आपल्या आयुष्यातील महान कार्याची सुरवात करणार होते. दरम्यानच्या काळात वायूपुत्रांकरवी सीतेचा स्वीकार करवण्यात हनुमानाला यश मिळालं होतं. आणि काही मलयपुत्रांसह अरिष्टानेमींनी रामला स्वीकारायला सुरवात केली होती. राम आणि सीता यांनी एकत्र विष्णू बनावं या कल्पनेला गुरू वशिष्ठांचा कोणताही आक्षेप नव्हता. पण विश्वामित्र... त्यांची गोष्टच वेगळी होती. त्यांनी जर विरोध केला, तर मलयपुत्रांपैकी कोणीही बरोबर आलं नसतं. कारण त्यांची संस्था अतिशय शिस्तप्रिय होती आणि ते केवळ आपल्या नेत्याच्या अनुकरणानुसारच चालत असत.
अर्थात, सध्या राम आणि सीता यांचं मन या गोष्टीनं व्यापलेलं नव्हतं. शिबिरातील आपल्या भागात ते अस्ताला जाणाऱ्या सूर्यानं पश्चिमेला उधळलेल्या सुंदर रंगांच्या मनोहारी छटा निरखण्यात गुंगले होते. अचानक, संकट-सूचक प्रणालीला जोडलेल्या पक्षांच्या पिंजऱ्यातील पक्षी मोठ्‌या आवाजात पंख फडफडवू लागले होते. लक्ष्मण गर्रकन वळला तेव्हा त्याने पाहिलं की राम आणि सीता सुद्धा उठून उभे राहिले आहेत.
‘हा कसला आवाज?’ लक्ष्मणानं विचारलं.
रामच्या उपजतबुद्धीने त्याला सांगितलं की, आत येणारे प्राणी नव्हते, माणसं होती.
‘शस्त्रं,’ रामने शांतपणे आज्ञा दिली.
सीता आणि लक्ष्मणानं तलवारींसह आपल्या म्यानी कंबरेभोवती बांधल्या लक्ष्मणाने आपलं धनुष्य उचलण्याआधी रामला त्याचं धनुष्य दिलं. दोघाही भावांनी आपापली धनुष्ये खांद्यावर अडकवली. तेवढ्‌यात जटायू आणि त्याचे सैनिक घाईघाईने आत आले. ते शस्त्रास्त्रांनी सज्ज होते. राम आणि लक्ष्मणांनी बाणांनी भरलेले भाते पाठीवर अडकवले. सीतेने एक लांब भाला उचलला. रामने तलवारीसह म्यान कंबरेला बांधली. सुरीची म्यान आधीच त्यांच्या पाठीवर आडवी बांधलेली होती. हे शस्त्र ते चोवीस तास जवळ बाळगत असत.
‘कोण असतील ते?’ जटायूंनी विचारलं.
‘मला माहीत नाही,’ राम म्हणाला.
‘लक्ष्मणाची भिंत?’ सीताने विचारलं.
मुख्य झोपडीच्या पूर्वेला लक्ष्मणाने आपल्या कल्पकबुद्धीने उभारलेली ‘लक्ष्मण भिंत’ ही एक संरक्षण व्यवस्था होती. एका छोट्‌या चौकोनी जागेला तीन बाजूंनी घेरून ही पाच फूट उंचीची भिंत उभी होती. याची मधली जागा झोपडीच्या दिशेने अर्धी उघडी होती. या इमारतीकडे पाहून एका नजरेत ते स्वयंपाकघर असल्याचा भास होत असे. पण खरं तर तो घनाकार रिकामा होता. त्यात योद्ध्यांच्या हालचालींना पुरेशी जागा होती. पण योद्ध्यांना गुडघ्यावर बसावं लागत असे. भिंतीच्या पलीकडे असलेल्या शत्रूच्या माणसांना आत असलेल्या व्यक्ती दिसत नसत. याच्या दक्षिणेकडील भिंतीतून एक छोटी भट्टी, स्वयंपाकाचा कट्टा बाहेर निघालेला होता. स्वयंपाकाच्या जागेसारखी ती जागा दिसावी यासाठी त्याच्या अर्ध्या भागावर छप्पर होतं. इथे आत बसलेल्यांना शत्रूच्या बाणांपासून संरक्षण मिळत असे.
