प्रकरण 31
‘जेवणात मीठच नाही,’ शूर्पणखेनं तक्रार केली.
चौथ्या प्रहरातील तो पहिला तास होता आणि पंचवटीच्या शिबिरातील रहिवाश्यांनी आपापलं संध्याकाळचं जेवण घेतलं होतं. आज स्वयंपाक करण्याची पाळी सीतेची होती. राम, लक्ष्मण आणि शिबिरातील इतर लोक जेवणाचा आनंद घेत होते. पण शूर्पणखेला मात्र स्वयंपाकात चुकाच जास्त दिसत होत्या. स्वयंपाक अळणी झालाय ही तिच्या तक्रारींच्या यादीतली नवी तक्रार होती.
‘कारण पंचवटीत मीठ मिळत नाही, राजकुमारी,’ सीता म्हणाली. शांत रहाण्यासाठी तिला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होती. ‘इथे जे काही मिळतं तेवढ्‌यावरच आम्ही भागवतो. हा काही राजमहाल नव्हे. स्वयंपाक आवडला नसेल तर तुम्ही उपाशी राहू शकता.’
‘हा स्वयंपाक कुत्र्यांनी खायच्या लायकीचा आहे!’ शूर्पणखा तोंडातल्या तोंडात बडबडली आणि तिने हातात घेतलेला घास पुन्हा ताटात टाकला.
‘मग तर तो तुझ्यासाठीच आहे असं समज,’ लक्ष्मण म्हणाला.
विभीषणासह सगळेच हसू लागले. पण रामला ही गंमत वाटत नव्हती. त्यानं लक्ष्मणाकडे कठोर नजरेनं पाहिलं. लक्ष्मणानं रामकडे पाहिलं पण आपली भूमिका सोडली नाही. उपहासानं डोकं हालवत तो पुन्हा जेवू लागला.
शूर्पणखेनं आपलं ताट दूर लोटलं आणि ती रागाने तेथून निघून गेली.
‘शूर्पा...’ तक्रारीच्या स्वरात विभीषण म्हणाले. पण मग लगेच उठून ते सुद्धा तिच्या मागे धावले.
रामनं सीतेकडे पाहिलं. पण तिने खांदे उडवले आणि पुन्हा जेवायला सुरवात केली.
तासाभरानंतर सीता आणि राम दोघेच आपल्या झोपडीत होते.
लंकेतून आलेल्या पाहुण्यांपैकी शूर्पणखेव्यतिरिक्त इतर कुणीही त्रासदायक नव्हतं. पण, लक्ष्मण आणि जटायू अजूनही त्यांच्याबद्दल पूर्ण आश्वस्त नव्हते. पाहुण्यांना नि:शस्त्र करून त्यांनी त्यांची शस्त्रं शिबीराच्या शस्त्रागारात कड्‌या-कुलुपात ठेवली होती. त्यांनी लंकेच्या लोकांवर 24 तास कडक नजर ठेवण्याची व्यवस्था केली होती. क्षणभरही त्यांनी पाहुण्यांना नजरेआड होऊ दिलं नव्हतं. आज जटायू आणि मक्रांतची रात्रभर जागून पाहुण्यांवर नजर ठेवण्याची पाळी होती.
‘त्या लाडावलेल्या राजकन्येला तू आवडतोस!’ सीता म्हणाली.
रामने डोकं हालवलं. त्याच्या डोळ्यातून जो भाव व्यक्त होत होता त्यावरून स्पष्टच होतं की त्याला हे बालिश वाटत होतं. तो म्हणाला, ‘ते कसं शक्य आहे सीता? मी विवाहित आहे हे तिला ठाऊक आहे. तिला मी आकर्षक कसा काय वाटेन?’
गवताच्या बिछान्यावर सीता आपल्या पतीच्या शेजारी पहुडली होती. ‘तुला खरं तर हे माहीत असायला हवं, तू तुला वाटतोस त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आकर्षक आहेस.’
हसत राम म्हणाला, ‘काहीतरीच असतं तुझं.’
सीतासुद्धा हसली. मग तिने आपले बाहु त्याच्या गळ्याभोवती टाकले. म्हणाली, ‘पण तू माझा आहेस. फक्त माझा.’
