प्रकरण 32
गेल्या तीस दिवसांपासून ते लपत-छपत चालले होते. सहजासहजी आपला कुणी पाठलाग करू नये किंवा आपल्यावर कुणाची नजर पडू नये याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. गोदावरी नदीला समानांतर घनदाट दंडकारण्यातून पूर्व दिशेला ते बरंच अंतर कापून आले होते. पण त्यांना ठाऊक होतं की पूरक नद्या किंवा पाणवठ्‌यापासून दूर रहाणं त्यांना परवडणारं नव्हतं कारण त्यामुळे शिकारीच्या उत्तम संधी त्यांना गमावाव्या लागल्या असत्या.
सुकं मांस, जंगलातील बोरं किंवा पानं खाऊन त्यांनी बरेच दिवस काढले होते. आतापर्यंत कुणीही लंकावासी त्यांना भेटला नव्हता. कदाचित लंकेच्या लोकांना त्यांचा माग लागला नसावा, असं त्यांना वाटलं. अन्नाची कमतरता आणि कायम चालण्यामुळे त्यांची शरीरं अशक्त होऊ लागली होती. म्हणून त्या दिवशी राम आणि लक्ष्मण शिकारीला गेले होते आणि सीता आणि मलयपुत्र सैनिक मक्रांत केळीची पानं आणायला आले होते.
गुप्तता राखणं अत्यंत महत्वाचं होतं. म्हणून ते आपलं जेवण जमिनीत खणलेल्या खोल खड्‌ड्यात बनवत असत. ईंधन म्हणून ते एका विशिष्ट प्रकारचे कोळसे वापरत असत. अंथ्रासाइट या प्रकारच्या कोळशांतून पेटल्यानंतर फक्त ज्वाळाच निघत असत, धूर निघत नसे. अतिरिक्त खबरदारी म्हणून खड्‌ड्यात ठेवलेल्या अन्नाच्या भांड्‌यावर केळीची पानं अंथरली जात. त्यामुळे चुकूनही धुराची रेघही बाहेर दिसत नसे. कारण धूर जर निघाला असता तर त्यांचं ठिकाण गुप्त राहिलं नसतं. याचसाठी सीता आणि मक्रांत केळीची पानं तोडून आणण्यासाठी जंगलात आले होते. यावेळी स्वयंपाक करण्याची जबाबदारी सीतेची होती.
पण रावणाचं पुष्पक विमान त्यांच्या शिबिरापासून थोड्‌याच अंतरावर उतरलं आहे हे सीताला ठाऊक नव्हतं. थोड्‌या वेळापूर्वी आलेल्या धुळीचं तूफान, वळीवाचा पाऊस आणि कडाडणाऱ्या विजेच्या आवाजात त्यांच्या विमानाचा, कानाचे पडदे फाडून टाकणारा आवाज ऐकूही आला नव्हता. विमानातून लंकेचे 100 सैनिक बाहेर आले आणि त्यांनी बेसावध मलयपुत्रांवर हल्ला करून त्यांची अंधाधुंध कत्तल केली. त्यांच्या या हल्ल्यात बहुतेक मलयपुत्र सैनिक मारले गेले होते.
लंकेचे काही सैनिक जंगलात राम, सीता आणि लक्ष्मणाला शोधण्यासाठी विखुरले. त्यांच्याचपैकी दोघांशी शिबिराकडे परतणाऱ्या सीता आणि मक्रांतची झटापट झाली होती. त्यांनी मारलेले दोन बाण लागून मक्रांत मृत्यूमुखी पडला होता. एक बाण त्याच्या खांद्यात घुसला होता आणि दुसरा मानेत. सीतेनं आपलं कौशल्य पणाला लावून या दोघांना यमसदनी पाठवलं होतं. त्यांची शस्त्रं घेऊन ती आपल्या शिबिराकडे परतली होती. तिथे पोहोचल्यावर शिबिरातील जटायूव्यतिरिक्त सगळे मलयपुत्र मारले गेल्याचं तिने पाहिलं. तिने अत्यंत शूरपणे जटायूंचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न केले, पण तिचे सगळेच प्रयत्न व्यर्थ गेले. विष्णूच्या रूपात ते जिची पूजा करत असत तिचं रक्षण करण्याच्या प्रयत्नांत नागा जटायू गंभीर रीत्या जखमी झाले होते.
रावणाच्या धाकट्‌या भावाने - कुंभकर्णाने सीतेला जिवंत कैद करण्याचा हुकूम दिला. लंकेचे कित्येक सैनिक सीतेवर चाल करून आले. शूरपणे तिने त्या सगळ्यांचा सामना केला, पण शेवटी तिला कैद करण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी तिला असमर्थ केलं, नंतर लंकेच्या निळ्या रंगाच्या द्रव्याच्या मदतीनं तिला बेशुद्ध केलं.