तेथील दक्षिण, पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करून असलेल्या या भिंतींमध्ये काही अंतरांवर भोकं होती. ही भोकं आतल्या बाजूला छोटी आणि बाहेरच्या बाजूला मोठी होती. यामुळे स्वैपाकघरात हवा खेळती ठेवण्यासाठी बनविलेल्या खिडक्यांसारखी ती भोकं दिसायची. पण आत लपलेल्या लोकांना बाहेरून येणाऱ्या शत्रूचं निरीक्षण करण्याची संधी देणं आणि त्याच वेळी आत लपलेले लोक बाहेरच्यांना दिसू न देणं हा त्यांचा खरा उपयोग होता. या भोकांमधून बाणसुद्धा चालविता येत असत.
हे बांधकाम मातीचं होतं. त्यामुळे मोठ्‌या सैन्याकडून बराच वेळ मारा झाला तर ते टिकाव धरून राहू शकलं नसतं. पण, घातपातासाठी आणि जीवे मारण्यासाठी पाठविल्या गेलेल्या छोट्‌या टोळ्यांपासून बचावासाठी ही भिंत उत्तम संरक्षण देऊ शकत होती. लक्ष्मणाला वाटत होतं की त्यांच्यावर अशाच प्रकारचे हल्ले होण्याची शक्यता होती. या भिंतीची कल्पना लक्ष्मणाची होती आणि ती साकार करण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावला होता.
‘होय,’ राम म्हणाला.
सगळेजण त्या भिंतीकडे धावले. आत जाऊन सगळे गुडघ्यांवर बसले आणि हत्यारं परजून वाट पाहू लागले.
लक्ष्मणने दक्षिणेकडच्या भिंतीला असलेल्या भोकातून बाहेर पाहिलं. डोळे ताणून पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की दहा जणांची एक टोळी शिबीराच्या आवारात आली होती. एक माणूस आणि एक स्त्री त्यांचं नेतृत्व करत होते. नेतृत्व करणाऱ्या पुरुषाची उंची सामान्य होती. पण त्याचा रंग असामान्य गोरा होता. एखाद्या धावपटूसारखं त्याचं शरीर वेतासारखं सडपातळ होतं. हा माणूस योद्धा नव्हता. दुबळे खांदे आणि बारकेले हात असूनसुद्धा तो माणूस बरगड्यांमध्ये फोड आल्यासारखा खांदे फुलवून भरदार बाहू असल्याचं भासवत होता. बहुतेक भारतीय पुरुषांसारखे त्याचे केस लांब आणि काळेभोर होते. ते त्यानं डोक्यामागे गाठ बांधून ठेवले होते. त्याची दाढी लांब होती आणि व्यवस्थित कापलेली होती. विचित्र म्हणजे, ती तपकिरी रंगात रंगवलेली होती. त्यानं तपकिरी रंगाचं धोतर आणि उत्तरीय ल्यायलं होतं. धोतराच्या रंगाहून त्याच्या उत्तरीयाचा रंग थोडा फिका होता. त्याने घातलेले दागिने उच्च प्रतीचे असले तरी सौम्य पद्धतीने वापरले होते. मोत्याची कर्णभूषणे आणि हातात तांब्याचे बारीकसे कडे. आता तो थोडा अव्यवस्थित दिसत होता. बराच काळ प्रवास करून आल्यासारखा, प्रवासात कपडे न बदलल्यासारखा अस्ताव्यस्त दिसत होता.