‘होय, प्रिये,’ हसतच राम म्हणाला. मग त्याने सीतेला आपल्या बाहुपाशात घेतलं.
ते दोघेही मग एका प्रदीर्घ, गहिऱ्या चुंबनात हरवले. जणू रात्री झोपी जायची तयारी करत असल्यासारखी जंगलात हळूहळू शांतता पसरत चालली होती
पंचवटीच्या जंगलात रहाणाऱ्या या समूहासोबत पाहुणे रहायला लागून आता एक आठवडा उलटला होता.
लक्ष्मण आणि जटायूंचं म्हणणं होतं की त्यांच्यावर ठेवलेली कडक नजर अजून तशीच ठेवली जावी. ती मागे घेण्याची वेळ अजून आली नाही.
विभीषणाने घोषणा केली होती की काही तासांतच ते तेथून प्रयाण करतील. पण शूर्पणखेला तेथून निघण्याआधी आपले केस धुवायचे होते, तिने तसा हट्टच धरला होता. शिवाय, केस धुण्यासाठी सीतेनं सोबत यावं आणि आपली मदत करावी अशीही मागणी तिने केली होती.
शूर्पणखेसोबत जाण्यात सीतेला जराही स्वारस्य नव्हतं. पण लाडावलेल्या लंकेच्या राजकन्येची ब्याद शक्य तितक्या लवकर तेथून निघून जावी असं मात्र तिला वाटत होतं. म्हणून मग, इच्छा नसतानाही तिने शूर्पणखेच्या मागणीपुढे मान तुकवली.
शूर्पणखेनं होडीत बसल्यानंतर नदीतून थोडं खालच्या दिशेनं पुढे जाऊन केस धुण्याची इच्छा प्रकट केली.
आपलं म्हणणंच कसं बरोबर आहे हे ठसविण्यासाठी रागानं ती म्हणाली, ‘शिबिरातील तुझे सैनिक माझ्यावर कायम पाळत ठेवून असतात, मी आंघोळ करत असतानासुद्धा माझ्यावर नजर ठेवण्याची संधी ते सोडत नाहीत, हे मला ठाऊन नाही असं समजू नकोस!’
तोंड वाकडं करत सीतेनं एक खोल श्वास घेतला आणि ती गप्प राहिली.
‘अर्थात, तुझा तो अतिशय चांगला नवरा मात्र असं करत नव्हता हं,’ टोमणा मारत शूर्पणखा म्हणाली, ‘तो फक्त तुझ्याचकडे पाहातो.’
अजूनही शांत असलेली सीता होडीत जाऊन बसली. तिच्यापाठोपाठ शूर्पणखासुद्धा अत्यंत काळजीपूर्वक होडीत चढली. शूर्पणखा एक वल्हं उचलेल म्हणून सीतेनं वाट पाहिली, पण ती आपली नखं न्याहाळत फक्त बसूनच राहिली. रागानं कुरकुरत सीतेनं दोन्ही वल्ही उचलली आणि होडी वल्हवायला सुरवात केली. बराच वेळ ती होडी वल्हवत होती. हळूहळू सीतेला राग येऊ लागला आणि ती दमलीही होती. शेवटी, शूर्पणखेने नदीकिनाऱ्यावरील एका छोट्‌या, लपलेल्या कुंडाकडे बोट दाखवलं. तिला तेथे आंघोळ करायची होती.
‘ठीक आहे, जा, आंघोळ करून ये,’ सीता म्हणाली. मग सीतेनं तिच्याकडे पाठ वळवली. तिच्या आंघोळ करून परतण्याची सीता वाट पाहू लागली.
शूर्पणखेनं सावकाश आपले कपडे उतरवले आणि सोबत आणलेल्या कपड्‌यांच्या पिशवीत ते ठेवले. मग तिने नदीत सुरंकांडी मारली. सीतानं होडीच्या कठीण कठड्‌यावर डोकं टेकलं, होडीच्या आतील लाकडाच्या जमिनीवर अंग पसरलं आणि ती वाट पाहू लागली. थोड्‌या वेळानंतर सीतेला कठडा टोचू लागला. तशी उठून तिने होडीतील गोणी एकत्र करून गुंडाळल्या. गुंडाळलेल्या गोणींची उशी मानेखाली घेऊन ती पुन्हा लवंडली. डोक्यावर पसरलेल्या झाडाच्या पानांमधून येणाऱ्या, जणू तिला झोपविण्यासाठी मंद स्वरात अंगाई गात असल्यासारख्या आळसटलेल्या सूर्यकिरणांच्या स्पर्शानं तिला थोडं शांत वाटलं.