मग झटपट त्यांनी पुष्पक विमानात टाकलं आणि तिला घेऊन ते निघून गेले. सीतेची मदतीची हाक ऐकून धावत आलेल्या राम आणि लक्ष्मणाला ते शिबिरात पोहोचले तेव्हा सगळीकडे जखमी सैनिक आणि मृत सैनिकांची प्रेतं पसरलेली दिसून आली. गंभीररीत्या जखमी जटायू सुद्धा तेथेच पडले होते.
आपण किती वेळ बेशुद्ध होतो हे सीतेला आठवत नव्हतं. बहुतेक कित्येक तास ती बेशुद्ध असावी. अजूनही तिचं डोकं गरगरत होतं. विमानाच्या भिंतींवरील खिडक्यांमधून थोडा प्रकाश आत झिरपत होता. कायम येत असलेल्या एका प्रकारच्या कंटाळवाण्या आवाजाने तिची डोकेदुखी वाढत होती. आवाजबंद भिंतीतून येणारा तो विचित्र आवाज विमान उडवणाऱ्या मशीनींचा दबका आवाज आहे हे कळायला तिला थोडा वेळ लागला.
विमान पूर्णपणे आवाजबंद नाहीय.
डोक्यातील वेदना कमी करण्यासाठी सीतेनं कानशिलं दाबली. केवळ काही सेकंदांसाठी हा उपाय चालला. पुन्हा डोक्यातून वेदना येऊ लागल्या.
मग एक विचित्र गोष्ट तिच्या लक्षात आली.
माझे हात बांधलेले नाहीत.
तिने पायांवर नजर टाकली. पायसुद्धा बांधलेले नव्हते.
आता तिच्या आशा पल्लवित झाल्या.
पण लगेच आपल्या मूर्खपणाचं तिला हसू आलं आणि तिच्या आशा मावळल्या.
मी कुठे आणि कशी जाणार? जमिनीपासून हजारो फूट उंचीवर, आकाशात आहे मी.
त्या निळ्या विषानं माझ्या हालचाली मंद केल्यात.
ती एका रुग्णशिबिकेत होती आणि भिंतीजवळील एका उंच चौथऱ्यासारख्या जागी तिची रुग्णशिबिका पट्ट्यांनी बांधून ठेवलेली होती.
तिने आसपास नजर फिरवली. विमान प्रचंड अवाढव्य होतं. तिने वर पाहिलं. आतूनही ते बाहेरून दिसत असे तसंच शंक्वाकृती होतं. खालून वरपर्यंत सर्वत्र गुळगुळीत धातूनं बनलेलं होतं. शिखराजवळ एक चित्र लावलेलं होतं. तिची नजर अजूनही थोडी अंधुक होती त्यामुळे त्या तसबिरीवर काय आहे हे ती पाहू किंवा ओळखू शकली नाही. विमानाच्या बरोब्बर मध्यभागी विमानाच्या वरच्या टोकापर्यंत जाणारा एक लंबवर्तुळाकृती खांब होता. तो कोणत्यातरी भक्कम धातूचा होता, अर्थातच मजबूत होता. तिला वाटलं आपण एखाद्‌या मंदिराच्या प्रचंड आकाराच्या सुळक्याच्या आत आहोत. पण या सुळक्याच्या आतील भाग मोठा आणि आरामदायी असला तरी त्यात बसण्या-जोपण्याच्या कामी येणाऱ्या वस्तू अत्यंत कमी होत्या. राजसी वाहनांमध्ये, निदान सप्त सिंधू प्रदेशातील श्रीमंती वाहनांमध्ये वापरला जाणारा आरामदायक किंमती सरंजाम तिथे अजिबात नव्हता. पुष्पक विमान जेवढ्‌यास तेवढं, कमीत कमी सामान वापरून बनविलेलं पण अत्यंत कार्यक्षम वाहन होतं. त्याच्या एकूण रंग-रूपावरून ते छानछोकीसाठी, बडेजाव मिरविण्यासाठी नव्हे तर सैनिकी वापरासाठी बनविण्यात आलं असावं असं वाटत होतं.
त्यात शंभराहून अधिक सैनिक आरामात मावत होते. ते सगळे शांत, सैनिकी शिस्तीने आणि समकेंद्रित वृत्त बनवून जमिनीवर बसले होते. त्यांची रांग थेट विमानाच्या भिंतीपर्यंत गेली होती.
विमानाच्या जमिनीला बांधलेल्या खुर्च्यांवर बसलेल्या रावण आणि कुंभकर्णालासुद्धा ती पाहू शकत होती. त्यांची बसण्याच्या जागेसाठी थोडा आडोसा करण्यासाठी वरच्या दांडीवरून एक पडदा टांगलेला होता. ते फार दूर नव्हते. आपण बोललेलं सीताला ऐकू जाऊ नये म्हणून ते आपापसात कुजबुजत बोलत होते.