त्याच्यासोबत येत असलेली स्त्री काही अंशी त्याच्यासारखीच दिसत असली तरी तिचं व्यक्तीमत्व अत्यंत मोहक होतं. ती बहुधा त्याची बहीण असावी. उंचीला ती जवळ जवळ उर्मिलेएवढी होती. ठेंगणी. तिची त्वचा बर्फासारखी पांढरी होती. म्हणून खरं तर तिने आजारी किंवा मलूल दिसायला हवं होतं. पण ती पटकन् लक्ष जाण्याएवढी आकर्षक आणि मोहक होती. तिच्या सरळ आणि टोकाला किंचित अपऱ्या नाकामुळे आणि उंच गालांमुळे ती परीहांसारखी दिसत होती. पण परीहांचे केस सोनेरी रंगाचे नसतात. हिच्या केसांवर सोनेरी रंगाची छटा होती. एरवी सोनेरी रंगाचे केस क्वचितच आढळतात. तिच्या केसांच्या बटा अतिशय व्यवस्थित, जागच्या जागी होत्या. तिचे डोळे चुंबकासारखे होते. बहुधा ती हिरण्यलोम म्लेच्छ असावी. गोरी त्वचा, घारे डोळे आणि सोनेरी केसांचे जे विदेशी वायव्येला अर्ध्या जगाच्या अंतरावर रहात असत त्यांचं हिंसक वागणं आणि न समजणाऱ्या त्यांच्या भाषेमुळे भारतीय लोक त्यांना जंगली लोक म्हणत असत. पण ही स्त्री जंगली नव्हती. उलट ती अतिशय मोहक, शिडशिडीत, लहानखोरी, नीटनेटकी होती. फक्त तिचे उरोज शरीराच्या मानाने प्रचंड मोठे होते. तिने अतिशय किंमती, रंगवलेलं अंजिरी-जांभळ्या रंगाचं अधोवस्त्र पेहेरलेलं होतं. ते शरयू नदीच्या पात्रासारखं चकाकत होतं. कदाचित पूर्वेकडून येणाऱ्यांचे प्रसिद्ध रेशमी वस्त्र असावं ते. केवळ श्रीमंतांनाच परवडणारं. अधोवस्त्र तिनं कमरेच्या बरंच खाली, अत्यंत आधुनिक पद्धतीनं बांधलेलं होतं. त्यामुळे तिचं सपाट पोट आणि सडपातळ, बाकदार कंबर दिसत होती. तिची चोळीसुद्धा रेशमी कापडाचीच शिवलेली होती. ती अतिशय तोकडी होती आणि त्यामुळे तिच्या उरोजांचा बराच भाग उघडा होता. तिचं उत्तरीय तिनं अंगाभोवती लपेटण्याऐवजी एका खांद्यावरून नुसतंच लटकवलं होतं. या अती श्रीमंतीचं प्रदर्शन करणाऱ्या वेषभूषेत अत्यंत किंमती अलंकारांनी भर टाकलेली होती. केवळ एकच गोष्ट विसंगत होती आणि ती म्हणजे तिच्या कंबरेला अडकवलेली म्यान. कुणीही पहात रहावं अशीच होती ती.
रामनं सीतेकडे पहात विचारलं, ‘कोण आहेत हे?’
सीतेनं खांदे उडवून आपल्याला माहीत नसल्याचं सांगितलं.
लगेच मलयपुत्रांनी माहिती पुरवली की, तो माणूस रावणाचा छोटा भाऊ विभीषण आहे आणि ती स्त्री त्याची सावत्र बहीण शूर्पणखा आहे.
विभीषणाशेजारी चालत असलेल्या सैनिकानं एक पांढरं निशाण उंच धरलं होतं. पांढरा रंग शांतीचा रंग होता. त्यांना मसलत करायची होती हे उघड होतं. पण त्यांना कशाबद्दल तहाच्या वाटाघाटी करायच्या होत्या हे खरं रहस्य होतं.
आणि याबद्दलही खात्री करून घ्यायला हवी होती की त्यांच्या या कृतीमागे कोणतीही क्लृप्ती दडलेली नाही.
रामने पुन्हा एकदा भोकातून पलीकडे पाहिलं. मग तो आपल्या लोकांच्या दिशेनं वळत म्हणाला, ‘आपण सगळे एकत्र बाहेर जाऊ. त्यामुळे मूर्खासारखं काही वागण्यापासून ते परावृत्त होतील.’
‘हेच शहाणपणाचं ठरेल,’ जटायू म्हणाले.