डुलकी लागली तशी सीतेचा वर्तमानाशी संबंध तुटला. तिला जाग आली ती एका पक्षाच्या कर्कश्श ओरडण्याने.
शूर्पणखा आनंदाने पाण्यात डुंबत असल्याचा आवाज तिने ऐकला. थोडा वेळ वाट पाहिली न् मग कोपरांच्या आधाराने उठून तिने शूर्पणखेला विचारलं, ‘आटपलं का तुझं? केसांचा गुंता सोडवून वेणी घालून देऊ का?’
क्षणभर पोहोणं थांबवून शूर्पणखा सीतेकडे वळली. तिच्या चेहऱ्यावर किळस आणि तिटकाऱ्याचे भाव होते. किंचाळूत तिने सांगितलं, ‘मी तुला माझ्या केसांना हातही लावू देणार नाही.’
सीताच्या डोळ्यातही राग तरळला. तिने विचारलं, ‘मग मला इथे तुझ्याबरोबर कशाला बोलावलून आणलंस....?’
‘मी इथे एकटी येऊ शकले नसते ना, म्हणून!’ सीतेला मध्येच तोडत शूर्पणखा म्हणाली. जणू काय जगातली अगदी साधी-सरळ गोष्ट सीतेला समजत नाही असा तिचा आविर्भाव होता. पुढे ती म्हणाली, ‘आणि मला कुणा पुरुषाला सोबत आणायचं नव्हतं. मला अशा अवस्थेत पाहून त्यांनी काय केलं असतं ते फक्त इंद्रदेवालाच ठाऊक!’
‘त्यांनी तुला बुडवलं असतं, बहुधा,’ सीता पुटपुटली.
‘काय म्हणालीस?’ शूर्पणखेनं फटकळपणे विचारलं.
‘काही नाही. लवकर आंघोळ आटप. तुझ्या भावाला आज निघायचंय.’
‘माझा भाऊ तेव्हाच निघेल जेव्हा मी त्याला निघायला सांगेन.’
कुंडापलीकडच्या जंगलात शूर्पणखा काहीतरी शोधत असल्यासारखी पाहातेय हे सीतेच्या लक्षात आलं. सीतेनं त्या दिशेला आपली नजर वळवली. मग थोडं चिडून मान हालवत ती शूर्पणखेला म्हणाली, ‘कुणीही आपला इथे पाठलाग करत नाहीय. कुणीही तुझ्याकडे पाहात नाहीय. महाराणी, आता कृपा करा आणि लवकर आटपा आंघोळ!’
उत्तर द्यायची पर्वा शूर्पणखेनं केली नाही. सीतावर तिरस्काराची एक नजर टाकून ती वळली आणि पोहोत राहिली.
सीताने मूठ कपाळावर टेकली आणि स्वत:ला दिलासा देत पुटपुटली, ‘खोल श्वास घे. आणखी खोल श्वास घे. ती आजच जाईल, तू श्वास घे.’
शूर्पणखा जंगलाच्या दिशेने अधून मधून चोरटेपणाने पाहातच होती. पण ती ज्यांची वाट पहात होती ते तिला दिसत नव्हते. तोंडातल्या तोंडात पुटपुटत ती करवादली, ‘या मूर्खांपैकी कुणीही विश्वासपात्र नाहीय. मला सगळं काही स्वत:च करावं लागेल.’
पंचवटीच्या शिबिरात विभीषण रामशी बोलणी करायला आला होता.
‘महाराज,’ विभीषण म्हणाला, ‘आम्ही येथून लवकरच निघणार आहोत हे आपण जाणताच. आम्हाला आमची शस्त्रास्त्रं परत मिळू शकतील का? म्हणजे आम्हाला निघता येईल.’
‘अर्थातच, मिळतील,’ राम म्हणाला.