रुग्णशिबिकेवरच सीतेनं कोपरं टेकून धड वर उचललं. त्यामुळे वजन सरकल्यासारखा आवाज झाला. तिला अजूनही अशक्तपणा जाणवत होता.
रावण आणि कुंभकर्णानं मागे वळून तिच्याकडे पाहिलं. आपल्या जागेवरून तिच्याकडे येण्यासाठी ते उठून उभे राहिले. घाई-गडबडीत रावणाचा पाय धोतरात अडकला.
तोवर सीता उठून बसली होती. तिने श्वास आत घेतला आणि ती धीटपणे त्या दोघा भावांकडे पाहू लागली.
‘आत्ता मला मारून टाका,’ गुरकावत सीता म्हणाली, ‘नाहीतर नंतर तुम्हाला पश्चाताप होईल.’
आपली हत्यारं उपसून लंकेचे सारे सैनिक उठून उभे राहिले. पण कुंभकर्णाच्या एका इशाऱ्यासरशी ते जागच्या जागीच उभे राहिले.
आश्चर्य म्हणजे, अतिशय मिठ्ठास स्वरात मग कुंभकर्ण बोलू लागला, ‘आम्हाला तुला इजा पोहोचवायची नाहीय. थकली असशील तू. फार लवकर जाग आली तुला. तुला दिलेली भूल जास्त ताकदीची होती. कृपया आणखी थोडा आराम कर.’
सीतेनं उत्तर दिलं नाही. कुंभकर्णाच्या आवाजातील दयाळूपणामुळे ती चकित झाली होती.
‘आम्हाला ठाऊक नव्हतं,’ चाचरत कुंभकर्ण म्हणाला, ‘मला... मला ठाऊक नव्हतं नाहीतर आम्ही ते औषध वापरलंच नसतं...’
सीता शांत राहिली.
मग ती रावणाकडे वळली. तो तिच्याकडेच टक लावून बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर दु:ख होतं. खिन्नता होती. आणि त्याचे डोळे प्रेमानं भारलेले होते. वेगळेच. विचित्रच.
सीतानं उत्तरीय नीट अंगभर घेतलं आणि संकोचून ती भिंतीच्या आणखी जवळ सरकली.
अचानक एक हात समोर आला. त्या हातात कडुलिंबाचं एक पान होतं आणि त्या पानावर तोच परिचित निळ्या रंगाचा द्रव. तिचं नाक...
आपल्याला हळूहळू अंधार वेढून घेत असल्याचं सीतेला जाणवलं.
रावण आपल्या उजव्या बाजूकडे पाहात असल्याचं सीताला जाणवलं. तिथे सीताला बेशुद्ध करणारी व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर राग होता.
पुन्हा सीता अंधाराच्या गुहेत हरवली.
तिने डोळे उघडले.
विमानाच्या भिंतींमधील गोल खिडक्यांमधून अंधुक प्रकाश आत झिरपत होता. सूर्य क्षितिजाजवळ आला होता.
किती वेळापासून मी बेशुद्ध आहे?
सीतेला नेमकं आठवेना. काही तास? की, बरेच प्रहर?
पुन्हा पहिल्यासारखाच तिने अशक्तपणे, हळूहळू उठण्याचा प्रयत्न केला. बरेच सैनिक जमिनीवर झोपी गेल्याचं तिला दिसलं.
पण ती जिथे झोपली होती तेथे आसपास सैनिक नव्हते.
तिला एकटंच सोडण्यात आलं होतं.
रावण आणि कुंभकर्ण आपापल्या खुर्च्यांजवळ उभे होते. बहुतेक पाय मोकळे करण्यासाठी. ते आधीसारखेच कुजबुजत एकमेकांशी बोलत होते.
हळूहळू तिची नजर सरावली. तिला स्पष्ट दिसू लागलं. त्या दोघांपासून आपल्यामधील अंतराचा अंदाज तिने घेतला. रावण आणि कुंभकर्णापासून तिच्यापर्यंत पंधरा ते वीस फुटांहून जास्त अंतर नव्हतं. त्यांची सीताकडे पाठ होती आणि ते बोलण्यात गुंगून गेले होते.
सीतेनं आसपास नजर फिरवली आणि तिच्या ओठांवर हसू फाकलं.
कुणीतरी निष्काळजीपणा केलाय.
तिच्यापासून जवळच एक सुरी पडलेली होती. ज्या उंच जागेवर तिची रुग्णशिबिका बांधलेली होती तेथून. आवाज न करता, काळजीपूर्वक ती सरकत गेली. म्यान उचलून तिने हळूच, अजिबात आवाज न करता त्यातून सुरी काढली.
सुरी तिने हातात पक्की धरली.