‘चला,’ राम म्हणाला. तो संरक्षक भिंतीआडून बाहेर आला. त्याने आपला उजवा हात उंच ठेवला होता. ‘आमच्याकडून काहीही धोका नाही,’ हे यातून सूचित होत होतं. इतर सगळ्यांनी रामचं अनुकरण केलं. सगळे रावणाच्या सावत्र भावंडांना भेटायला बाहेर पडले.
राम, लक्ष्मण, सीता आणि त्यांच्या सैनिकांवर नजर पडताच घाबरलेला विभीषण जागीच उभा राहिला. त्याने वळून आपल्या बहिणीकडे पाहिले. जणू पुढे काय करावं याबद्दल त्याचा निर्णय होत नव्हता. पण शूर्पणखेची नजर रामवर खिळली होती. निर्लज्जपणे ती त्याच्याकडे टक लावून पहात राहिली होती. जटायूला पाहिल्यावर क्षणभर विभीषणाच्या चेहऱ्यावर ओळख झळकली.
राम, लक्ष्मण आणि सीता पुढे निघाले. जटायू आणि त्यांचे सैनिक त्यांच्या मागे होते. हे जंगलात रहाणारे जेव्हा लंकावासियांच्या समोर पोहोचले तेव्हा विभीषणानं आपली पाठ ताठ केली, छाती फुलवली. आणि स्वत: अतिशय महत्वाची व्यक्ती असल्यासारखा तो बोलू लागला, ‘आम्ही शांतीसाठी आलो आहोत, अयोध्येच्या राजा!’
‘आम्हालासुद्धा शांतीच हवीय,’ राम म्हणाला. त्याने आपला उजवा हात खाली आणला. त्याच्यामागोमाग त्याच्या सगळ्या लोकांनी आपापले हात खाली आणले. ‘अयोध्येचा राजा’ या संबोधनावर रामनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. विचारलं, ‘आपल्या आगमनाचं कारण काय? लंकेच्या राजकुमारा?’
आपल्याला ओळखलं म्हणून विभीषण फुलारला. म्हणाला, ‘म्हणजे आम्हाला वाटतं तेवढे सप्तसिंधूचे लोक अज्ञानी नाहीत म्हणायचे.’
राम सुसंस्कृतपणे हसला. मध्यंतरी शूर्पणखाने एक छोटा जांभळा रुमाल काढून आपलं नाक नाजुकपणे झाकलं. लक्ष्मणाने तिची अत्याधुनिक पद्धतीनं रंगवलेली नखं पाहिली. प्रत्येक नखाच्या टोकाला सुपासारखा आकार दिलेला होता. त्यावरूनच कदाचित तिचं नाव ठेवलं गेलं असावं. सुपाला जुन्या संस्कृत भाषेत शूर्पा म्हणतात. ऊर्पासारख्या नखांची. शूर्पणखा.
‘खरं तर, सप्तसिंधूच्या लोकांच्या पद्धती मला समजतात आणि त्याबद्दल मला आदर वाटतो,’ विभीषण म्हणाला.
सीतेनं बाजासारख्या तीक्ष्ण नजरेनं शूर्पणखाकडे पाहिलं. कारण ती एकटक रामवर नजर खिळवून उभी होती. शूर्पणखेच्या जादुई नजरेचं मूळ तिच्या बुबुळाच्या आश्चर्यकारी रंगात दडलेलं होतं. तिचे डोळे चमकत्या निळ्या रंगाचे होते. नक्कीच तिच्या अंगात हिरण्यलोम म्लेच्छांच्या रक्ताचा अंश होता. खरं तर इजिप्तच्या पूर्वेकडील प्रदेशातील कुणाच्याच बुबुळांचा रंग निळा नसतो. आणि, तिने अत्तरात जणू आंघोळ केली होती. कारण त्या वासात पंचवटीच्या त्या रानवट शिबिराचा, प्राण्यांसारखा वास कुठेतरी हरवला होता. निदान तिच्या आसपास तरी केवळ तिने लावलेल्या अत्तराचाच वास दरवळत होता. अर्थात, तिच्यावर त्याचा काहीही परिणाम झालेला नव्हता हे उघड दिसत होतं. आसपासचा वास तिने नाकावर रुमाल ठेवून दूर राखला होता.