विभीषणानं लक्ष्मण आणि जटायूकडे पाहिलं. ते थोड्‌या अंतरावर उभे होते. मग त्यानं गोदावरी नदीच्या दिशेनं नजर टाकली. दूर असलेल्या दाट राईमागे नदीचं पात्र लपलं होतं. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं.
ते पोहोचले असले म्हणजे मिळवली.
‘अती झालं आता,’ चिडचिडलेली सीता म्हणाली, ‘जेवढी स्वच्छ होणं शक्य होतं तेवढी तू झालीस. आता नीघ पाण्याबाहेर. निघतोय आपण.’
पुन्हा एकदा शूर्पणखेनं जंगलावर नजर फिरवली.
सीतेनं वल्ही हातात घेतली. म्हणाली, ‘मी चालले. तुला यायचं तर ये नाहीतर थांब इथेच.’
रागानं शूर्पणखा किंचाळली, पण तिला निघावंच लागलं.
सीताने लगेच होडी वल्हवत परत आणली. शिबिरापर्यंत पोहोचण्यासाठी नावेतून उतरल्यानंतर दहा मिनिटांची चढाई चढावी सागत होती. शूर्पणखा नावेतून उतरण्याची ती वाट पाहू लागली.
सीताने अपेक्षा केली नव्हतीच, आणि शूर्पणखेनंही तिला होडी खेचून किनाऱ्यावर आणायला आणि दोरखंडाने ती झाडाला सुरक्षित बांधून ठेवायला मदत केली नाही. होडीला दोर बांधण्यासाठी सीता वाकली तेव्हा शूर्पणखा तिच्या मागे उभी होती. सीतानं होडीला दोरखंड बांधला, त्याचं दुसरं टोक आपल्या उजव्या मनगटाला बांधलं, होडीचा पुढचा कठड्‌यासारखा भाग हाताने पकडला आणि तिने होडी खेचायला सुरवात केली.
सीता आपल्या कामात दंग होती. एकटीनं होडी खेचून किनाऱ्यावर आणून बांधणं तसंही खूपच शक्तीचं काम होतं. त्यामुळे मागे शूर्पणखेनं आपल्या पिशवीत हात घालून काही वनस्पती बाहेर काढल्याचं आणि त्या घेऊन ती तिच्या अगदी जवळ येऊन उभी राहिल्याचं आधी सीतेच्या लक्षातच आलं नाही.
शूर्पणखेनं विशिष्ट प्रकारचा साबण आणि अत्तर वापरलं होतं जे ती आंघोळीसाठी सोबत घेऊन आली होती. त्याचा सुगंध वेगळाच होता. जंगलातल्या वासाहून एकदम वेगळा.
या वासानंच सीतेला वाचवलं.
लगेच ती सावध झाली. हातातील होडी तिने सोडून दिली. शूर्पणखाने तिच्यावर झडप घातली आणि काही जंगली वनस्पती तिने सीतेच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला. मागे वळून सीतेनं लंकेच्या राजकुमारीला ठोसे लगावले. वेदनेने विव्हळत शूर्पणखा मागे पडली. सीतेनं लंकेच्या राजकुमारीच्या दिशेनं झेप घेतली, पण हाताला बांधलेल्या दोरखंडामुळे तिचा तोल गेला. ही संधी साधून शूर्पणखेनं सीतेला पाण्यात ढकललं. पण पाण्यात पडता पडता सीतेनं लंकेच्या त्या राजकुमारीला कोपरानं ढकललं. शूर्पणखेनं लगेच स्वत:ला सावरलं आणि ती सुद्धा सीतेमागोमाग पाण्यात झेपावली. तिने पुन्हा त्या जंगली वनस्पती सीतेच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला.
शूर्पणखा आधुनिक होती पण सीता तिच्यापेक्षा उंच, मजबूत आणि चपळ होती. तिने शूर्पणखेला जोरात ढकलले. त्यामुळे शूर्पणखा थोड्‌या दूर अंतरावर जाऊन पडली. सीतानं तोंडात गेलेला त्या पाल्याचा अंश थुकून टाकला. मग लगेच म्यानेतून सुरी काढून दोरखंड कापून स्वत:ला मुक्त केलं. सुरी पुन्हा म्यानेत ठेवली. पाण्यावर तरंगणारी वनस्पती पाहिली आणि ती कोणती वनस्पती आहे हे तिने लगेच ओळखलं. शूर्पणखेपर्यंत पोहोचण्यासाठी तिने पाण्यात सूर मारला.