तिने काही खोल श्वास घेऊन आपल्य शरीरात शक्ती भरली.
आपण काय ऐकलं होतं ते तिने आठवलं.
सेनेच्या प्रमुखाला मारलं की लंकेचं सैन्य लगेच सैरावैरा पळू लागतं.
तिने उठण्याचा प्रयत्न केला. सगळं जग आपल्याभोवती फिरतंय असं तिला वाटलं.
पुन्हा ती आपल्या उंच जागी बसली. खोल श्वास घेऊ लागली. आपल्य शरीरात अधिकाधिक प्राणवायू भरून घेऊ लागली.
मग पुन्हा तिने ध्यान केंद्रित केलं. हळूच उठून ती चोरपावलांनी रावणाच्या दिशेनं निघाली.
रावणाच्या मागे ती जेव्हा फक्त काही पावलांच्या अंतरावर आली तेव्हा आपला सुरी धरलेला हात उगारला आणि ती पुढे झेपावली.
एक मोठी किंकाळी वातावरणात घुमली कारण कुणीतरी सीतेला मागून पकडलं होतं.
त्या व्यक्तीचा हात सीतेच्या गळ्याभोवती होता. सीतेच्या गळ्यावर सुरी लावलेली होती. आपल्यावर हल्ला करणारी स्त्री आहे हे सीताला जाणवलं.
लगेच रावण आणि कुंभकर्ण गर्र्कन मागे वळले. लंकेचे बहुतेक सैनिकही जागे झाले.
कुंभकर्णाने आपले हात काळजीपूर्वक उंचावले. तो शांत पण अधिकारपूर्ण स्वरात बोलू लागला, ‘सुरी खाली फेक.’
आपल्या गळ्याभोवतीचा हात आवळला गेल्याचं सीतेच्या लक्षात आलं. लंकेचे सगळे सैनिक आता उभे झालेले आहेत हे सुद्धा तिने पाहिलं. तिने हार पत्करली आणि सुरी खाली टाकली.
कुंभकर्णाने पुन्हा एकदा, यावेळी कठोर स्वरात आज्ञा केली, ‘मी म्हणतोय, सुरी खाली टाक.’
सीतेच्या भुवया भिडल्या. ती गोंधळली होती. आपण खाली टाकलेल्या सुरीकडे तिने पाहिलं. ‘माझ्याजवळ दुसरी सुरी नाहीय,’ असं ती सांगणारच होती तेवढ्‌यात तिला आपल्या गळ्यावर टोचणी जाणवली. मागून तिच्यावर हल्ला करणाऱ्या स्त्रीने तिच्या गळ्यावर ठेवलेली सुरी आणखी जवळ आणली होती. त्या सुरीचं टोक सीतेच्या गळ्यात खुपलं होतं आणि तेथे रक्ताचा थेंब उमटला होता.
सीतेवर हल्ला करणाऱ्या त्या स्त्रीकडे वळण्याआधी कुंभकर्णानं एकदा रावणाकडे पाहिलं. ‘खरा मेलाय. तू हिला मारलंस तरी तो पुन्हा येणार नाहीय. असा खुळेपणा करू नकोस. मी आज्ञा देतो तुला, सुरी खाली टाक.’
आपल्या गळ्याभोवती आवळलेल्या हाताच्या पकडीत उमटलेली थरथर सीतेला जाणवली. तिच्यावर हल्ला करणाऱ्या स्त्रीला तिच्य मनात खोल रुतलेल्या भावनांशी झगडावं लागत होतं.
शेवटी, रावण मध्ये पडला आणि कठोर, आज्ञा देणाऱ्या आणि जवळपास भीती दाखवणाऱ्या आवाजात खेकसला, ‘सुरी खाली टाक, आत्ता!!’
आपल्या गळ्याभोवती आवळलेला हात ढिलावल्याचं सीतेच्या लक्षात आलं. अचानक तो हात काढूनही घेण्यात आला. आणि एक मंद स्वर ऐकू आला,
‘जशी आपली आज्ञा, इराइवा.’
तो आवाज ऐकला आणि सीता आश्चर्यचकित झाली. ती पटकन् मागे वळली. धडपडली. सावरता सावरता मागे पडली. तिने विमानाच्या भिंतीचा आधार घेतला. श्वास स्थिर करत तिने आपल्यावर हल्ला करणाऱ्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे पुन्हा पाहिलं. काही क्षणांपूर्वी जी तिच्या जीवावर उठली होती. खराबद्दल जिच्या मनात अतिशय तीव्र भावना होत्या. आणि जी रावणाच्या संपूर्ण आधीन होती.
तिनेच एकदा तिचा जीव वाचविला होता...
जिला ती आपली मैत्रीण मानत होती.
समीची.
...पुढील कथा श्रृंखलेच्या पुढील भागात.