‘आपण आमच्या या छोट्‌या झोपडीत येणार का?’ रामनं झोपडीकडे बोट दाखवत विचारलं.
‘नको, धन्यवाद, महाराज,’ विभीषण म्हणाला, ‘आम्ही येथे ठीक आहोत.’
जटायूच्या उपस्थितीने तो गडबडला होता. वाटाघाटी पूर्ण होण्याआधी इतर कोणत्याही धक्क्याचा त्याला सामना करायचा नव्हता. विशेषत: झोपडीच्या बंदिस्त वातावरणात कोणतं आश्चर्य आपली वाट पहात असावं याचा त्याला अंदाज नसल्यानं त्यानं स्पष्ट नकार दिला होता. काही झालं तरी सप्त सिंधू नरेशाच्या शत्रू राजाचा तो भाऊ होता. सध्या आतल्याहून बाहेर, इथे मोकळ्यावर जास्त सुरक्षित आहे असं त्याच्या मनानं त्याला सांगितलं.
‘ठीक आहे तर मग,’ राम म्हणाला, ‘सोन्याच्या लंकेच्या राजकुमाराच्या या भेटीच्या सन्मानामागचा हेतु आम्ही काय बरे समजावा?’
यावेळी शूर्पणखा घोगऱ्या, मोहात पाडणाऱ्या आवाजात बोलली, ‘हे सुंदर पुरुषा, आम्ही तुमच्या आश्रयाला आलो आहोत.’
‘मला नीट कळलं नाही,’ राम म्हणाला. क्षणभर अपरिचित स्त्रीकडून आपल्या सौंदर्याची वाखाणणी ऐकून तो सुद्धा गोंधळून गेला होता. काय प्रतिक्रिया द्यावी हे त्याला कळलं नव्हतं. तो पुढे म्हणाला, ‘रावणाच्या नातेवाइकांना आम्ही काही मदत देऊ शकू असं मला वाटत नाही...’
‘आम्ही इतर कुणाकडे जावं, हे महान पुरुषा?’ विभीषणानं विचारलं. ‘रावणाची भावंडं असल्यामुळे सप्त सिंधूतील कुणीही आमचा स्वीकार करणार नाही. पण आम्हाला हे सुद्धा ठाऊक आहे की सप्त सिंधूमध्ये असे अनेक लोक आहेत जे तुझं सांगणं टाळू शकत नाहीत. रावणाचा क्रूर अत्याचार मी आणि माझ्या या बहिणीनं बराच काळ सहन केलाय. आम्हाला तेथून पळ काढायचाच होता.’
राम गप्प राहिला. तो विचार करत होता.
‘हे अयोध्येच्या राजा,’ विभीषण बोलू लागला, ‘मी लंकेचा असेन पण खरं सांगायचं तर मी तुमच्या सारखाच, तुमचाच आहे. तुमच्या जगण्याच्या पद्धतीचा मला आदर आहे. आणि मी तुमचं अनुकरण करतो. लंकेच्या इतर लोकांसारखा मी नाही. रावणाच्या प्रचंड संपत्तीची भूल पडते आणि ते त्याचा राक्षसी मार्ग स्वीकारतात. आणि शूर्पणखा माझ्यासारखीच आहे. आमच्या बाबतीत तरी आपलं काही कर्तव्य आहे असं आपणास वाटत नाही का?’
सीता मध्येच म्हणाली, ‘एका प्राचीन कवीनं एके ठिकाणी म्हटलंय - कुऱ्हाड जेव्हा जंगलात आली तेव्हा झाडांनी एकमेकांना सांगितलं, चिंता कऱण्याचं काही कारण नाही, कुऱ्हाडीचा दांडा आपल्यापैकीच एक आहे.’
शूर्पणखा लबाडीने पण मिश्किल स्वरात म्हणाली, ‘म्हणजे, महान रघू राजाचा वंशज आपले निर्णय आपल्या पत्नीला घेऊ देतो म्हणायचं का?’