तोवर शूर्पणखा सावरली होती. ती सीतेकडे पोहोत आली आणि तिने सीतेला बुक्क्या मारायचा प्रयत्न केला. सीतेने तिची दोन्ही मनगटं पकडली आणि इतक्या जोराने हिसडा दिला की लंकेच्या राजकुमारीला मागे वळावं लागलं. मग सीतेनं शूर्पणखेच्या गळ्याभोवती आपली पकड टाकून तिला आपल्या शरीराजवळ घट्ट पकडून ठेवलं.
मग दुसऱ्या हाताने सुरी शूर्पणखेच्या गळ्याजवळ आणून ती म्हणाली, ‘आणखी एखादी जरी हालचाल केलीस तर फुकट रक्त वाहून मरशील इथे. समजलं का लाडावलेल्या खुळचटा?’
शूर्पणखा त्यानंतर गप्प झाली आणि तिने संघर्ष करणंसुद्धा सोडून दिलं. सीतेनं सुरी म्यानेत टाकली. उरलेला दोरखंड तिने मनगटाभोवती गुंडाळला. आता शूर्पणखा तिचं मनगट पकडू शकत नव्हती. मग तिच्याच उपरण्यानं तिनं शूर्पणखेचं तोंड बांधलं.
सीतेनं मग शूर्पणखेच्या पिशवीत हात घातला. तिला तेथे आणखी काही वनस्पती मिळाल्या.
सीता म्हणाली, ‘तू जर आणखीन गोंधळ घातलास तर ही वनस्पती मी तुझ्या तोंडात कोंबेन.’
त्यानंतर शूर्पणखा शांत राहिली.
सीता तिला खेचत छावणीच्या दिशेनं घेऊन निघाली.
छावणीपासून थोड्‌या अंतरावर शूर्पणखेच्या तोंडावर बांधलेल्या उत्तरीयाची पकड ढिली पडली. ते तिच्या तोंडावरून ओघळून खाली पडलं. ती लगेच किंचाळू लागली.
‘गप्प बस!’ तिला खेचता खेचता सीता खेकसली.
तरीही शूर्पणखा टिपेच्या सुरात किंचाळतच राहिली.
थोड्‌याच वेळात त्या जंगलातून बाहेर पडल्या. उंच आणि भव्य पण पूर्ण भिजलेली आणि भयानक चिडलेली. शूर्पणखेला खेचून आणल्याने नसा तटतटलेल्या. लंकेच्या राजकन्येची मनगटं मात्र घट्ट बांधलेलीच होती.
राम आणि लक्ष्मणानं लगेच आपल्या तलवारी उपसून हातात घेतल्या. मग तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच तलवारी उपसल्या.
अयोध्येचा छोट्‌या राजपुत्राला सगळ्यात आधी आवाज फुटला. विभीषणाकडे दूषण देणाऱ्या दृष्टीनं पाहात त्यानं पृच्छा केली – ‘काय चाललंय काय इथे?’
विभीषणाला एवढा धक्का बसला होता की दोन्ही स्त्रियांवरून त्याची नजर टळत नव्हती. त्याला पण त्याने लगेच स्वत:ला सावरलं आणि म्हणाला, ‘तुझी वहिनी माझ्या बहिणीला काय करतेय? तिनेच शूर्पणखेवर हल्ला केला असावा असं दिसतंय.’
‘थांबवा ही नाटकं!’ लक्ष्मण ओरडला. ‘तुझ्या बहिणीनं आधी हल्ला केल्याशिवाय वहिनी असं काही करणार नाही.’
सीता या लोकांच्या घोळक्यात शिरली आणि तिने शूर्पणखेला मोकळं केलं. अर्थातच लंकेची राजकन्या रागानं लालेलाल झाली होती आणि तिचा स्वत:वरील ताबासुद्धा सुटला होता.