विभीषणानं हलकेच शूर्पणखेच्या हाताला स्पर्श केला. आणि शूर्पणखा बोलायची थांबली. विभीषण म्हणाला, ‘राणी सीता, आपल्या लक्षात आलं असेल की इथे केवळ दांडेच आलेयत. कुऱ्हाडीचं पातं लंकेतच आहे. आम्ही खरोखर आपल्यासारखेच आहोत. कृपा करून आम्हाला मदत द्या.’
शूर्पणखा जटायूंकडे वळली. तोपावेतो तिच्या लक्षात आलं होतं की राम आणि लक्ष्मणाचा अपवाद वगळता तेथे उपस्थित सारेच पुरुष तिच्याकडे टकामका पाहात होते. ती म्हणाली, ‘हे महान मलयपुत्रा, आम्हाला शरण देणं हे तुमच्या फायद्याचं आहे असं आपणास वाटत नाही का? तुम्हाला लंकेबद्दल जेवढी माहिती आहे तीत आम्ही भर घालू. यात आपणास आणखी जास्त सोनं मिळेल.’
जटायू ताठरला. म्हणाला, ‘आम्ही प्रभु परशुरामांचे अनुयायी आहोत. आम्हाला सोन्यात अजिबात रस नाही.’
‘बरोबर...’ शूर्पणखा तिरस्कारानं म्हणाली.
विभीषणानं लक्ष्मणाला विनंती केली, ‘हे लक्ष्मणा, कृपया आपल्या भावाला समजावा. अयोध्येला परतल्यानंतर तुम्हालाही पटेल की रावणाशी एकदा का तुमचं युद्ध सुरू झालं की आम्ही तुम्हाला बरीच मदत करू शकतो.’
‘मी तुमच्याशी सहमत झालोसुद्धा असतो, लंकेच्या राजकुमारा,’ लक्ष्मण हसत म्हणाला, ‘पण आपण दोघेही चूक ठरण्याची शक्यता आहेच ना?’
विभीषणानं खाली मान घालून लांब सुस्कारा सोडला.
‘राजकुमार विभीषण,’ राम म्हणाला, ‘मला खरंच वाईट वाटतं, पण...’
विभीषणानं रामला मध्येच थांबवलं, ‘दशरथपुत्रा, मिथिलेची लढाई लक्षात ठेवा. माझा भाऊ रावण आपला शत्रू आहे. तो माझासुद्धा शत्रू आहे. म्हणून तुम्ही माझे मित्र व्हायला हवं, हो ना?’
राम गप्प राहिला.
विभीषणच पुढे म्हणाला, ‘हे महान राजा, लंकेहून सुटका करून घेऊन आम्ही आमचा जीव धोक्यात घातलाय. काही काळासाठी तरी निदान आपण आम्हाला आपले पाहुणे म्हणून ठेवून घेणार नाही का? काही दिवसांतच आम्ही येथून निघून जाऊ. तैत्तरीय उपनिषदात जे म्हटलंय ते लक्षात असू द्या. त्यात म्हटलंय – ‘अतिथी देवो भव’. कित्येक स्मृतींमध्येसुद्धा म्हटलंय की जे बलशाली आहेत त्यांनी दुर्बलांचं रक्षण करायला हवं. आम्हाला फक्त काही दिवस आश्रय देण्याचीच मागणी आम्ही करत आहोत. कृपा करून नकार देऊ नका.
सीतेने रामकडे पाहिलं. विभीषणानं कायद्याचा आधार घेत आवाहन केलं होतं. पुढे काय होणार हे तिला समजलं. राम आता त्यांना परत पाठवणार नाही.
‘फक्त काही दिवस,’ विभीषण आजीजीनं म्हणाला, ‘कृपा करा.’
रामने विभीषणाच्या खांद्याला स्पर्श केला. म्हणाला, ‘तुम्ही इथे काही दिवस राहू शकता. थोडी विश्रांती घ्या आणि पुन्हा आपल्या प्रवासाला निघा.’
विभीषणाने दोन्ही हात जोडून रामला नमस्कार केला. तो म्हणाला, ‘महान रघुवंशाची भरभराट होवो.’