विभीषण लगेच आपल्या बहिणीकडे धावला, सुरी काढून तिला बांधलेल्या दोऱ्या त्याने कापल्या. तो तिच्या कानात कुजबुजला, ‘मला हे सगळं सांभाळू दे, तू गप्प बस.’
शूर्पणखेनं रागानं विभीषणाकडे पाहिलं. जणू जे काही झालं तो सगळा त्याचाच दोष होता.
सीता रामाकडे वळली. तिने आपली मूठ त्याच्यासमोर उघडली आणि शूर्पणखेकडे बोट दाखवत म्हणाली, ‘लंकेच्या त्या क्षूद्र स्त्रीने हे माझ्या तोंडात कोंबलं आणि मला नदीत ढकलून दिलं.’
राम ती वनस्पती ओळखत होता. शल्यक्रियेआधी लोकांना बेशुद्ध करण्यासाठी तिचा वापर केला जात असे. त्याने विभीषणाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत अंगार फुलला होता. त्याने विभीषणाला विचारलं, ‘काय चाललंय काय?’
विभीषण झटकन उठून उभा राहिला. त्याचा एकूण आविर्भाव नरमाईनं घेण्याचा होता. तो म्हणाला, ‘काहीतरी गैरसमज झालाय असं वाटतं. माझी बहीण असं काही करणार नाही.’
‘म्हणजे तिने मला पाण्यात ढकललं अशी मी कल्पना करतेय असं तुला सुचवायचंय का?’ सीतेनं आक्रामकपणे विचारलं.
विभीषणानं शूर्पणखेकडे पाहिलं. तोवर ती सुद्धा उठून उभी राहिली होती. तो तिला शांत रहायला संगत होता असं वाटलं पण त्याचं म्हणणं तिच्यापर्यंत पोहोचलंच नव्हतं हे उघड दिसत होतं.
‘खोटं बोलतेय ती!’ शूर्पणखा कर्कश्श आवाजात किंचाळली. ‘मी असं काही केलंच नाही!’
‘तू मला खोटं ठरवतेयस?’ सीता गुरकावत म्हणाली.
त्यानंतर जे घडलं ते इतकं अनपेक्षित आणि अचानक घडलं की कुणालाही काही करायची संधीच मिळाली नाही. भयानक वेगानं शूर्पणखेनं आपली सुरी उपसली. सीतेच्या डावीकडे उभ्या असलेल्या लक्ष्मणाने हे पाहिलं आणि तो लगेच, ‘वहिनीSS’ असं ओरडत पुढे धावला.
वार चुकविण्यासाठी सीता एकदम विरुद्ध दिशेला झुकली. त्या क्षणी लक्ष्मणाने पुढे झेप घेतली. पण सीता मागे झुकली होती त्यामुळे तो हल्ला करणाऱ्या शूर्पणखेवर आदळला. लक्ष्मणाने तिचे दोन्ही हात पकडले आणि तिला संपूर्ण ताकदीनिशी मागे ढकलले. लंकेची शेलाटी राजकन्या शूर्पणखा अचानक धडकलेल्या लक्ष्मणामुळे मागे फेकली गेली. सुरी या गादरोळात तिच्या चेहऱ्यावर आडवी लागली. शूर्पणखेचं नाक खोलवर कापलं गेलं. ती जमिनीवर कोसळली तेव्हा तिचं नाकसुद्धा जमिनीवर पडलं. वार एवढा जबरदस्त होता की नाक कापलं गेलं तरी तिला वेदना जाणवली नव्हती.
रक्त जेव्हा भळाभळा वाहू लागलं, तिचं मन जेव्हा तोडं ताळ्यावर आलं तेव्हा जे घडलं त्याची भयानकता तिला जाणवली. तिने चेहऱ्याला हात लावला आणि रक्तानं माखलेला आपला हात पाहिला. आपल्या चेहऱ्यावर खोल जखमा होणार आणि नंतर त्यांच्या खुणा मागे रहाणार हे तिला कळून चुकलं. त्या खुणा मिटविण्यासाठी वेदनादायक शल्यचिकित्सा करवून घ्यावी लागणार याची तिला जाणीव झाली.
पाशविक उन्मादानं ती किंचाळली. पुन्हा हल्ला करण्यासाठी तिने झेप घेतली. यावेळी ती लक्ष्मणाच्या दिशेनं पुढे झेपावली. विभीषण तिच्या दिशेनं धावला. क्रोधाने वेडीपिशी झालेल्या आपल्या बहिणीला त्याने पकडलं.
‘मार त्यांना!’ वेदनेनं विह्वळत शूर्पणखा किंचाळली, ‘सगळ्यांना मारून टाका!’
‘थांबा!’ भीतीने गळाठून विभीषण म्हणाला. शत्रूची संख्या आपल्यापेक्षा अधिक आहे याची त्याला जाणीव होती. त्याला मरायचं नव्हतं. त्याला मृत्यूहून भयानक कशाची तरी भीती वाटत होती. तो पुन्हा म्हणाला, ‘थांबा!’
रामने आपला डावा हात उंचावला. त्याने मूठ गच्च बंद केली होती. आपल्या लोकांना त्याने थांबण्याचा पण सावध रहाण्याचा इशारा केला होता. तो म्हणाला, ‘इथून निघून जा राजकुमारा, नाहीतर नरकयातना भोगाव्या लागतील.’
‘मागे फिरा!’ विभीषण पुटपुटला.
त्याचे सैनिक माघार घेऊ लागले. त्यांच्या तलवारी अजूनही जंगलात रहाणाऱ्या या लोकांवर उगारलेल्याच होत्या.
‘मार त्यांना, भित्र्या!’ शूर्पणखेनं आपल्या भावावर राग काढला, ‘मी तुझी बहीण आहे! सूड घे!’
बरंच रक्त वाहून गेल्यानं आतापावेतो दुर्बलतेनं झुलू लागलेल्या शूर्पणखेला विभीषण ओढत घेऊन गेला. त्याची नजर रामवर खिळलेली होती. त्याने अचानक काही हालचाल केली तर प्रतिकारासाठी तो स्वत:ला सज्ज ठेवून होता.
‘मारा त्यांना!’ शूर्पणखा किंचाळली.
आपल्या किंचाळणाऱ्या बहिणीला खेचत विभीषण पंचवटीच्या शिबिरातून आपल्या सैनिकांसह बाहेर पडला.
राम-लक्ष्मण-सीता आपल्या जागी खिळून उभे होते. जे घडलं ते भयंकर होतं.
‘आपण आता येथे राहू शकत नाही,’ जटायूनं अपरिहार्याला वाचा फोडली, ‘आपल्याकडे कोणताही पर्याय नाहीय. आपल्याला लगेच पळ काढायला हवा. आत्ता, लगेच’
राम जटायूकडे पाहात राहिला.
‘विद्रोही सदस्याचं का होईना, आपण लंकेच्या राजघराण्याचं रक्त वाहावलंय,’ जटायू म्हणाले, ‘त्यांच्या कायद्यानुसार रावणाला आता आपल्यावर हल्ला करण्यावाचून गत्यंतर नाही. सप्तसिंधूच्या कित्येक राजघराण्यांतही असाच कायदा आहे, होय ना? रावण नक्की येणार. मला त्याबाबत अजिबात शंका नाही. विभीषण भ्याड आहे. पण रावण आणि कुंभकर्ण भ्याड नाहीत. ते हजारो सैनिक घेऊन येतील. आणि मिथिलेच्या युद्धापेक्षा भयंकर युद्ध होईल इथे. तेथे सैनिकांमध्ये युद्ध झालं होतं. युद्धाचा तो भाग असतो. आणि ते सुद्धा हे जाणतात. पण हे खाजगी आहे. त्याच्या बहिणीवर, त्याच्या कुटुंबातील एका सदस्यावर हल्ला झाला आहे. रक्त वाहिलंय. त्याचा स्वाभिमान याची भरपाई मागेल.’
लक्ष्मण ताठरला. म्हणाला, ‘पण मी तिच्यावर हल्ला केला नाही...’
‘रावणाला तसं वाटणार नाही,’ त्याला मध्येच तोडत जटायू म्हणाले, ‘नेमकं काय झालं हे तो तुला विचारत बसणार नाही, राजकुमार लक्ष्मण. आपण पळायला हवं, लगेचच.’